सकाळी ९.३० वाजता परीक्षा असल्यामुळे संपूर्ण तयारीनिशी पोहोचलेल्या विद्यार्थी परीक्षार्थीना प्रशासनाच्या बेपर्वाईचा मोठा फटका बसला. जिल्ह्य़ातील बहुतांश परीक्षा केंद्र यावेळेला उघडलेली नसल्यामुळे विद्यार्थ्यांची पंचायत झाली. तब्बल दोन तास उशिरा परीक्षा सुरू झाल्याने बाहेरगावच्या अनेक परीक्षार्थीना विविध असुविधांचा सामना करावा लागला.
१३ विभागांमध्ये एकूण २६ परीक्षा केंद्रांवर बुलढाणा जिल्ह्य़ातून एकूण १० हजार १८३ विद्यार्थी परीक्षेसाठी जमले होते. प्रवेश पत्रावर १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता परीक्षेसाठी उपस्थित राहण्याचे ठळक अक्षरात छापलेले होते, पण परीक्षा दोन तास उशिरा घेण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांचा यामुळे हिरमोड झाला. जेवण तसेच पाण्याची काही सोय नसल्यामुळे अनेकांना याचा त्रास झाला. यासंदर्भात कें द्र निरीक्षक पी.एन.देशमुख यांचेशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, एक महिन्यापूर्वीच म्हणजे २ जानेवारीला पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून परीक्षा ९.३० ऐवजी सकाळी ११.३० वाजता असल्याचे कळविले. तसेच नवोदय विद्यालय शेगावकडूनही संबंधित मुख्याध्यापकांना पत्र पाठविण्यात आले तरी सुध्दा हा गोंधळ का उडाला, या प्रश्नाचे उत्तर देण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली. विशेष म्हणजे, प्रवेशपत्रावर ९.३० ची वेळ का टाकली, याचे स्पष्टीकरण देतांना देशमुख यांनी प्रवेशपत्रांची छपाई आधीच झालेली असल्याचे सांगितले. एकंदरीत परीक्षा दोन तास उशिरा असण्याबाबत कोणत्याच विद्यार्थ्यांपर्यंत किंवा त्यांच्या पालकांपर्यंत सूचना पोहोचलेली नव्हती, हे समोर आले आहे. यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशीही मागणी काही पालकांनी केली आहे.