आंतरराष्ट्रीय संघर्षांवर चर्चेतून मार्ग कसा काढता येईल तसेच अशा कठीण प्रसंगातही सांस्कृतिक संचित कसे राखता येईल याचा विचार ४५ वर्षीय ऑड्री आझूले यांनी सातत्याने केला. निव्वळ एखादी भूमिका मांडून त्या गप्प बसल्या नाहीत तर प्रत्यक्ष कृती करण्यावर त्यांचा भर राहिला आहे. आजच्या नेत्यांसारख्या समाजमाध्यमावर त्या नाहीत. पडद्यामागे राहून काम करणे हाच त्यांचा स्वभाव. समाजवादी विचारांचे फ्रान्सिस्को ओलांद हे फ्रान्सचे अध्यक्ष असताना आझूले यांनी सांस्कृतिक मंत्रालयाची जबाबदारी सांभाळताना त्यासाठी अंदाजपत्रक सहा टक्क्य़ांनी वाढवले होते. फ्रान्सच्या इतिहासात त्यांच्याच कारकीर्दीत सर्वाधिक निधी सांस्कृतिक खात्यासाठी खर्च करण्यात आला आहे. महिला कलाकारांना प्रोत्साहन देणे असो किंवा संशोधन कामासाठी त्यांनी हिरिरीने मदत केली. कलाकारांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे तसेच फ्रान्समधील ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण व्हावे यासाठी त्यांनी कायदा केला. आता युनेस्कोच्या प्रमुखपदी त्यांची निवड झाली आहे. अमेरिका युनेस्कोतून बाहेर पडलेली असताना त्यांनी जगातील एकमेव महासत्तेलाही सुनावले आहे.

संघटनेत सुधारणा करता येतात, मात्र त्यातून माघार घेणे हा मार्ग असू शकत नाही, अशा शब्दात अमेरिकेच्या युनेस्कोतून बाहेर पडण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची निवड ही फ्रान्सच्या कूटनीतीचा अनपेक्षित विजय असेच त्याचे वर्णन केले गेले. कारण यावेळी अरब राष्ट्रांना संधी मिळेल असे वातावरण होते. युनेस्कोची धुरा अनेक वर्षे युरोपियन किंवा उत्तर अमेरिकन व्यक्तीच्या हाती राहिलेली आहे. यंदा अरब व्यक्तीकडे हे पद जावे अशी मागणी होत होती. मात्र त्यांच्यातील मतभेद फ्रान्सच्या पथ्यावर पडले. अंतिम टप्प्यात कतारचे उमेदवार हमाद बिन अब्दुलअझीझ अल-कवारी  महासंचालकपदाच्या शर्यतीत होते. ३० विरुद्ध २८ अशा केवळ दोन मतांनी आझूले यांची सरशी झाली.

पॅरिसमध्ये जन्मलेल्या आझूले डाव्या विचारांची पाश्र्वभूमी असलेल्या कुटुंबात वाढल्या. युनेस्कोचे प्रमुखपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या ज्यू आहेत. त्यांचे वडील अँड्रे हे मोराक्कोचे राजे मोहम्मद यांचे सल्लागार. त्यांच्या आई कटिया बरामी या लेखिका असून मोरक्कन आहेत. फ्रान्समधील प्रसिद्ध अशा ‘ईएनए’ विद्यापीठातून त्या विशेष प्रावीण्याने पदवीधर झाल्या. देशातील अनेक दिग्गज नेते याच विद्यापीठातून घडले. फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांमध्ये त्यांनी काम केले. २००६ मध्ये फ्रान्सच्या चित्रपट उद्योगातील प्रमुख अशा सीएनसी (नॅशनल सेंटर फॉर सिनेमा अँड दि मूव्हिंग इमेज)च्या अर्थविषयक संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर २०११ मध्ये याच्याच उपसंचालक झाल्या.

ही संस्था देशातील चित्रपट उद्योगात नियामकाचे काम करते. आझूले यांच्या निवडीने अमेरिका तसेच इस्त्रायल युनेस्कोतून बाहेर पडण्याच्या निर्णयावर फेरविचार करेल अशी चर्चा आता सुरू आहे. पॅलेस्टाइनला पूर्ण वेळ सदसत्व बहाल केल्यानंतर ओबामा यांच्या काळातच अमेरिकेने युनेस्कोचा निधीचा पुरवठा थांबवला आहे. आता त्या अमेरिकेची मनधरणी करणार काय हा प्रश्न आहे.

‘वसुधैव कुटुंबकम’ या धर्तीवर जागतिक स्तरावर सर्व देशांनी एकमेकांना समजून घेणे हा युनेस्कोच्या विचारांचा गाभा आहे. जागतिक स्तरावर संवाद प्रक्रिया कायम ठेवून संघर्ष टाळणे ही आजची गरज आहे. नव्या अध्यक्षांपुढे तेच मोठे आव्हान आहे.