पॅलेस्टाइन ही संघर्षांची भूमी. याच पॅलेस्टाइनमधील अनुभव एका वेगळ्या साहित्यशैलीतून मांडत व त्यातून एक नवा आकृतिबंधाचा प्रयोग करीत लेखनाचे सामथ्र्य राखणारे आणि आपल्या कादंबऱ्यांत पॅलेस्टाइनमधील विजनवासातील जीवन उभे करणारे सिद्धहस्त लेखक म्हणजे रबाइ अल मधौन. त्यांच्या ‘डेस्टिनीज- कनसटरे ऑफ द हॉलोकास्ट अ‍ॅण्ड द नकबा’ या पुस्तकाला अरेबिक बुकर पुरस्कार मिळाला आहे.
मधौन यांचा जन्म पॅलेस्टाइनमधील, पण इस्रायल सीमेजवळच्या अल मजदाल खेडय़ातला. त्यांच्या कुटुंबाला १९४८ मध्ये विस्थापित व्हावे लागले, त्यामुळे खान युनूस छावणीत ते मोठे झाले. अलेक्झांड्रिया विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले व नंतर त्यांनी पत्रकारितेचा पेशा स्वीकारला. पॅलेस्टाइन स्वातंत्र्यलढय़ात त्यांचा सहभाग होता, पण १९८० मध्ये त्यांनी राजकारण सोडले व नंतर पूर्णवेळ लेखन सुरू केले. पत्रकार म्हणून त्यांनी बैरूट (लेबनॉन), निकोशिया (सायप्रस) व नंतर लंडन येथे काम केले. सध्या ते ब्रिटिश नागरिक असून ‘अल शर्क अल अवसात’ या वृत्तपत्राचे संपादक आहेत. ‘द लेडी फ्रॉम तेल अवीव’ ही त्यांची पहिली कादंबरी. ती एलियट कोला यांनी इंग्रजीत रूपांतरित केली आहे. ‘द इडियट ऑफ खान युनूस’, ‘द पॅलेस्टिनियन इनतिफदा’, ‘द टेस्ट ऑफ सेपरेशन’ (आत्मचरित्रात्मक कादंबरी) ही त्यांची इतर पुस्तके. आधी हुलकावणी देणारा अरेबिक बुकर पुरस्कार अखेर त्यांना मिळाला आहे. ५० हजार डॉलरचा हा पुरस्कार आहे. इस्रायलमधून जेव्हा १९४८ मध्ये पॅलेस्टिनी लोक बाहेर पडले तेव्हा त्यांना स्वत:ची ओळख नव्हती, त्यातून त्यांच्या साहित्यास प्रेरणा मिळाली. त्यांच्या कादंबरीला काहीशी दु:खाची किनार असून आताच्या अडचणीवर प्रकाश टाकताना ते मागच्या काळात फ्लॅशबॅक तंत्राने आपल्याला घेऊन जातात. स्थलांतरितांची दु:खे त्यातून त्यांनी समर्थपणे मांडली आहेत.
नकबा म्हणजे शोकांतिका. ती त्यांच्या वाटेला १९४८ मध्ये विस्थापित होताना आली. मातृभूमीतच पेलाव्या लागणाऱ्या दु:खांची किंमत वेगळी असते. आता त्यांना जो अरेबिक बुकर पुरस्कार मिळाला आहे तो लंडनच्या बुकर प्राइज फाऊंडेशनचा आहे. या पुरस्कारामुळे आता त्यांच्या सगळ्या साहित्यकृती इंग्रजीत भाषांतरित होतील. त्यांच्या आताच्या पुस्तकाने पॅलेस्टिनी लोकांना तर आनंद झालाच, पण मीही आनंदित आहे, असे मधौन सांगतात. या कादंबरीच्या घडणीत हैफा शहराचा मोठा वाटा आहे. या शहराने लेखकाला अभिरुची, तपशिलातील वर्णने व स्मृतींची पाने चाळायला शिकवले. पॅलेस्टाइनच्या सर्व शहरांचे प्रातिनिधिक रूप त्यांना हैफात सापडले. ही कादंबरी चार भागांत आहे. त्यात पॅलेस्टिनींचा विजनवास.., इस्रायली अरब.., जे मागे राहिले ते.. व ज्यांनी मातृभूमी सोडण्यास नकार दिला ते.. अशांच्या जीवनातील भावनिक आंदोलने मोठय़ा पटावर त्यांनी रेखाटली आहेत.