18 October 2017

News Flash

सॅम्युएल अ‍ॅलन काऊंटर

एका मानववंशशास्त्रीय सत्यकथेतील दुवे शोधणारा असा जगाचा वाटाडय़ा पुन्हा होणे नाही.

लोकसत्ता टीम | Updated: July 24, 2017 12:30 AM

मानवी वंशाचा इतिहास शोधणे ही खरे तर संयमाची व तपश्चर्येची परीक्षा. अशा विषयांचा अभ्यास करण्यासाठी मुळातूनच ध्यास आणि आस लागते ती सॅम्युएल अ‍ॅलन काऊंटर यांच्याकडे होती. त्यामुळे आफ्रिकी अमेरिकी लोकांच्या वांशिक मुळाचा शोध घेण्याचे त्यांचे प्रयत्न होते. पण मानववंशशास्त्रज्ञ एवढीच त्यांची ओळख नव्हती तर ते न्यूरोबायॉलॉजी प्राध्यापक व हार्वर्ड फाऊंडेशन फॉर इंटरकल्चरल अ‍ॅण्ड रेस रिलेशन्स या संस्थेचे संस्थापक संचालक होते. त्यांच्या निधनाने बहुवांशिक लोकांचे स्वागत करणारा खरा मानवतावादी हरपला आहे.

सध्या अमेरिकेत जे भेदाभेद करण्याचे राजकारण सुरू आहे त्यापेक्षा एकदम उलटी भूमिका घेत त्यांनी सर्व वंशांच्या लोकांना अमेरिकेत स्थान मिळावे यासाठी प्रयत्न केले. त्यांचा जन्म जॉर्जियातील अमेरिकस येथे झाला व नंतर फ्लोरिडातील बॉयटन बीच येथे त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील उद्योग व्यवस्थापक तर आई परिचारिका. टेनिसी स्टेट युनिव्हर्सिटीतून त्यांनी पदवी घेतली तर क्लीव्हलॅण्ड येथील केस वेस्टर्न रिझव्‍‌र्ह युनिव्हर्सिटीतून ते न्यूरोबायॉलॉजीत डॉक्टरेट झाले. स्टॉकहोमच्या कॅरोलिन्स्का इन्स्टिटय़ूट या प्रसिद्ध संस्थेतून ते वैद्यकशास्त्रातील डॉक्टर झाले. त्यांनी मूळ आफ्रिकी लोकांचा शोध घेताना त्यांचा वंशशास्त्रीय अभ्यास केला. त्यातून इक्वेडोर व सुरीनामच्या नेहमीच्या जगापासून दूर राहिलेल्या लोकांवर त्यांनी लघुपट काढले. त्याला पुरस्कारही मिळाले. १९७०च्या दशकात स्वीडनमध्ये विद्यार्थी म्हणून अभ्यास करीत असताना त्यांनी ग्रीनलॅण्डमधील गडद रंगाची त्वचा असलेल्या रहिवाशांच्या गोष्टी ऐकल्या होत्या. त्यानंतर त्यांची माहिती घेण्यासाठी त्यांनी खरोखर उत्तर ग्रीनलंडला भेट दिली व तेथे आठ घरांच्या एका वसाहतीत ते गेले, तेव्हा एक म्हातारा माणूस बाहेर आला. त्याला काऊंटर यांनी दुभाषामार्फत त्यांचे नाव सांगितले व मॅथ्यू (हेन्सन) यांच्या मुलाचा आपण शोध घेत आहोत असे सांगितले. त्यावर तो म्हणाला की, अहो तो मीच आहे. यातील मॅथ्यू म्हणजे १९०९ मध्ये उत्तर ध्रुवावर गेलेल्या रॉबर्ट पिअरी यांच्या मोहिमेतील आफ्रिकी अमेरिकी संशोधक मॅथ्यू हेन्सन. त्याकाळी हे दोघे उत्तर ध्रुवावर गेले होते व त्यांचे तेथील एस्किमो स्त्रियांशी लैंगिक संबंधही होते. त्यातून जन्मलेल्यांपैकी एक म्हणजे मॅथ्यू यांचा हा मुलगा. ग्रीनलॅण्डमधील लोकांना कर्णबधिरता कुठल्या जैविक कारणामुळे आली नाही तर पूर्वी ते बंदुकीचे आवाज काढत सीलची शिकार करायचे त्यातून हे वैगुण्य आले, असा महत्त्वाचा शोध त्यांनी लावला होता. काऊंटर हे १९७० नंतर ग्रीनलॅण्डला गेले तेव्हा त्यांना हेन्सन व पिअरी या द्वैवांशिक संशोधकांचे वंशज तर सापडले पण त्यांची इतर वैशिष्टय़े व त्यामागची कारणे कळली. अमेरिकी इतिहासात प्रत्येक तळटिपेत हेन्सन यांचे नाव आहे व ते पिअरी यांचे सहायक होते असे म्हटले आहे. थोडक्यात हेन्सन यांना कमी महत्त्व दिले होते, पण काऊंटर यांनी इतिहासात दुरुस्ती केली. हेन्सन यांच्याकडे उत्तम कौशल्ये होती, ते इन्युइट भाषा बोलू शकत होते व उत्तर ध्रुवावरील मोहिमेत त्यांचा मोठा वाटा होता हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. हेन्सन यांचे वंशज शोधण्याचा ध्यास काऊंटर यांनी घेतला होता त्यात ते यशस्वी झाले.   पिअरी हे नौदलात यशस्वी कारकीर्द करून गेले तर हेन्सन हे समाजापासून दूर कुठे तरी परागंदा अवस्थेत मरण पावले. पिअरी व हेन्सन हे उत्तर ध्रुवावर गेलेच नव्हते असेही काही जणांचे दावे आहेत, पण ते नक्की गेले होते हे छातीठोकपणे सांगितले ते काऊंटर यांनीच. एका मानववंशशास्त्रीय सत्यकथेतील दुवे शोधणारा असा जगाचा वाटाडय़ा पुन्हा होणे नाही.

First Published on July 24, 2017 12:30 am

Web Title: dr s allen counter personality