प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दाखल झालेल्या संततधारेमुळेभाजीपाल्याचे कडाडलेले भाव काहीसे कमी होतील या अपेक्षेत असणाऱ्या सर्वसामान्यांना आजही २० ते ८० रुपये प्रति किलो या दराने त्यांची खरेदी करावी लागत आहे. ८० रुपये किलो असणारी मिरची जशी अजून तिखट आहे, तसाच वाल व गवारसाठीही तोच भाव मोजावा लागत आहे. इतकेच नव्हे, तर गिलके, दोडके, कारले, भेंडी व शेवगा यांसारख्या बहुतांश भाज्यांसाठी ६० ते ७० रुपये मोजावे लागतात. उन्हाळ्याच्या तुलनेत हे दर काही अंशी खाली आले असले तरी मासिक अंदाजपत्रकावर पडणारा ताण मात्र कायम आहे. घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक हळूहळू वाढत असून पुढील काही दिवसांत हे भाव खाली येऊन स्थिरावतील, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
मुंबईची परसबाग अशी खरे तर नाशिकची ओळख; परंतु मागील दोन ते तीन महिन्यांपासून परसबागेत भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिक व गृहिणी जेरीस आल्या आहेत. पावसाचा हंगाम सुरू झाल्यावर भाजीपाल्याची आवक वाढेल असे सांगितले जात होते. तथापि, दोन महिने पावसाने पाठ फिरविल्याने परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. जुलैच्या प्रारंभी समाधानकारक पाऊस झाला. यामुळे आता हे दर आवाक्यात येतील असे वाटत असले तरी तसे घडले नसल्याचे बाजाराची चाहुल घेतल्यावर लक्षात येते. पावसाने उघडीप घेतल्यावर शेतीच्या कामांनी सध्या वेग पकडला आहे. मध्यंतरी पाच ते सहा दिवस सलग जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतात पाणी साचून शेतमालाचे नुकसान झाले. यामुळे मागणी जास्त आणि आवक कमी या स्थितीला सामोरे जावे लागले. नाशिकहून मुंबईला दररोज मोठय़ा प्रमाणात भाजीपाला पाठविला जातो.
त्या ठिकाणी चांगले भाव मिळत असल्याने साहजिकच स्थानिक घाऊक बाजारात त्या मालाचे दर चढेच राहतात, असे किरकोळ विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये कुठल्याही भाजीसाठी ग्राहकाला किलोमागे ८०-१०० रुपये मोजावे लागत होते. समाधानकारक पाऊस होऊनही भाव फारसे कमी झाले नसल्याने सर्वसामान्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सध्या किरकोळ बाजारात वाल आणि गवार ८० रुपये (प्रति किलो), वांगे, गिलके, दोडके, कारले प्रत्येकी ६०, पत्ता कोबी ३०, फुलकोबी ५०, चवळीची शेंग ५०, शेवगा ७०, सिमला मिरची ५०, तोंडली ६०, भेंडी ६० रुपये असे दर आहेत. काकडी ३० रुपये, बीट १५, मुळा १५ रुपये (आठ नग), तर मेथी २५ ते ३० रुपये जुडी, पालक, शेपू, तांदुळका १० प्रत्येकी १० रुपये जुडी या दराने खरेदी करावी लागत आहे. मधल्या काळात कोंथिबीरची आवक घटल्याने ६०-८० रुपये जुडीने विकली जाणारी कोंथिबीर सध्या ८ ते १० रुपयांवर आली आहे. टोमॅटोने मागील आठवडय़ात ८० रुपयांपर्यंत मजल मारली होती. त्याचे भाव निम्म्याने कमी होऊन ४० रुपये किलोवर आले आहेत. कांदे २० तर बटाटे ३० रुपये किलो आहेत. हिरवी मिरची ८०-८५ आणि लसूण ६० रुपये किलो असा दर आहे. भाजीपाल्याचे भाव नियंत्रणात येण्यासाठी अजून १५ ते २० दिवसांचा कालावधी लागेल. या काळात सर्वसाधारपणे पावसाचे प्रमाण कमी असते. नुकताच समाधानकारक पाऊस झाला असल्याने बाजारपेठेत मुबलक प्रमाणात भाजीपाला उपलब्ध होणार असल्याचे भाजी विक्रेते संजय कर्पे यांनी सांगितले.