वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर मुंबई पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. यावर्षी मे महिन्यापासून ऑपरेशन ईगल नावाची विशेष मोहीमही राबविण्यात आली होती. चालू वर्षांत नोव्हेंबर अखेपर्यंत तब्बल १८ लाख ८५ हजार ४५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून २ कोटी १२ लाख एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.
गेल्या वर्षभरात वाहतूक पोलिसांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत वाहतूक पोलीस सहआयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी माहिती दिली. बेशिस्त वाहनचालकांवर केलेल्या कारवाईत भरधाव वेगाने वाहन चालविणे, सिग्नल मोडणे, हेल्मेटचा वापर न करणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, बेल्ट न लावणे, हॉर्न वाजविणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे आदींचा समावेश आहे. रस्ते सुरक्षेबाबत वाहतूक पोलिसांनी जनजगृती सुरू केल्याने २०१३ च्या तुलने रस्त्यांवरील अपघातांची संख्या सुमारे १ हजार ने कमी झाल्याची माहिती उपाध्याय यांनी दिली. मोटारसाकल स्वारांनी हेल्मेट वापरावे यासाठी येत्या रविवारी राइड फॉर सेफ्टी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत अभिनेते अभिषेक बच्चन सहभागी होणार असून २ हजार महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. हेल्मेट न वापरणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. २ नोव्हेंबर पासून विनाहेल्मेट आणि विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर भारतीय दंड विधान संहितेच़्ा कलम २७९ कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार १६ डिसेंबपर्यंत ४५ हजार २४३ विनाहेल्मेट दुचाकीस्वार आणि विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या २ हजार ९६७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.