मुंबई शहरात स्वाईन फ्ल्यू ने हाहाकार माजवला असून याची लागण सध्या मुंबई शेजारील उरण तालुक्यातही झाली आहे. यामध्ये येथील कंठवली गावातील मदन पाटील (४५) यांना स्वाईन फ्ल्यूची लागण होऊन त्यांचा उपचारादरम्यान वाशी येथील रूग्णालयात मृत्यू झाला. उरण तालुक्यातील २०१५ मधील ही पहिलीच घटना असून उरणच्या आरोग्य विभागाने गावागावात पथके पाठवून तपासणी सुरू केली आहे.
उरणच्या एका गोदामात काम करणारे मदन पाटील यांना स्वाईन फ्ल्यू झाला असल्याचे निदान २५ जुलै रोजी झाले होते. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा २८ जुलै रोजी मृत्यू झाला, अशी माहिती उरणचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.जी.संकपाल यांनी दिली. मृत व्यक्तीच्या पत्नी तसेच कुटूंबियांची तातडीने तपासणी करण्यात आली आहे. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारची लागण झालेली नाही. गावातील नागरिकांचीही तपासणी आरोग्य विभागाकडून सुरू आहे, असे डॉ.संकपाल यांनी सांगितले. स्वाईन फ्ल्यु हा हवेतून पसरणारा रोग असल्याने दक्षता हाच त्यावर उपाय असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. खबदारी म्हणून संपूर्ण तालुक्यात आरोग्य विभागाने तपासणी करावी, अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ.मनीष पाटील यांनी केली आहे.