‘पंतप्रधान काका, वाघाला वाचवा. पेंच आणि कान्हा व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रकल्प इतरत्र वळवा. विकासासाठी झाडांचा आणि वाघाचा बळी देऊ नका’ अशी कळकळीची विनंती नागपुरातील शाळकरी चिमुकल्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. त्यांची ही आर्त हाक मोदींपर्यंत पोहोचणार का, हे ठाऊक नाही, पण झाडांना चिपकून त्यांनी ४० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या चिपको चळवळीला उजाळा दिला.
पेंच व्याघ्र प्रकल्प ते कान्हा व्याघ्र प्रकल्प असा मोठा कॉरिडॉर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे धोक्यात येणार आहे. गेल्या अनेक वषार्ंपासून मनसर ते खवासादरम्यानच्या ३७ किलोमीटरच्या पट्टय़ावरून राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण आणि वनखाते यांची न्यायालयात वारी सुरू आहे. या चौपदरीकरणाला परवानगी दिली तर असंख्य झाडांचा बळी जाणार हे निश्चित असल्याने अनेक स्वयंसेवी व स्वयंसेवी संस्थांनीसुद्धा त्याला विरोध केला आहे. मात्र, अलीकडेच न्यायालयाने अनेक वषार्ंपासूनच्या या मुद्दय़ावर तोडगा काढत ३७ पैकी दहा किलोमीटरच्या पट्टय़ातील झाडे तोडण्यास परवानगी दिली. या निर्णयाने पर्यावरणवादी प्रचंड नाराज झाले. जागतिक वसुंधरा दिनाचे निमित्त साधून निसर्गाच्या जवळ जाणाऱ्या उद्याच्या नव्या पिढीला सोबत घेऊन चिपको आंदोलन करण्यात आले. ४० वर्षांपूर्वी पर्यावरण संरक्षणासाठी उत्तराखंड राज्यातून महिलांनी चिपको चळवळ सुरू केली. पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुलभा चक्रवर्ती यांनी याचाच आधार घेत सँक्चुरी एशिया नेशन वाईड किड्स फॉर टायगर प्रोग्राममध्ये सहभागी तुली पब्लिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातच्या चौपदरीकरणाचा निषेध केला. चोरबाहुली गावाजवळील ज्या वृक्षांची तोड होणार आहे, त्याठिकाणी हे चिमुकले पोहोचले. जंगल आणि झाडे आमचे भविष्य आहेत आणि राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी त्याचा बळी देऊ नका, अशी कळकळीची विनंती त्यांनी चिपको आंदोलनाच्या माध्यमातून केली. या संदेशाचे फलक त्यांनी झाडावर लावले.
सँक्चुरी एशियाच्या विज्ञान, नैसर्गिक इतिहास आणि छायाचित्रण विभागाचे प्रमुख परवीश पंडय़ा म्हणाले, निसर्ग आपला सवरेत्कृष्ट शिक्षक आहे. तो आपल्याला स्वीकारायला शिकवतो. केवळ एकच गोष्ट नव्हे तर अनेक गोष्टी आत्मसात करायला तो शिकवतो. त्यामुळे अधिकाधिक वेळ निसर्गासोबत व्यतित करा आणि त्याला समजून घ्या. यावेळी तुम्हाला आलेला अनुभव इतरांसोबत वाटून घ्या, जेणेकरून त्यांनाही पर्यावरणाविषयी गोडी निर्माण होईल, असे ते म्हणाले.