राधा, येशू आणि कावळा.. क्वचित अगदी अमूर्त भासणारी निसर्गदृश्ये. सुहास रॉय यांची १९५७ पासूनची कारकीर्द एवढय़ा मोजक्याच चित्रविषयांमध्ये मावणारी आहे आणि नाहीसुद्धा. आहे, कारण त्यांनी खरोखरच अगदी मोजक्या चित्रविषयांवर काम केले. स्त्रीच्या चेहऱ्याचे, कधी कधी देहाचे चित्रण करून त्यास ‘राधा’ हेच शीर्षक देण्याची त्यांची रीत तर एवढी ग्राहकप्रिय झाली की समीक्षकांना किंवा आवडीने चित्रे पाहणाऱ्यांना जिथे तिथे हीच चित्रे पाहावी लागून कसेसेच वाटू लागावे. पण म्हणून सुहास रॉय यांनी ग्राहकांचा वा बाजाराचा अनुनय केला असे मात्र अजिबात म्हणता येणार नाही. त्यांच्या चित्रांची प्रकृतीच सौंदर्यशोध घेणारी. हे सौंदर्य येशूच्या करुणेत असायचे, तितकेच मुग्ध चेहऱ्याच्या आणि आशेने भरलेल्या डोळ्यांच्या राधेत. कधी कावळ्याच्या निस्संगपणातही हाच सौंदर्यशोध सुरू राही. या सौंदर्यशोधात जे गवसले, ते पोत (टेक्स्चर) आणि कृतिपूर्णता (जेश्चर) या दोहोंचा मेळ घालणारे होते. गुळगुळीत चेहरा, आरस्पानी डोळे, कुरळा केशसंभार.. येशूच्या चेहऱ्याने झेललेल्या दु:खांचे जाळे.. काळा असूनही शाईच्या एकथरी फटकाऱ्यात साकारलेला कावळा.. निसर्गदृश्यांत तर हाती असलेल्या रंगसाधनांच्या सर्वच्या सर्व शक्यता वापरून नवीच चित्रभूमी निर्माण करण्याची धडपड, हे सारे त्या टेक्स्चर-जेश्चरच्या फुगडीसारखे. कधी संपणार नाही, संपूच नये, असे वाटणारे.

सुहास रॉय यांची निधनवार्ता मंगळवारी आली, तेव्हा ऐंशी वर्षांचे असूनही न थांबलेल्या या चित्रकाराच्या सातत्यामागचे आयुष्य मात्र तितके सोपे नव्हते, हे पाहण्याचा क्षण इतरांसाठी आला. ढाक्यानजीक जन्म, दहा-अकरा वर्षांचे असताना फाळणीचे घाव सोसत कोलकाता, ड्रॉइंग चांगले म्हणून ओढगस्तीतही कलाशिक्षण आणि मुद्राचित्र (प्रिंटमेकिंग) प्रकारातील प्रावीण्यामुळे थेट पॅरिसला शिष्यवृत्तीवर जाण्याची संधी, ‘अटेलिए १७’मध्ये रेषांचे जाळे विणणारी वास्तवातीत मुद्राचित्रे करणाऱ्या स्टॅन्ले हेटर यांच्या हाताखाली दीड वर्ष शिकूनही महिन्याभराच्या इटली भेटीत रेनेसाँ काळातील चित्रांचाच अमीट संस्कार, तोच जन्मभर जपण्यासाठी कलाध्यापक म्हणून नोकरी, अखेर शांतिनिकेतनच्या कलाभवनात अध्यापनकार्य आणि तेथेच विभागप्रमुख होण्याची संधी.. असा दुस्तर घाट चढणारे हे आयुष्य होते. शांतिनिकेतनातून निवृत्त होईस्तोवर मात्र, ग्राहकप्रियतेची लाट त्यांच्या पायाशी आली होती. तिच्या काठाकाठाने अनेक शहरांतील खासगी गॅलऱ्यांमध्ये त्यांची चित्रे पोहोचली. मानसन्मान मिळाले; पण २००६ मध्ये व्हॅटिकनच्या संग्रहालयात रॉय-कृत येशू चित्र कायमच्या संग्रहात, नवी दिल्लीतील ललित कला अकादमीच्या तिसऱ्या (१९७५) आंतरराष्ट्रीय त्रवार्षिक प्रदर्शनात सहभाग, यांनाही सन्मानच मानण्याचा रॉय यांचा स्वभाव. त्यामुळे सरकारी किताबांसाठी खटपट करण्याऐवजी हमखास, कुठल्याशा खासगी गॅलरीने भरवलेल्या ‘आर्टिस्ट्स कॅम्प’मध्ये अन्य चित्रकारांशी गप्पा मारण्यात रंगून गेलेले सुहास रॉय दिसत.

आता ते दिसणार नाहीत. त्यांची चित्रेच दिसतील.