तालुक्यातील दुर्गम भागांत पिकणारी लालचुटूक स्ट्रॉबेरी अद्याप थंडी असली तरी येथील बाजारात दाखल झाली असून थंडीमुळे गोडव्यावर परिणाम झाला आहे. तालुक्याच्या दुर्गम भागांतील थंड वातावरण स्ट्रॉबेरीसाठी अनुकूल असल्याने स्ट्रॉबेरी बागांचे प्रमाणही वाढू लागले आहे.
आदिवासी शेतकरी नागली, भुईमूग, भात, कुळीद, उडीद, दादर, गहू या पारंपरिक पिकांसह आता शास्त्रशुद्ध पद्धतीने स्ट्रॉबेरीची बाग लावत आहे. लालभडक, लहान मोठी, आंबटगोड अशी स्ट्रॉबेरीची फळे दिसण्यास आकर्षक असल्याने कोणालाही ती घेण्याचा मोह सुटतो. तालुक्याच्या पश्चिम पट्टय़ात सुकापूर, वडापाडा, खिरंड, पळसदर आदी परिसरांतील आदिवासी शेतकरी सहा ते सात वर्षांपासून स्ट्रॉबेरी बागा यशस्वीरित्या घेत आहेत. स्ट्रॉबेरीला दरवर्षी अधिकाधिक प्रति किलो २५० ते ३०० रुपये आणि कमीत कमी १०० ते २०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी ही फळबाग नगदी ठरू लागली आहे. एक किलो किंवा दोन किलोचे खोके भरून शेजारील गुजरात राज्यात सुरत, बिल्लीमोरा, वघई, भरूच, वाझदा येथे पाठवले जातात. सप्तशंृगिगड, नांदुरी, शिर्डी, सापुतारा रस्त्यांवरही ठिकठिकाणी स्ट्रॉबेरी विकताना शेतकरी दिसतात. याशिवाय कळवणच्या बाजारात टोपलीतून स्ट्रॉबेरीची विक्री केली जाते. सतत चार महिने फळ मिळत असल्याने स्ट्रॉबेरी बागेकडे आदिवासी शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आ्रहे. तालुक्यातील पळसदर, सुकापूर परिसरात तसेच बोरगाव, घाटमाथ्याच्या भागालगत हवामान नेहमी थंड असते. स्ट्रॉबेरी शेतीसाठी हे वातावरण पोषक आहे. त्यामुळे या परिसरात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न मोठय़ा प्रमाणावर होऊ लागले आहे. सेल्वा, राणी यांसह कमी दिवसात लालभडक मोठे फळ देणाऱ्या स्ट्रॉबेरीचे अन्य वाण येथील आदिवासी शेतकरी महाबळेश्वर येथून १० ते १५ रुपयास एक रोप या दराने आणतात. स्ट्रॉबेरीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या हातात थोडय़ाफार प्रमाणात पैसा खेळू लागला आहे.