‘हिंदुस्तान आर्ट अ‍ॅन्ड म्युझिक सोसयटी’ आणि ‘अंतरा संगीत विद्यालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने पंश्चिम बंगाल येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील शास्त्रीय नृत्य स्पर्धेत ठाण्यातील ‘नालंदा भरत नाटय़म निकेतन’ संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करुन चार पारितोषिके पटकावली आहेत. दहशदवाद, स्त्रीभ्रुण हत्या सांसारख्या सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांनी नृत्ये सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले होते. पश्चिम बंगाल येथील संस्कृती लोकमंच आणि टाऊन हॉल मैदान येथे राष्ट्रीय स्तरावरील ‘भारत संस्कृती उत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवांतर्गत शास्त्रीय आणि लोकसंगीत नृत्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. देशाच्या सर्व भागांतून मोठय़ा प्रमाणावर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धामध्ये ठाण्यातील ‘नालंदा भरत नाटय़म निकेतन’च्या विद्यार्थ्यांनी राज्याचे प्रतिनिधीत्व केले. या स्पर्धामध्ये नालंदाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनिय कामगिरी करुन चार पारितोषिके पटकावली आहेत. इशिका खोल्लम हिने भरत नाटय़ सादर करुन लहान मुलांच्या गटात प्रथम पारितोषिक पटकावले. तसेच सामुहिक नृत्य प्रकारातील एका स्पर्धेत प्रथम तर एका स्पर्धेत द्वितीय पारितोषिक पटकावले आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी ‘रंगयात्रा’ काढण्यात आली होती. यावेळी विविध राज्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या राज्याची पारंपारिक नृत्ये सादर केली. नालंदाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे पारंपारिक लेझिम नृत्य सादर करुन तृतीय क्रमांक पटकाविला. अशी चार पारितोषिके राज्याला प्राप्त झाली आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रशिक्षिका के.शोभना यांनी मार्गदर्शन केले. ‘नालंदा भरत नाटय़म निकेतन’ मागील ३२ वर्षांपासून ठाण्यामध्ये मुलींना शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण देत आहे. या स्पर्धामध्ये नालंदाच्या २३ मुली सहभागी झाल्या होत्या.