फुलातील परागकण मधमाश्यांच्या पायांना चिकटून सगळीकडे पसरतात. त्यामुळे वनस्पतींच्या पुनरुत्पादनातील मोठी प्रक्रिया पूर्ण होत असते. त्यामुळे परागकणांचे महत्त्व मोठे आहे. मात्र याच परागकणांमुळे अ‍ॅलर्जी होऊन माणसाला अस्थमासारखे विकारही होतात. परागकणांचे एक शास्त्र आहे, त्याला पॅलिनॉलॉजी म्हणतात. या शास्त्रातील आपल्या देशातील सर्वोच्च वैज्ञानिक पी.के.के. नायर हे होत, त्यांचे नुकतेच निधन झाले. भारतात परागकणशास्त्राचा विकास व प्रसार त्यांनीच केला होता.

सपुष्प वनस्पतींमध्ये अँजियोस्पर्मस असतात, त्याबाबतचा ‘ट्रायफायलेटिक सिद्धांत’ त्यांनी मांडला होता. हवेत असणाऱ्या कणांचा डेटाबेस त्यांनी एरोस्पोरा नावाने तयार केला होता. या कणांमुळे मानवाला अ‍ॅलर्जी होऊन श्वासाचे विकार जडत असतात. जैवतंत्रज्ञान अभ्यासतंत्रे वापरून त्यांनी काही नर जनुके शोधून काढली होती, ती वनस्पतींच्या उत्पादनात सुधारणा करणारी होती. त्यांनी एकंदर २० पुस्तके लिहिली व २५० शोधनिबंध प्रकाशित केले.

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
ग्रामविकासाची कहाणी

नायर यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९३० रोजी केरळातील चांगनासेरी येथे झाला. त्यांचे शिक्षण सेंट बेर्चमन महाविद्यालयातून झाले व नंतर त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून पुढील अभ्यास केला. लखनऊतील बिरबल सहानी इन्स्टिटय़ूट ऑफ पॅलिओबॉटनी या संस्थेत संशोधन सुरू केले. लखनऊ विद्यापीठातून त्यांनी पॅलिओबॉटनीत पीएच.डी. केली. आर. एन.  लखनपाल व स्वीडनचे गुन्नर एर्डटमन यांनी त्यांना मार्गदर्शन केले होते. नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये असताना त्यांनी पर्यावरण, बगीचा नियोजन, पोलन मॉर्फोलॉजी, एरोबायोलॉजी, इकॉनॉमिक बॉटनी अशा अनेक विषयांत संशोधन केले. त्यांच्या ३८ वर्षांच्या व्यावसायिक जीवनात ते लखनऊ येथील कौल सायन्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व द एनव्हायर्नमेंट रीसोर्स रिसर्च सेंटरचे संस्थापक संचालक होते. सीएसआयआरमध्ये त्यांना ‘सुप्रतिष्ठ (तहहयात) वैज्ञानिक’ हे पद देण्यात आले होते. तिरूअनंतपुरम येथील ट्रॉपिकल बोटॅनिक गार्डन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेचे ते उपसंचालक होते. जीवाश्म वैज्ञानिक बिरबल सहानी म्हणत की, परागकणशास्त्राला आपल्याकडे भरपूर वाव असूनही प्रशिक्षित मनुष्यबळ नाही. ते आव्हान नायर यांनी स्वीकारले. त्यांनी या क्षेत्रात त्यांचा शब्द अंतिम एवढे मोठे स्थान निर्माण केले तसेच विद्यार्थीही घडवले. त्यांचे संशोधन हे कटीबंधीय जीवशास्त्र, परिस्थितीकी, शाश्वत विकास, परागकणशास्त्र यात होते. मधमाश्या परागकण वाहून नेतात त्यामुळे मोहरी व तेलबियांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात वाढते हे प्रयोगान्ती सिद्ध झालेले आहे. चीनमध्ये तर ट्रक भरून मधमाश्या शेतात सोडल्या जातात; यावरून परागकण व मधमाशीचे त्यातील स्थान लक्षात यावे. विशेष म्हणजे त्यांनी १९६४ मध्ये सुरू केलेली पॅलिनॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया ही परागकण संशोधन शास्त्रास वाहिलेली संस्था हा त्यांचा फार मोठा वारसा आहे. त्यांनी लिहिलेले ‘इसेन्शियल्स ऑफ पॅलिनोलॉजी’ हे पुस्तक परागकणशास्त्रावरील रूढार्थाने पहिले क्रमिक पुस्तक होते. केवळ भारतातच नव्हे तर टेक्सास विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागात ते अभ्यासले जात होते. ब्रिटिश कौन्सिलचे अभ्यागत, रशियाच्या अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य असे अनेक सन्मान त्यांना प्राप्त होते.