पुण्यानंतर एज्युकेशनल हब म्हणून नावारूपास आलेल्या नवी मुंबई या सायबर सिटीला आता एका वेगळ्याच समस्येने घेरले असून शाळा, कॉलेज, उद्यान, निर्जन ठिकाणे, खाडीकिनारे या ठिकाणी एमडीएमए अर्थात एमडी या अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुण पिढीचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले आहे. अमली पदार्थ सेवनामुळे उद्ध्वस्त झालेल्या अनेक तरुणांना आता पुनवर्सन केंद्राचा आधार घ्यावा लागत आहे. मासे विकून पोट भरणाऱ्या एका महिलेचा तरुण मुलगा या नशेच्या गर्तेत डुबल्याने त्याच्यासाठी पुनर्वसन केंद्रात जागा शोधण्याची वेळ त्या कुटुंबावर आली आहे. एमडी पदार्थाच्या या वितरण साखळीत नायजेरियन नागरिक मोठय़ा प्रमाणात सक्रिय असून प्रकल्पग्रस्तांनी बांधलेल्या अनधिकृत बांधकामे ही या एमडीपुरवठादारांचे अड्डे झाले आहेत.
नवी मुंबईत ४५० पेक्षा जास्त शाळा आणि १७६ विविध अभ्यासक्रमांची कॉलेज आहेत. त्यामुळे एमडी अमली पदार्थ वितरित करणाऱ्या टोळीची चांगलीच चंगल झाली आहे. नशा लागेपर्यंत २०० रुपयात एक ग्रॅमची पुडी विकणारी ही टोळी नशाबाज झाल्यानंतर तिच पुडी पाच हजार रुपयांना विकत आहे. नेरुळमधील एका प्रथितयश महाविद्यालयातील काही विद्यार्थी विद्यार्थिनींनी मध्यंतरी ही नशा आणणारी पावडर मागिवली होती. तिचे वितरण करताना नेरुळ सिग्नलजवल काही तरुणांना अमलीविरोधी पथकाने अटक केली होती. अशाच प्रकारे वितरण करणारी एक टोळी जुईगाव व खैरणे बोनकडे भागात सध्या कार्यरत  असून या टोळीने वाशी सेक्टर ९ व १० मधील मुला-मुलींना या एमडी पावडरचे व्यसन लावले आहे. यात काही अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. वाशी सेक्टर दहामध्ये असलेल्या एका उद्यानाच्या भिंतीमागे या पावडरचे वितरण दिवसाढवळ्या केले जात आहे.
 मुलींबरोबरच लहान मुलांनाही ही टोळी जाळ्यात खेचत आहे. खैरणे, बोनकोडे, पावणे, जुईगाव या गावांत बांधण्यात आलेल्या अनधिकृत चाळी व इमारतींमध्ये राहणारे नायजेरियन नागरिक हे या अमली पदार्थाचे वितरक असून कोपरी गावातील एक प्रकल्पग्रस्त तरुण या टोळीत सामील झाल्याने ही नशा प्रकल्पग्रस्तांच्या घरात घुसली आहे. वाशीच्या शहरात मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या घरातील एक तरुण अशाच प्रकारे उद्ध्वस्त झाला असून या एमडी ड्रगसाठी त्याने गळ्यातील सोन्याचे दागिने विकून टाकले आहेत. वाशी, कोपरखैरणे, घणसोली या उपनगरात खैरणे बोनकोडे या गावातून एमडीचा पुरवठा केला जात आहे. पोलिसांनी या संर्दभात मध्यंतरी खूप मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी फुटबॉलचे सामनेदेखील आयोजित करण्यात आले होते, पण या अमली पदार्थाच्या सेवनाच्या तक्रारी करण्यास पालक पुढे धजावत नसल्याने पोलिसांची अडचण झाली आहे.
वजन कमी करण्यासाठी..
 एमडी पावडरच्या नशेमुळे झोप न येणे, भूक लागत नसल्याने काही मुली वजन कमी करण्यासाठी या पावडरचा वापर करीत असल्याचे आढळून आले आहे. ही अमली पावडर पाच-सहा दिवस घेतल्यानंतर वजन कमी होत असल्याने मोठय़ा प्रमाणात मुली या पावडरच्या आधीन  होत आहेत.
पैसा खुळखुळू लागला अन्..
साडेबारा टक्के योजनेअंतर्गत मिळालेले भूखंड, ते विकून हाती पडलेला गडगंज पैसा यामुळे प्रकल्पग्रस्तांची एक पिढी लेडीज बारमध्ये बरबाद झाली. लेडीज बार बंद झाल्याने आणि प्रकल्पग्रस्तांच्या हातातील पैसाही संपल्याने लेडीज बार फेम प्रकल्पग्रस्तांचे विमान जमिनीवर उतरले असतानाच या दुसऱ्या नशेने प्रकल्पग्रस्तांना कवेत घेण्यास सुरुवात केली आहे. खिशात सहज मिळणारा पैसा खुळखुळण्याची सवय लागल्याने प्रकल्पग्रस्तांनी कुर्ला, मुंब्रा, भांडुप येथील भूमफियांना हाताशी धरून अनधिकृत चाळी व इमारती बांधण्याचा सपाटा लावला आहे. या घरांच्या विक्री व भाडय़ामुळे काही प्रकल्पग्रस्तांच्या हातात पुन्हा पैसा खुळखुळू लागला असून त्याच्या तरुण पिढीला एमडी ड्रगच्या टोळीने जाळ्यात खेचण्यास सुरुवात केली आहे.
अमली पदार्थ सेवनाच्या विरोधात पोलिसांनी वेळोवेळी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. काही पुरवठादाराच्या विरोधात कारवाई करण्यात आली असून काही तरुणांना समज देऊन सोडून देण्यात आले आहे. ही एक सामाजिक चळवळ असून त्यासाठी नागरीकांनी देखील पुढाकार घ्यायला हवा आहे. तक्रार करण्यास पुढे आल्यास कारवाई निश्चित केली जाणार असून संशयित ठिकाणांची चौकशी केली जाईल.
शहाजी उमप, उपायुक्त, नवी मुंबई पोलीस.