नियोजनबद्ध शहर, सायबर सिटी, ग्रीन सिटी अशी बिरुदावल्या मिरवणारे शहर आणि संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात राज्य स्तरावर दोन वेळा व केंद्रीय पातळीवर एक वेळा पुरस्कार प्राप्त केलेल्या नवी मुंबईला सध्या अस्वच्छ शहर म्हणून पुरस्कार देण्याची वेळ आली असून निर्माण होणाऱ्या दैनंदिन कचऱ्याची वाहतूक अद्याप सुरळीत न झाल्याने ऐन निवडणूक काळात हा कचरा काही उमेदवारांचा ‘कचरा’ करणार आहे असे दिसून येत आहे.  अध्र्या शहरातील मतदारांना नाक मुठीत धरुनच मतदान करण्याची वेळ येणार आहे.  वाशी आणि कोपरखैरणे विभागात कचरा वाहतूक यंत्रणा राबविण्यात आली असली तरी तेथेही अद्याप ही यंत्रणा सक्षम झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण शहर कचरामुक्त करण्यासाठी मे महिना उजाडणार आहे.
राज्यात घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी कायदा -२००० अमलात आणणारी नवी मुंबई पालिका ही पहिली पालिका म्हणून ओळखली जाते, पण आता ही पालिका या हाताळणीत पिछाडीवर पडली असून शहराच्या कचरा नियोजनाचे धिंडवडे काढणारी दृश्य पदोपदी दिसून येत आहे. शहरात दररोज ६०० मेट्रिक टन घनकचरा तयार होत असून तो स्वच्छ आणि त्याची डंपिग ग्राउंडपर्यंत वाहतूक करण्यासाठी पालिका १०९ कोटी ४७ लाख रुपये वर्षांला खर्च करीत असून अडीच हजार कामगार त्यासाठी झटत आहेत. कचरा वाहतुकीचे कंत्राट मध्यंतरी वादग्रस्त ठरले आणि त्याची चौकशी सुरू झाली. काँग्रेसच्या दशरथ भगत यांनी त्याची चौकशी लावली आणि नामानिराळे राहिले. हा चौकशीचा फेरा दोन वर्षे चालला त्यामुळे नवी मुंबईतील कचऱ्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली. वाहतुकीच्या कंत्राटावर निर्माण झालेले संशयाचे ढग दूर झाल्यानंतर आता त्याचे काम एका ए. जी. एन्व्हारो कंपनीला देण्यात आले आहे.
या अगोदर रामराव घाडगे पाटील, अ‍ॅन्थोनी असे कंत्राटदार झाल्यानंतर ही तिसरी कंपनी नेमण्यात आली असून त्यांना वाहने वगैर तयारी करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, येत्या निवडणूकीत उमेदवारांना प्रचार आणि मतदारांना मतदान नाक मुठीत घेऊनच करावे लागणार आहे. त्यामुळे घनकचऱ्याचे व्यवस्थापनाशी काहीही देणेघेणे नसलेले मतदार काही उमेदवारांना या निवडणुकीत कचऱ्याची जाणीव करुन देतील अशी येथे परिस्थिती निर्माण झाली आहे.
वाशी, कोपरखैरणेत
कचऱ्याचे ढीग
वाशी व कोपरखैरणे भागात या कंपनीने कचरा वाहतुकीची सोय केली आहे, पण तेथेही अद्याप घाणीचे साम्राज्य आहे. इतर भागात तर कचऱ्याचे ढीग जागोजागी दिसून येत असून रोगराई, गाई, गुरे, कुत्री, मांजरे या कचऱ्यावर तुटून पडत असल्याने कचऱ्याचे साम्राज्य रस्त्यावर अवतरले आहे. बेलापूर सीवूड गृहसंकुलाजवळील सेक्टर ५० येथील पारस सोसायटीसमोर, नेरुळ २३ येथील परिमल सोसायटी, तुर्भे सेक्टर २१ मधील शौचालय व आंबेडकर चौक, वाशी सेक्टर ९ मधील शबरी हॉटेलसमोर, जुईगावाच्या गावदेवी मंदिराजवळ, कोपरखैरण्यात सेक्टर १५, १९ , रा. फ. नाईक शाळेमागे, ऐरोलीत सेक्टर ६ येथील फुलचंद मढवी उद्यान, सेक्टर १० मधील भांगे फार्म हाउसजवळ, रबाळे स्मशानभूमी, सेक्टर चारमधील अभिनंदन हॉटेलसमोर कचऱ्याचे ढीग ढीगच दिसून येत आहेत. हा कचरा उचलण्याची जबाबदारी ९१ कंत्राटदारांवर सोपविण्यात आली होती. ते कचऱ्याचे प्रदर्शन करीतच त्याची वाहतूक करीत असून ते वाहतूक किती करतात आणि बिले किती घेतात याची तपासणी करण्याची वेळ आली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे हा कचरा लवकर सडण्याची प्रक्रिया सुरू होत असून त्यामुळे दरुगधी पसरत आहे.