* विनातिकीट प्रवाशांविरोधातील धडक मोहिमेचाही फायदा
घाटकोपर आणि अंधेरी या दोन वेगळ्या मार्गावरील स्थानकांना जोडणारी मेट्रो, सांताक्रुझ व चेंबूर यांना जोडणारा जोडरस्ता, अशा विविध प्रकल्पांमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखाचा झाला आहे. या प्रकल्पांमुळे मुंबईकरांचे रेल्वेवरील अवलंबित्व कमी झाल्याचे वाटत असले, तरी प्रत्यक्षात मात्र मध्य आणि पश्चिम या दोन्ही रेल्वेमार्गावरील प्रवाशांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. जून महिन्यात मध्य रेल्वेच्या प्रवाशांची संख्या दर दिवशी सरासरी ३५-३८ लाख एवढी होती. तर पश्चिम रेल्वेवर दर दिवशी ३५ लाख प्रवासी प्रवास करत होते. मात्र सध्या ही संख्या मध्य रेल्वेवर ४०-४३ लाख एवढी असून पश्चिम रेल्वेवर ३७-३८ लाखांच्या घरात आहे. म्हणजेच उपनगरीय रेल्वेवर दर दिवशी सरासरी ८५ लाख प्रवासी प्रवास करत आहेत.
मेट्रो किंवा त्यासारखे इतर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रेल्वेवरील भार कमी होईल, अशी अटकळ होती. मात्र प्रत्यक्षात हा भार वाढल्याचे दिसत आहे. याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे अद्यापही रेल्वे हमखास आणि झटपट प्रवासाचे साधन आहे. सायन-पनवेल महामार्ग सुरू झाल्यानंतर हे अंतर ३० मिनिटांत पार होणार असल्याचे बोलले जात असले, तरी गर्दीच्या वेळी या अंतरासाठी तासभर लागतोच. मात्र रेल्वेमार्गाने कोणत्याही वेळी ठरावीक वेळेतच हव्या त्या स्थानकावर पोहोचता येते.
मध्य रेल्वेने तिकीट काढण्यासाठी प्रवाशांसमोर विविध पर्याय ठेवले आहेत. जेटीबीएस, एटीव्हीएम, सीव्हीएम, फॅसिलिटेटर अशा विविध पर्यायांमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी पूर्वीच्या तुलनेत आता फार काळ ताटकळत बसावे लागत नाही. पश्चिम रेल्वेही आता आपल्या स्थानकांवरील एटीव्हीएम यंत्रांची संख्या वाढवत आहे. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वेवरील तिकीट खिडक्यांची संख्याही जास्त असल्याने प्रवाशांना तिकीट मिळणे सुलभ झाले आहे. परिणामी केवळ तिकिटांसाठीच्या रांगेला कंटाळून विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी आता तिकीट काढत आहेत.
दरमहा १ लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई
मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, तिकीट निरीक्षक आणि तिकीट तपासनीस यांनी विनातिकीट प्रवाशांविरोधात कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत दरमहा किमान एक लाख प्रवाशांना विनातिकीट प्रवास करणे, योग्य तिकिटाशिवाय प्रवास करणे आदी गोष्टींसाठी दंड ठोठावला जात आहे. यामुळे दंडाची रक्कमही दरमहा वाढत आहे. तिकीट तपासणीतील या काटेकोरपणाचाही प्रवाशांनीही धसका घेतला आहे. त्यामुळे प्रवासी आता तिकीट खरेदी करू लागले आहेत. परिणामी रेल्वेच्या महसुलात वाढ झाली असून प्रवासी संख्याही वाढलेली दिसत आहे.