चारचौघांसारखे आयुष्य जगत असताना कलेचा प्रांत त्यांना खुणावत होता. त्यासाठी कलेची पदवी हाती घेऊन ते नाशिकमध्ये आले. पोटाची खळगी भरण्यासाठी सुरक्षारक्षक, साइन बोर्ड तयार करणे अशी पडेल ती कामे करीत त्यांनी रंगमंचाशी नाळ जोडली. राज्य नाटय़ स्पर्धेतून प्रवास सुरू करीत राज्यस्तरीय पुरस्कारांवर नाशिकची मोहर उमटवली. हा चित्रमय प्रवास आहे, कला दिग्दर्शक अरुण विठ्ठल रहाणे यांचा.

नेपथ्यात अनोखी शैली निर्माण करणाऱ्या या कलावंताचे मूळ गाव अहमदनगर जिल्हय़ातील पुणतांबा होते. नगर येथील जे. डी. कला महाविद्यालयात त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. कामाच्या शोधात पुढे आई, पत्नी शकुंतला यांच्यासमवेत नाशिकला आले. तेव्हा उदरभरण हा मुख्य हेतू असला तरी कला क्षेत्राविषयीची ऊर्मी त्यांना शांत बसू देत नव्हती. तत्कालीन विकास व सर्कल चित्रपटगृहात त्या वेळी इंग्रजी चित्रपट पाहणाऱ्यांची गर्दी होत असे. या चित्रपटांची प्रसिद्धी करण्यासाठी चित्रपटातील ‘कॅचलाइन’ पकडत साइन बोर्ड तयार करण्याचे काम रहाणे यांनी हाती घेतले. कारखान्यात कामगार म्हणून काम करीत असताना रंगभूषाकार माणिक कानडे यांच्या ‘सन्मित्र’ संस्थेशी त्यांचा संबंध आला. तेव्हापासून त्यांना आपले कौशल्य सादर करता येईल असे व्यासपीठ उपलब्ध झाले. राज्य नाटय़ स्पर्धेसाठी नेपथ्यरचनेची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. आधी संहिता वाचायची, दिग्दर्शकाला काय हवे ते समजून घ्यायचे. कमीत कमी जागेत आवश्यक त्या वस्तूंचा उपयोग करीत त्यातील भव्यता जपणे यात त्यांची हातोटी होती. त्यांच्या अनोख्या शैलीने ‘रहाणे आणि बक्षीस’ हे समीकरण होऊन गेले. रंगमंचावरचा प्रवास सुरू असताना त्यांनी कमी खर्चाचे अनेक हिंदी चित्रपटही केले. हा अनुभव फार चांगला होता असे म्हणण्यापेक्षा त्यांच्यातील कलावंत आणि माणूस या माध्यमातून समोर येत गेला. कोणालाही नाही म्हणायचे नाही, आपले काम प्रामाणिकपणे करायचे, हा शिरस्ता त्यांनी आजन्म सांभाळला. मित्रांच्या गोतावळ्यात रमणारे रहाणे यांची कला क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांकडे नजर असायची. ‘तोचि एक समर्थ’ या चित्रपटातून त्यांची कला दिग्दर्शक म्हणून सर्वाना ओळख झाली. त्यांच्या शैलीमुळे राजीव पाटील यांच्यासमवेत सावरखेड एक गाव, ब्लाइंड गेम, सनई चौघडे, वंशवेल असे अनेक चित्रपट केले. ‘सावरखेड एक गाव’साठी त्यांना राज्य पुरस्कार मिळाला. याशिवाय जत्रा, बकुळा नामदेव घोटाळे, कवडसे, निशाणी डावा अंगठा यांसह ७० हून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी कला दिग्दर्शक म्हणून काम पाहिले. अनेक चित्रपटांसाठी नामांकन झाले. यशाचा आलेख उंचावत असताना रहाणे यांनी मुलगा प्रसादला सोबत घेतले. यामुळे कला क्षेत्रात आज त्याचीही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. कला दिग्दर्शनाचा प्रवास यशस्वी होत असताना रहाणे यांनी ‘रेती’ चित्रपटासाठी कार्यकारी निर्माता म्हणून काम करण्याचे ठरवले. हा आयुष्यात पहिल्यांदा चुकलेला निर्णय त्यांच्या यशस्वी कारकीर्दीस अवरोध ठरला, असे त्यांचे आप्त मित्र सांगतात. मात्र अपयशाचे खापर कोणावरही न फोडता शांतपणे काम करत राहायचे हे रहाणे यांनी पसंत केले. परवा वयाच्या ५७ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले आणि कलाक्षेत्रातील त्यांचा प्रवास अचानक थांबला..