आपल्याशी संलग्न महाविद्यालयांना क्रीडा संस्कृती जोपासण्याकरिता पोषक वातावरण व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा सल्ला देणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात मात्र या आघाडीवर ‘दिव्याखाली अंधार’ असल्यासारखीच परिस्थिती आहे. कारण, विद्यापीठाच्या या भलामोठय़ा संकुलात गेल्या कित्येक वर्षांत क्रीडा स्पर्धाबरोबरच सांस्कृतिक उपक्रमांचेही आयोजनही झालेले नाही. कालिना संकुलाचे क्रीडा समन्वयक पद वर्षांनुवर्षे भरण्यात न आल्याने ही उदासीनता या दोन्ही आघाडय़ांवर जाणवत आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासाकरिता आवश्यक असलेले कोणतेही व्यासपीठ सध्या विद्यापीठाच्या कालिना संकुलात नाही.
दरवर्षी मुंबई विद्यापीठातील प्रत्येक विभागातील विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांकरिता १७५ रुपये शुल्क आकारले जाते. पण, या बदल्यात कोणत्याही सांस्कृतिक अथवा क्रीडा उपक्रमांचे आयोजन केले जात नाही. कालिना संकुलात विद्यार्थी व शिक्षकांकरिता असलेल्या उपाहारगृहाच्या शेजारी जिमखाना आहे. पण, तेथे टेबल टेनिसची एकमेव सुविधा वगळता हा जिमखानाही ओकाबोकाच आहे. शिवाय येथे शिकण्याकरिता येणाऱ्या आठ-नऊ हजार विद्यार्थ्यांना एक टेबल टेनिस कसे पुरायचे, असा प्रश्न ‘प्रहार विद्यार्थी संघटने’चे अध्यक्ष मनोज टेकाडे यांनी केला.

कधी एके काळी..
क्रीडा विषयक या उदासीनतेविरोधात २००३-०४मध्ये ‘समतावादी छात्रभारती’ या विद्यार्थी संघटनेने जोरदार आंदोलनही केले होते. या आंदोलनानंतर कालिना संकुलासाठी क्रीडा समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पुढील तीन वर्षे समन्वयक कार्यरत होते. त्या काळात विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन कालिना संकुलात होत असे. क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल अशा विविध स्पर्धा तेव्हा कालिनामध्ये होत. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी या स्पर्धाचे वेळापत्रकच प्रत्येक विभागाला पाठविले जाई. विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थीही या स्पर्धामध्ये उत्साहाने सहभागी होत. परंतु, २००९-१०मध्ये या समन्वयकांची येथून बदली करण्यात आली. तेव्हापासून या दोन्ही आघाडींवर शांतताच आहे. आता तर या स्पर्धाकरिता विद्यापीठाने आर्थिक तरतूद करणेही सोडून दिले आहे. त्यामुळे, निधीचीही बोंब आहे, असा आरोप टेकाडे यांनी केला.