उन्हाळी सुटीत परदेशी फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना ट्रॅव्हल एजंटनेच फसवून लाखो रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या ठकसेनास गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाने बंगळूर येथून अटक केली आहे. हा एजंट विमानाची तिकिटे काढून द्यायचा नंतर ती परस्पर रद्द करून ते पैसे हडप करत होता.
मनिष कोठारी (३५) याने ‘ट्रॅव्हल इन ट्रिप’ नावाचे संकेतस्थळ सुरू केले होते. नवी मुंबईत कार्यालय असल्याचे त्याने म्हटले होते. परदेशी विमानाच्या तिकिटांची नोंदणी करून देऊ, अशा आशयाच्या जाहिराती तो इंग्रजी वर्तमानपत्रात देत असे. अनेकांनी त्याच्या या जाहिरातीला भुलून त्याच्याकडे अमेरिका, कॅनडा, लंडन आदी देशात जाण्यासाठी विमानाच्या तिकिटांचे आरक्षण करण्यासाठी पैसे दिले होते. कोठारीने आपले नाव हिमांशू पित्रोदा असल्याचे सांगितले होते. माहिमला राहणारे फिरोज अमरोलीवाल (७०) यांनीही कोठारीकडे लंडनला जाण्यासाठी विमानाचे तिकीट बुक केले होते. ते आपल्या कुटुंबियांसह १२ एप्रिलला लंडनला जाणार होते. त्यांनी आदल्या दिवशी जेट एअरवेजकडे चौकशी केली तेव्हा त्यांची तिकिटे रद्द केली असल्याचे समजले.
अशाच प्रकारे अनेकांची तिकिटे रद्द करण्यात आलेली होती. पित्रोदा उर्फ मनीष कोठारी याच्याकडे संपर्क केला असता त्याचा फोन बंद होता, तसेच त्याचे कार्यालयही बोगस असल्याचे समजले. कोठारी याने अशाप्रकारे १२ जणांची २४ तिकिटे परस्पर रद्द करून त्यांना ८ लाख ७६ हजार रुपयांना गंडविले होते.
कसलाच दुवा नसल्याने त्याला पकडण्याचे आव्हान होते. गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, दिलीप फुलपगार, आणि लक्ष्मीकांत साळुंखे यांनी दोन दिवसात तपास करून त्याला बंगळूर येथून अटक केली. तेथेही तो बनावट नाव धारण करून रहात होता. त्याने पाच ते सहा सीम कार्ड बदलली होती, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी दिली. त्याने अनेकांना अशापद्धतीने गंडा घातला असल्याची शक्यता आहे.