प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत उरणमधील अनेक अ‍ॅथलेटिक्सनी मुंबई, ठाणे येथील मॅरेथॉन स्पर्धेत बक्षिसे पटकावली आहेत. उरणची धावपट्ट नीलम कदम हिने दिल्लीतील मानाची मॅरेथॉन जिंकली. नीलमप्रमाणेच प्रशांत पाटीलचीही अमेरिका व कॅनडा येथील मॅरेथॉनसाठी निवड झालेली आहे.
उरणच्या वीर वाजेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी सन्नी पाटील, चिरनेरचा प्रफुल्ल वशेणीकर व मनोज ठाकूर यांनी महाविद्यालय पातळीपासून ते राज्य पातळीवर उरणचे नांव झळकले आहे. सन्नी पाटील याने राज्यस्तरावरील सुवर्णपदक तसेच मुंबई विद्यापीठातही सुवर्णपदक मिळविण्याचा मान पटकावला आहे. त्याचबरोबर नीलम कदमचा भाऊ मयूर कदम, पूनम माळी, पूजा कोळी आदी अ‍ॅथलेटिक्सही विविध स्पर्धातून उरणचे नाव गाजवीत आहेत.  प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत यश संपादन करण्याची जिद्द उरणच्या अ‍ॅथलेटिक्समध्ये आहे पण जर त्यांना शास्त्रोक्त पद्धतीचे शिक्षण, सुसज्ज असे मदान आणि अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले तर त्यांचे यश अधिक भरारी घेऊ शकेल.  
गवत, खडीच्या रस्त्यावर अंधारातून वाट काढीत धावण्याचा सराव
मदान नसल्याने उरणमधील अ‍ॅथलेटिक्स गवत आणि खडीच्या रस्त्यावर सकाळी पहाटे पाच वाजता बोकडविरा येथील शिर्के वसाहतीत अंधारातून वाट काढीत चिमुकली पावले धावण्याचा सराव करीत आहेत. सिडकोच्या विकास आराखडय़ातील या परिसरात बावीस वर्षांपूर्वी सिडकोच्या माध्यमातून बनविलेल्या रस्त्याचे रूपांतर आता खडीच्या रस्त्यात झालेले आहे. दुसरीकडे रस्त्याच्या कडेला माणूस दिसणार नाही, असा सहा ते सात फूट उंचीचे वाढलेले गवतही आहे. या गवतात सापांचीही संख्या मोठी आहे. अशाही परिस्थितीत उरण तालुक्यातील अ‍ॅथलेटिक्स सराव करण्यासाठी दुसरी जागाच उपलब्ध नाही.