शिक्षणाची दिशा ठरवल्यास यश नक्की मिळते. त्यामुळे वेळेचा चांगला उपयोग करून विद्यार्थ्यांनी इंजिनिअर, डॉक्टर या क्षेत्राशिवाय इतरही  क्षेत्रांत करीयरसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केले.
विवेकानंद बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार काळे बोलत होते. ते म्हणाले की, मुलगा व मुलगी यांना समान दर्जा दिला पाहिजे. मुलीच आई-वडिलांची जास्त चांगली काळजी घेतात. मुलींना जिजाऊ, सावित्रीसारखा दर्जा द्या, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षस्थानी ज्ञानगंगाचे प्रा. के. पी. कनके, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. शालीग्राम वानखेडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना केवळ विषयावरच लक्ष केंद्रित न करता जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून जागतिक ज्ञान अवगत करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. वानखेडे यांनी केले.
विजया कनके, जया जाधव, प्रा. मनोहर सुर्वे, डॉ. डी. एस. जाधव, पोलीस निरीक्षक एफ. जी. शेख, आर. डी. मगर, साहेब जाधव, दत्तात्रय भिसे, मंचक वाघ, बाबासाहेब थोरे, राहुल भदर्गे यांना जिजाऊ, सावित्रीबाई पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामप्रसाद अवचार यांनी केले.