डॅनिएल बॅरिगन यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाल्याची वार्ता शनिवारी आधी अमेरिकेत, मग जगभर पसरली आणि व्हिएतनाम युद्धाला त्यांनी केलेल्या सक्रिय विरोधाच्या अध्यायाला उजाळा मिळाला. अर्थात, व्हिएतनाम युद्धविरोध ही त्यांची एकमेव ओळख नव्हे. अखेरच्या काही वर्षांत आजारपणाने बिछान्याला खिळले, तोवर अनेक प्रकारे शांततावादी चळवळींना बळ देऊन त्यांनी केवळ अमेरिकी सत्ताधाऱ्यांपुढेच नव्हे, तर कॅथोलिक ख्रिस्ती धर्मापुढेही नवे प्रश्न उभे केले होते.
डॅनिएल हे ख्रिस्ती धर्मोपदेशक. ‘रेव्हरंड फादर’ या उपाधीनिशीच ते वयाच्या तिशीपासून ओळखले गेले. पण त्याहीआधी ते कवी! दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम त्यांनी ऐन विशीत पाहिला, पण ते तेव्हा सेमिनरीत धर्मशिक्षण घेत होते. जगाला अमेरिकेने संहाराची दीक्षा दिल्याचे पाहात असतानाच त्यांच्या कवितेला धार येत होती. ‘उपदेश- उपासना- प्रसार’ या त्रिकोणात सामावूच न शकणारे त्यांचे व्यक्तित्व, भावनिक प्रतिसादाला सुयोग्य वाट करून दिल्यामुळे समर्थ होत होते. पॅरिसमध्ये अभ्यासवृत्तीवर १९६२ साली गेले असता त्यांनी १९६० सालातला फ्रेंच बंडखोरीचा विचारप्रवाह अगदी जवळून आकळून घेतला. एव्हाना, अमेरिकेच्या स्वघोषित जगत्पोलीसगिरीचा ‘व्हिएतनाम अंक’ सुरू झालेला होता. डॅनिएल फ्रान्सहून तडक व्हिएतनामलाच पोहोचले. ‘सदिच्छापर कृती’ म्हणून ज्या तिघा अमेरिकी युद्धबंद्यांची सुटका ते तेथे असताना झाली होती, त्या तिघा तरुणांना बरोबर घेऊनच ते मायदेशी परतले. ‘देशप्रेम’, ‘देशसेवा’ वगैरे भलामण करून तरुण मुलांची आयुष्ये व्हिएतनाममध्ये पणाला लावली जात आहेत, हे आता त्यांनी प्रत्यक्ष पाहिले होते. इथून पुढे युद्धविरोध केवळ तोंडी नको, अशा धारणेतून त्यांनी १९६८साली धाकटे बंधू फिलिप तसेच अन्य सात जणांसह युद्धभरती केंद्रात घुसून ‘यशस्वी उमेदवारां’च्या फायली बाहेर काढल्या आणि कचऱ्याच्या पिंपात टाकून शांतपणे जाळल्या. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली या नऊही जणांना दोन ते साडेतीन वर्षे कैदेच्या शिक्षा झाल्या. ‘या प्रकरणाकडे लक्ष वेधणे, म्हणजे युद्धविरोधाचा प्रसार’ हे ओळखून डॅनिएल कैदेआधीच भूमिगत झाले; पण चार महिन्यांनी पकडले गेले. त्यांचा भाऊ मात्र दोन वर्षे भूमिगत होता. तरुंगवासात डॅनिएल यांनी या ‘कॅन्टन्सव्हिले नाइन’ खटल्यातील नाटय़ आणि संदेश स्पष्ट करणारी एकांकिका लिहिली, तिच्यावर पुढे चित्रपटही निघाला.
राजकीय विचारधारेची तळी उचलून धर्मोपदेशकाने आंदोलने करावीत का, कैदेची शिक्षा सुनावला गेलेला ‘दोषी’ माणूस धर्मोपदेशक म्हणून कायम राहू शकतो का, या प्रश्नांची पुरोगामी- प्रागतिक उत्तरे देणे आणि अमलात आणणे अमेरिकी जेझुइटांना डॅनिएल यांच्यामुळे भाग पडले. पुढे १९८०मध्ये चर्चमधील सहकाऱ्यांनिशी त्यांनी अण्वस्त्रविरोधी ‘प्लोशेअर चळवळ’ सुरू केली. तिचे काम आजही सुरू आहे.