कुटुंबातील व्यक्तीची स्मृती जतन करण्याची प्रत्येकाची कल्पना वेगळी असू शकते. वैयक्तिक आठवणींसोबतच समाजासाठीही उपयुक्त ठेवा सादर करण्याचा स्तुत्य प्रयत्नही काही जण करतात. वृद्ध वडिलांच्या पहिल्या स्मृतिदिनी, ज्येष्ठांना रोजच्या आयुष्यात उपयुक्त ठरणारे संकेतस्थळ सुरू करणे, हा प्रयत्न त्यापैकीच एक म्हणता येईल.
आर्थिक स्तर उंचावला असला तरी लहान कुटुंबांमुळे शहरातील वृद्धांच्या समस्यांमध्ये मात्र भर पडली आहे. एकटेपणा, सुरक्षितता यासोबतच आर्थिक व्यवस्थापन, आरोग्याची देखभाल अशा अनेक समस्या त्यांच्यासमोर येतात. ज्येष्ठांसाठी प्रत्येकवेळी सरकारी मदतीची वाट न पाहता समाजानेच या बाबतीत पुढाकार घ्यायला हवा, ही भावना मूळ धरते आहे.
या भावनेतूनच दिनेश सोनावणे यांनी ‘सिक्स्टीप्लस डॉट को डॉट इन’ ( ६६६.60स्र्’४२.ू.्रल्ल) हे संकेतस्थळ सुरू करण्याचे ठरवले. राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे माजी उपसंचालक महादेव सोनावणे हे त्यांचे वडील. त्यांचे गेल्या वर्षी २३ ऑगस्ट रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. आपल्या आयुष्यभरात विविध समाजोपयोगी कामांमध्ये सहभागी झालेल्या वडिलांची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी दिनेश सोनावणे यांनी संकेतस्थळाची कल्पना प्रत्यक्षात आणली.
वडील तसेच इतर वृद्ध नातेवाईक, शेजारी यांच्यासोबतच्या अनुभवातून या वयातील व्यक्तिंच्या गरजा व त्याबाबत असलेला माहितीचा अभाव लक्षात आला. आजारपण, पैशांची चणचण, एकटेपणा यांचा सामना करत असताना नेमकी मदत कुठे मागायची हेच अनेक ज्येष्ठांना माहिती नसते.
 त्यांच्या मदतीसाठी अनेक प्रकारची उपयुक्त माहिती या संकेतस्थळावर देण्याचा प्रयत्न केला आहे, असे सोनावणे म्हणाले. हे संकेतस्थळ २३ ऑगस्ट रोजी सेवेत दाखल होईल.
संकेतस्थळामध्ये काय..
* आर्थिक व्यवस्थापन – निवृत्तीनंतर हाती येणारे पैसे तसेच आयुष्यभराच्या बचतीचे व्यवस्थापन कसे  करायचे हा अनेक ज्येष्ठांपुढचा प्रश्न असतो. विविध बँकांमधील मुदतठेव योजनांवरील व्याजदर, निवृत्तीवेतन योजना, विमा योजना तसेच प्राप्तीकर सवलती याबाबत मार्गदर्शन आहे.
* सवलती – राज्य सरकार, केंद्र सरकारकडून, वाहतूक विभागांकडून लागू करण्यात आलेल्या सवलतींची माहिती.
* आरोग्य – रुग्णालयांची, २४ तास सुरू असलेल्या औषधांच्या दुकानांची यादी, नर्स, आया यांचा ब्युरो, रुग्णवाहिका सेवा, आजारपणात मदत करणाऱ्या सामाजिक संस्था, रक्तपेढय़ा, वृद्धाश्रम यांची माहिती.
* योजना – सरकारकडून वृद्धांसाठी वेळोवेळी जाहीर करण्यात येणाऱ्या योजनांची माहिती.
* उद्याने व क्लब – मुंबईतील नाना नानी पार्क, राज्यभरातील लाफ्टरक्लब, सोशल क्लब यांची माहिती.
*  चिंतन – समाजातील सेलिब्रेटी ज्येष्ठ व्यक्तींनी आयुष्याबाबत व्यक्त केलेले चिंतन, सकारात्मक विचार.