अपघातामुळे किंवा जन्मजात अपंगत्वामुळे हात गमावणे दुखद असले तरी त्यामुळे खचून न जाता, हातांनाही साधणार नाही असे कौशल्य आत्मसात करून आत्मविश्वासाचा नवा आदर्श जगासमोर ठेवणारी कलावंतांची पिढी जोपासण्याचे काम हात नसलेल्यांच्याच एका संघटनेकडून अव्याहतपणे सुरू आहे. हात नाहीत म्हणून काही अडत तर नाहीच, उलट, हातांनाही अभावानेच साधणारी कला तोंड आणि पायाच्या माध्यमातून कागदावर उतरविणाऱ्या अनेक चित्रकारांनी रंगांच्या दुनियेवरील आपले श्रेष्ठत्व सिद्ध करून अपंगत्वावरही मात केली आहे.
हात नसलेल्या ८०० अपंग कलावंतांची माऊथ अँड फूट पेंटिंग आर्टिस्टस असोसिएशन (एमएफपीए) ही संघटना आणखी दोन वर्षांनी साठ वर्षांची होईल. १९५६ साली स्थापन झालेली ही संघटना अशा अपंगांनीच चालविली आणि अपंगांच्या हितासाठीच या संघटनेने अनेक उपक्रमही केले. जन्मत किंवा आकस्मिक कारणांमुळे हात गमावून अपंगत्व आलेल्या कलावंतांनी तोंडात किंवा पायाच्या बोटांमध्ये ब्रश पकडून कॅनव्हासवर आपल्या प्रतिभेला रंगांचे लेणे चढवून जिवंत केलेली चित्रे पाहताना, हात नसलेल्या कलावंतांनी काढलेली चित्रे असतील यावर विश्वासही बसत नाही. ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा अपंग कलावंतांच्या हितासाठी काम करते. जवळपास ७५ देशांमध्ये कार्यरत असलेल्या या संस्थेच्या सदस्यांची ५० हजारांहून अधिक चित्रे जगभरातील विविध ठिकाणांची शोभा वाढवत आहेत. या चित्रकारांनी काढलेल्या कलाकृतींची प्रदर्शने भरवून त्यातून उभ्या राहणाऱ्या निधीचा विनियोग या कलावंतांच्या उदरनिर्वाहासाठी केला जातो. संस्थेच्या पाठबळामुळे अपंगत्वावर मात करून स्वाभिमानाने जगण्याचा आत्मविश्वास या कलावंतांमध्ये दुणावला आहे. आपली कला जोपासण्यासाठी प्रत्येक सदस्याला संघटनेकडून दरमहा आर्थिक सहकार्य केले जाते. या साह्य़ातून साहित्य खरेदी करून या कलावंतांनी तयार केलेल्या चित्रकृतींची विक्री करून त्यांना उदरनिर्वाहदेखील करता येतो, असे संस्थेचे व्यवस्थापक परेश पडिया यांनी सांगितले. या संस्थेचीच एक उपशाखा भारतात आयएमएफपीए या नावाने कार्यरत असून ना नफा तत्वावर विश्वस्त वृत्तीने काम करते, असे ते म्हणाले.
रंगांची सुंदर संगती, वातावरणाची छाप आणि चित्राच्या स्वभावाची नेमकी नस पकडणारा कुंचला अशा अद्भुत त्रिवेणी संगमाचा अनुभव देणाऱ्या या चित्रकृतींचे एक अनोखे प्रदर्शन सध्या वांद्रे कुर्ला संकुलातील ‘सोफिटेल’मध्ये सुरू आहे. सकाळी ११ ते सायंकाळी सात या वेळात ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनात तोंड आणि पायांच्या बोटांमधून साकारलेली सुंदर चित्रे पाहावयास मिळतील..