रुळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी दोन आठवडय़ांकरिता म्हणून बंद झालेली बोरिवलीच्या ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’तील ‘वनराणी’ ही मिनी टॉय ट्रेन महिना उलटला तरी सुरू झालेली नाही. पर्यटकांची मोठी गर्दी खेचणारी ही ट्रेन ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीतच बंद असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांचा, खास करून चिमुकल्यांचा मोठा हिरमोड होतो आहे.
या उद्यानातील कान्हेरी गुंफा, नौकाविहार, वाघ-सिंह सफारी, निसर्ग माहिती केंद्र आदींबरोबरच ‘वनराणी’विषयी पर्यटकांमध्ये मोठे आकर्षण आहे. ‘वनराणी’ या छोटय़ा रेल्वेमधून उद्यानाची सफर करण्याची मजा मुलांबरोबरच त्यांचे पालकही भरभरून लुटतात; परंतु वनराणीच्या रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने ही सेवा बंद आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीतच ही मिनी रेल्वे बंद असल्याने बच्चेकंपनी चांगलीच खट्टू होते आहे.
या दुरुस्तीच्या कामासाठी चार आठवडे लागणार होते; परंतु महिना झाला तरी वनराणी सुरू झालेली नाही. मेटेनन्सच्या कामासाठी वनराणी बंद ठेवण्यात आल्याचे उद्यानाचे अधिकारी सांगतात.
एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ात वनराणीची सेवा बंद करण्यात आली. दुरुस्तीच्या कामासाठी चार ते पाच आठवडे लागणार होते, परंतु महिना झाला तरी दुरुस्तीचे काम अद्याप सुरू आहे. त्यामुळे वनराणी अजूनही रुळावर येऊ शकलेली नाही.
सध्या सुट्टीचे दिवस असल्याने मुंबईला खेटूनच असलेल्या या राष्ट्रीय उद्यानात दररोज पर्यटकांची मोठी गर्दी असते, परंतु वनराणी हे त्यांच्यासाठी मोठे आकर्षण आहे, परंतु ती बंद असल्याने टायगर सफारी, नौकाविहार, कान्हेरी गुंफा आदीवरच पर्यटकांना समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे, लांबचा प्रवास करून लहान मुलांना वनराणीची गंमत घेऊ द्यायला म्हणून येणाऱ्या पालकांमध्ये तर चांगलीच नाराजी आहे. त्यातून उद्यानात कुंपणाच्या कामामुळे येथील सिंहांसाठीची सफारीही बंद आहे.
ऐन सुट्टीतच दुरुस्तीचे काम करण्याऐवजी ते थोडे आधीच उरकले असते, तर किमान आम्हाला वनराणीची सैर तरी करता आली असती, अशी प्रतिक्रिया तृप्ती चव्हाण या ताडदेवहून आपल्या मुलासोबत उद्यानात आलेल्या गृहिणीने व्यक्त केली.