लॅपटॉप संगणक हा प्रकार जेव्हा कल्पनेतही नव्हता तेव्हा त्याच्या विकसनाच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका पार पाडणारे जॉन एलेनबी हे संगणक अभियंता होते. त्यांच्या निधनाने संगणक विज्ञानातील एक मोठा संशोधक गमावला आहे. १९८० मध्ये त्यांनी कॅलिफोर्नियात माऊंटन व्हय़ू येथे ग्रिड सिस्टीम्स ही कंपनी स्थापन केली, त्यात त्यांना औद्योगिक रचनाकार विल्यम माग्रिज यांनी साथ दिली. त्यानंतर त्यांनी सपाट पडदे असलेल्या नारिंगी प्रकाश बाहेर टाकणाऱ्या क्लॅमशेल संगणकाची निर्मिती केली.

ग्रिड कंपास हा पहिला क्लॅमशेल लॅपटॉप संगणक इतिहासात मानाचे स्थान मिळवणारा ठरला. अमेरिकी हेर, व्हाइट हाऊस, पेंटॅगॉन अधिकारी यांच्यासाठी ते महत्त्वाचे साधन होते. १९८६ मध्ये चॅलेंजर अवकाशयान दुर्घटनेत यान जळून गेले, पण हा संगणक जसाच्या तसा राहिला. यात बबल मेमरी पद्धत वापरली होती व त्याची किंमत आजच्या दराने २०२३५ डॉलर होती, त्यामुळे त्याला मोजके ग्राहक होते. अमेरिकेच्या विशेष कारवाई दलातही त्याचा वापर होता. अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचे सुरक्षा सल्लागार जॉन पॉइंडेक्स्टर या कंपासचा वापर करीत असत.

मोकळय़ा वेळात एलेनबी याच कंपासचा वापर करून आयबीएम इलेक्ट्रॉनिक मेल यंत्रणा सुधारण्याच्या प्रयत्नात होते. एलेनबी यांचा जन्म उत्तर इंग्लंडमध्ये कॉरब्रिजचा. त्यांनी अर्थशास्त्र व भूगोल या विषयांचा अभ्यास युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे केला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही शिकले. तेथे ते संगणक विषयाकडे वळले. फेरांटी कंपनीत संगणक संशोधन करतानाच, एडिनबर्ग विद्यापीठात ते संगणक विज्ञानावर व्याख्याने देऊ लागले. १९७० मध्ये ते उत्तर कॅलिफोर्नियात झेरॉक्स कॉर्पोरेशनमध्ये रुजू झाले. त्या वेळी तेथे अल्टो या डेस्कटॉप संगणकनिर्मितीचे काम चालू होते.

‘अल्तो’ हे अ‍ॅपल संगणकांचे पूर्वरूप मानले जाते. झेरॉक्स कंपनीत वैज्ञानिक अ‍ॅलन के यांनी कुठेही नेता येणाऱ्या इंटरिम डायनाबुक या संगणकाची संकल्पना मांडली होती. एलेनबी यांनी अल्टो-२ संगणकाच्या निर्मितीत मोठी भूमिका पार पाडली. ‘तंत्रज्ञानाचे उत्पादनात रूपांतर करणारे’ अशी त्यांची ख्याती होती. सहजगत्या सगळीकडे नेता येणारा संगणक हे तंत्रज्ञानाचे आव्हान त्यांनी पेलले, व्हाइट हाऊसला भेट दिल्यानंतर सगळी माहिती ज्यात बसेल, पण ब्रीफकेसमध्ये मावेल असा संगणक हवा अशी अपेक्षा एका अधिकाऱ्याने त्यांच्याकडे व्यक्त केली होती. तेव्हा एलेनबी अवघड आहे, म्हणाले, पण नंतर ते त्यांच्याच प्रयत्नातून शक्य झाले.  त्यांनी ग्रिड ही कंपनी स्थापन केली. अनेक संगणक जोडून आंतरजाल बनवण्याची कल्पना त्यांच्या संशोधनात होती. त्यासाठी त्यांनी ग्रिड सेंट्रल ही सुविधा तयार केली. पुढे ग्रिड कंपनी विकून अ‍ॅजिलीस कंपनी सुरू केली. त्यात ते हातात धरता येतील असे टॅब्लेट संगणक तयार करीत होते. त्यांना व्यवसाय जमला नाही, तरी सहजगत्या सगळीकडे नेता येणारा संगणक हे तंत्रज्ञानाचे आव्हान त्यांनी पेलले.