दर दिवशी मुंबईच्या रस्त्यांवर नव्याने येणारी वाहने मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरत असली, तरी प्रादेशिक परिवहन कार्यालयांना मात्र त्यामुळे चांगलेच उत्पन्न मिळते. वाहन नोंदणी शुल्क हा महत्त्वाचा घटक असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या यादीत ताडदेव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय यंदा चांगलीच बाजी मारणार आहे. वाहन नोंदणीपोटी या कार्यालयात जमा होणाऱ्या निधीत गेल्या दोन महिन्यांत केवळ दोन वाहनांच्या नोंदणीमुळेच तब्बल साडेतीन कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. ही कृपा केली आहे या कार्यालयात वाहन नोंदणी करणाऱ्या मुकेश धीरूभाई अंबानी यांची! मुकेश अंबानी यांनी गेल्या दोन महिन्यांत अत्यंत महागडय़ा अशा दोन गाडय़ांची नोंदणी या कार्यालयात केली आहे.
देशातील धनाढय़ व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानावर असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मे महिन्यात बुलेटप्रूफ बीएमडब्लू गाडी विकत घेतली होती. सुरक्षेच्या कारणास्तव बुलेटप्रूफ गाडी विकत घेणारे मुकेश अंबानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशातील दुसरी व्यक्ती ठरले आहेत. या गाडीची किंमत ८.१४ कोटी एवढी होती. त्या गाडीसाठी त्यांनी एमएच ०१-बीएस- ११११ हा निवडक क्रमांकही अधिक पसे देऊन नोंदवला होता. त्यासाठी त्यांनी २.१० लाख रुपये मोजले होते. या गाडीच्या नोंदणीसाठी मुकेश अंबानी यांना १.६७ कोटी रुपये कर भरावा लागला होता.
हा कर कमी म्हणून की काय, मुकेश अंबानी यांनी आता अशीच मर्सििडझ कंपनीची संपूर्ण बुलेटप्रूफ गाडी विकत घेतली आहे. या गाडीची किंमत ९.६१ कोटी एवढी प्रचंड आहे. या गाडीचे वजन साडेचार टन एवढे असून त्याची नोंदणी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नावाने करण्यात आली आहे. तसेच या गाडीच्या एमएच-०१-बीवाय-३३३ या विशेष नंबरप्लेटसाठी मुकेश अंबानी यांनी ७० हजार रुपये मोजले आहेत. या कारच्या नोंदणीसाठी २० टक्के कर रिलायन्स इंडस्ट्रीजने भरला असून त्याची रक्कम १.९२ कोटी एवढी प्रचंड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडीपेक्षाही या गाडय़ांची किंमत जास्त असल्याचे समजते.
या दोन गाडय़ांच्या करांची एकत्रित रक्कम तब्बल ३.५९ कोटी रुपयांच्या आसपास होते. एखाद्या छोटय़ा प्रादेशिक परिवहन कार्यालयात वर्षभरात झालेल्या वाहन नोंदणीतूनही कधीकधी एवढी रक्कम जमा होत नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. पण या दोन गाडय़ांच्या नोंदणीमुळे यंदा ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उत्पन्नात चांगलीच भर पडली आहे.