चोख सुरक्षा व्यवस्था असूनही एका शिपायाकडून शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण झाल्याची घटना कांदिवलीतील स्वामी विवेकानंद शाळेत उघडकीस आली होती. यामुळे शाळेने भविष्यातील अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. अशा विकृतीला आळा घालण्यासाठी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील आठवडय़ात कांदिवलीतील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल शाळेत पहिलीत शिकणाऱ्या सात वर्षीय मुलीवर शाळेतील शिपायाने प्रसाधनगृहात नेऊन लैंगिक अत्याचार केला होता. हा शिपाई शाळेत गेल्या १८ वर्षांपासून काम करत होता. त्याची मुलगीसुद्धा याच शाळेत शिकतेय. पुरसे सीसीटीव्ही आणि अन्य सुरक्षेच्या उपाययोजना असताना एखाद्याच्या विकृत वर्तनाने शाळेच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसला आहे. यामुळे शाळेने आता शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना शाळेचे संचालक योगेश पटेल म्हणाले की आम्ही पूर्वीपासूनच सुरक्षेचे नियम पाळत आहोत. पण कोण कसा वागेल ते सांगता येत नाही. पित्याकडूनच मुलीवर बलात्काराच्या घटना होत असतात. त्यामुळे कुणाच्या मनात काय असेल ते सांगता येत नाही. हे रोखण्यासाठी आम्ही यापुढे शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियमित समुदपदेशन करत राहणार आहोत. विविध स्वयंसेवी संस्थांची मदत त्यासाठी घेतली जाणार आहे.
मुलांच्या सुरक्षेच्या मुद्दय़ावरून पालकांनी बुधवारी शाळेवर मोर्चा आणला होता. या घटनेनंतर शाळेने ४० उच्च क्षमतेच्या सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे. लिफ्ट आणि प्रसाधनगृहाच्या बाहेरही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. याशिवाय प्रसाधनगृहात पुरुष आणि महिला मदतनीस कायमस्वरूपी तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकांचे भरारी पथक स्थापन करण्यात आले असून ते कुठल्याही वेळी शाळेत येऊन सुरक्षा आणि इतर कामांची पाहणी करू शकणार आहेत, असे शाळेचे विश्वस्त संदीप गोयंका यांनी सांगितले. प्रत्येक मजल्यावर आता सात ते आठ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी लैंगिक विकृतीपासून रोखण्यासाठी योग्य आणि अयोग्य स्पर्श याबाबतची माहिती देण्यासाठी लघुपट दाखविण्यास सुरुवात केली आहे. मोच्र्याच्या वेळी काही पालकांनी शाळेची बदनामी करण्यासाठी अफवा पसरविणारे मेसेजेस पाठवले होते. त्याविरोधात कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, पीडित मुलीने बुधवारपासून शाळेत येण्यास सुरुवात केली आहे. कांदिवली पोलिसांनी आरोपीला बलात्कार आणि बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा (पोक्सो) अंतर्गत अटक केली आहे. या मुलीने आरोपीला ओळखले असून त्या आधारे आरोपीवरील गुन्हा न्यायालयात सिद्ध होऊ शकतो, असे कांदिवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर दळवी यांनी सांगितले.