श्रीराम जन्मोत्सवनिमित्त विदर्भात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरचे धार्मिक व सांस्कृतिक वैभव म्हणून देशभरात ओळखली जाणारी श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा उद्या, शनिवारी पोद्दारेश्वर मंदिर व रामनगरातील राम मंदिर व उत्तर नागपुरातून मोतीबागजवळून निघणार आहे. या शोभायात्रांच्या निमित्ताने मार्गांवर विविध भागात प्रवेशद्वार उभारण्यात आले असून चौकाचौकात विविध आकर्षक पौराणिक दृष्ये साकारण्यात आली आहे. प्रभूरामचंद्रच्या पूजेचा पहिला मान महापौर प्रवीण दटके यांना असला तरी उपराजधानीत प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोभाायत्रेत सहभागी होऊन रामरथाची पूजा करणार आहेत.
विदर्भात अमरावती, अकोला, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्य़ातील राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.  रामटेकमध्ये रामजन्मोत्सव साजरा होणार असून या ठिकाणी भाविकांची होणारी गर्दी बघता प्रशासनाने तयार केली आहे. रामटेकला जाण्यासाठी मध्यवर्ती परिवहन विभागाने नागपूरसह विविध जिल्ह्य़ातून व्यवस्था केली आहे. छत्तीसगढ, मध्यप्रदेशसह विदर्भातील विविध जिल्ह्य़ातील एक दीड लाख लोक रामटेकला दरवर्षी रामजन्मोत्सवाला उपस्थित राहत असल्यामुळे प्रशासनाने त्या दृष्टीने तयारी केली आहे.   
शनिवारी दुपारी ४ वाजता महापौर प्रवीण दटके यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते पूजा होऊन पोद्दारेश्वर मंदिरमधून शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. यावर्षी शोभायात्रेत पौराणिक व सामाजिक विषयांवर आधारित ६० पेक्षा अधिक चित्ररथ, १६ बहारदार लोकनृत्यांसह लहान चित्ररथही सहभागी होणार आहेत. पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेचे यंदा ४९ वे वर्ष असून त्यात विविध जाती धर्माचे लोक सहभागी होत असतात. पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे रामनगमधून शोभायात्रा निघणार असून त्यातही विविध चित्ररथ सहभागी होणार आहे. सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते प्रभूरामचंद्राची पूजा करण्यात येणार आहे.
उत्तर नागपुरात मोतीबाग परिसरातून बेलिशॉप प्राचीन शिवमंदिरातून शोभायात्रा निघणार आहे. शोभायात्रेत सुवर्ण रामरथासह विविध पौराणिक विषयांवर चित्ररथ राहणार आहेत. दुपारी १२ वाजता रामजन्मोत्सव झाल्यानंतर दुपारी ४ वाजता शोभायात्रेला प्रारंभ होईल. यावेळी आमदार डॉ. मिलिंद माने यांच्यासह माजी मंत्री  नितीन  राऊत, नगरसेवक संदीप सहारे, दीपक लालवानी यांच्यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. शोभायात्रेचे १२ वे वर्ष आहे. शोभायात्रेत ५० पेक्षा अधिक चित्ररथ आणि नृत्य सहभागी होणार असून मार्गावर प्रवेशद्वारासह आकर्षक सजावट करण्यात आली आहे. महालातील भोसला पॅलेसमधून दुपारी ४ वाजता रामजन्मोत्सवनिमित्त शोभायात्रा निघणार आहे. राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात १७२५ मध्ये राजे रघुजी राजे भोसले यांनी शोभायात्रेला प्रारंभ केला होता. या शोभायात्रेला तीनशे वर्षांचा इतिहास आहे.