भारताप्रमाणेच पाकिस्तानमधील मालिका आणि चित्रपटक्षेत्रात आज विविध प्रयोग होत आहेत. तंत्रज्ञान आणि विषयांच्या बाबतीत त्यात बऱ्याच सुधारणा होत आहेत. असे असले तरी पाकिस्तानात वादग्रस्त जाहिराती व मालिकांवर बसणारी बंदी किंवा त्यावरून झालेला गदारोळ याबद्दलच्या बातम्या कित्येकदा ऐकायला मिळतात. अशा परिस्थितीमध्ये एक मॉडेल किंवा अभिनेत्री म्हणून काम करताना हातावर निखारे ठेऊन काम करावे लागते, असे पाकिस्तानातील मॉडलिंग क्षेत्रातील आघाडीची मॉडेल अमिना शेख मान्य करते.
‘ज़िंदगी’ वाहिनीच्या पहिल्या टप्प्यातील मालिकांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील मालिका सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातली सध्या चालू असलेली मालिका म्हणजे ‘मात’. ही मालिका दोन बहिणींच्या नात्यांमधील चढउतारावर आधारित आहे. एकमेकींवर कुरघोडी करण्याच्या त्यांच्या शर्यतीमध्ये इष्र्या, मत्सर यामुळे दूषित झालेल्या नात्यांचे रंग त्यातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यात साध्यासरळ थोरल्या बहिणीच्या भूमिकेत अमिना शेख दिसत आहे. ‘ती शांत मुलगी आहे, कुटुंबाकडे तिच्या असलेल्या जबाबदाऱ्यांचे भान तिला आहे. त्यामुळे ती खूप शांत आहे. तिच्या अगदी विरुद्ध तिच्या लहान बहिणीची भूमिका आहे. ती फटकळ आहे, अनेकदा मर्यादा सोडूनही खूप बोलते.’
प्रत्यक्ष आयुष्यात मात्र अमिना पूर्णपणे वेगळी आहे. ‘मी या भूमिकेचा जेव्हा जेव्हा शांतपणे विचार केला तेव्हा तिच्या जागी मी असते तर तिच्याप्रमाणे वागले असते का, असा विचारही मनात अनेकवार आला. खूपदा मला या व्यक्तिरेखेचे वागणे पटत नाही. कदाचित प्रत्यक्ष जीवनात माझ्यामध्ये तिचाही थोडा अंश आहे.’ अशी स्वतंत्र विचाराची अमिना भूमिकांची निवड करताना मात्र बऱ्यापैकी सावध असल्याचे सांगते. आज ती पाकिस्तानमध्ये अनेक नामवंत ब्रॅण्ड्सचा चेहरा म्हणून ओळखली जाते. इतकेच नाही तर कित्येक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये तिने पाकिस्तानी चित्रपट सृष्टीचे प्रतिनिधित्वही केले आहे.
‘आज येथील चित्रपट सुधारतो आहे. विषय, सादरीकरणाच्या बाबतीत तो आंतराष्ट्रीय दर्जाचा बनण्याचा प्रयत्न करीत आहे. पण असे असले तरी अनिश्चिततेचे संकट पाठ सोडत नाही. पाकिस्तानी माध्यमांमध्ये काम करताना तुम्हाला कमालीची सावधगिरी बाळगावी लागते.
कदाचित मुस्लिम परंपरेबाबतच्या संवेदनशीलतेमुळे असेल पण येथे कोणत्याही गोष्टीवरुन वादळ निर्माण होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे भूमिका निवडताना तुमची जबाबदारी वाढते. मी देखील भूमिका निवडताना स्वतला प्रेक्षकांच्या जागी ठेऊन पाहण्याचा प्रयत्न करते.
जर त्या भूमिकेतून त्यांना आपलेसे करु शकत असेन तरच मी ती भूमिका निवडते,’ असे अमिनाने सांगितले. थोडक्यात आजही भूमिका निवडताना पाकिस्तानी कलावंतांवर येत असलेल्या मर्यादांबाबत आपले दुख ती व्यक्त करते.