हापूस आंब्यासाठी आखाती व आशियाई देश ही खरी निर्यात बाजारपेठ असली तरी युरोपमध्ये हापूस आंबा पाठविणे हे निर्यातदारांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची बाब मानली जात असल्याने युरोपियन युनियनने हापूस आंबा आणि इतर चार भाज्यांवर घातलेली बंदी उठविण्याचे संकेत दिल्यानंतर मुंबई, नवी मुंबईतील सुमारे ३५ फळ निर्यातदारांनी आनंद व्यक्त केला आहे. युरोपमध्ये हापूस आंबा ५० कोटी आणि भाज्या १०० कोटींच्या घरात निर्यात केल्या जात होत्या. मे महिन्यापासून ही निर्यात ठप्प झाली होती.
हापूस फळ व वांगी, पडवळ, कारले, अळूची पाने या भाज्यांत फळमाशी आणि कीड आढळून आल्याने युरोपियन युनियनने एक मेपासून भारतातील या भाज्यांवर बंदी घातली होती. त्यानंतर अपेडाच्या अधिकाऱ्यांनी ब्रुसेल्समध्ये जाऊन तेथील फूड अ‍ॅन्ड व्हेटनरी विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. त्यानंतर हे अधिकारी भारतात विशेषत: मुंबई, नवी मुंबईत आले होते. त्यांनी हापूस आंबा आणि भाज्यांच्या पॅकिंग व अन्य सुविधांबाबत काही सूचना केल्या. त्यांची पूर्तता करण्याची तयारी भारतीय निर्यातदारांनी दाखविल्याने हापूस आंबा व त्या चार भाज्या युरोपमधील २८ देशांत जाण्यास नवीन वर्षांत मोकळ्या झाल्या आहेत. त्याचे लेखी आदेश आले नसले तरी येत्या काळात ते मिळण्याचे संकेत अपेडाला मिळाले आहेत. त्यामुळे हापूस आंबा युरोपमध्ये पाठविण्याची तयारी निर्यातदारांनी केली असून फळमाश्या मारण्यासाठी विशेष औषधाची फवारणी करण्याचे ठरविले आहे, अशी माहिती फळ बाजाराचे माजी संचालक संजय पानसरे यांनी सांगितले. भारतातून युरोपमध्ये एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के हापूस आंबा व दहा टक्के भाजी निर्यात केली जात होती. परकीय चलनाच्या हिशेबात हे उत्पन्न ५० ते १०० कोटींच्या घरात होते. ते गेले सहा महिन्यांपासून ठप्प झाले होते. यंदा हापूस आंब्याचा मोसम लांबणीवर गेला आहे. त्यामुळे युरोपला जाणारा तयार हापूस उशिरा जाणार आहे.

हापूस आंबा किंवा चार भाज्यांवर जी संक्रात ओढवली ती युरोपमधील टॉमॅटो व काकडीमध्ये आढळलेल्या किटाणूमुळे. हापूस आंब्यातील फळमाशी ही मानवी जीवनास हानिकारक नाही.  हापूस आंब्यावरील फळमाशी मारण्यासाठी बागायतदार आता युजोनल हे औषध वापरात असून २०० मिमी पाण्यात चार थेंब टाकल्यास ४० झाडांच्या आसपास येणारी फळमाशी या पाण्याकडे आकर्षित होऊन मरून पडत आहे. त्याचबरोबर युरोपमध्ये हा आंबा गेल्यानंतर त्याच्यावर हॉट ट्रीटमेंट केली जाणार असून ५२ डिग्रीच्या पाण्यात हा आंबा तीन मिनिटे ठेवल्यानंतर उरलीसुरली फळमाशीदेखील मरून जाणार आहे. त्यामुळे ह्य़ा दोन पद्धती अवलंबून चांगला आंबा पाठविण्याचा व्यापाऱ्यांचा प्रयत्न आहे.
संजय पानसरे, माजी संचालक, एपीएमसी

भारतातील या फळे व भाज्यांवरील बंदी उठली नसती तर हा हिस्सा पाकिस्तान शेतकऱ्यांच्या वाटय़ाला गेला असता. त्यांची ५०० टन भाजी नाकारली गेल्यानंतरही त्यांच्यावर बंदी घातली गेली नाही. कारण त्यांची लॉबी मजबूत आहे. युरोप बंदीमुळे येथील शेतकरी सतर्क आणि गुणवत्ताधारक अधिक झाले. या बंदीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली होती ती सुधारण्यास यामुळे मदत होणार असून भाज्यांना कीड लागणे हे गुजरात व राज्यातील हवामानामुळे शक्य नाही. ही कीड वाहतुकीच्या दरम्यान लागत असल्याचा अंदाज आहे.
प्रकाश भाई ठक्कर, युरोप निर्यातदार