सौरमालेबाहेर बाह्य़ग्रह शोधण्याचे काम केप्लर मोहिमेत मोठय़ा प्रमाणावर झाले आहे. केप्लर ही अवकाशस्थ दुर्बीण असून वसाहतयोग्य ग्रहांसह अनेक ग्रह शोधण्यात तिला यश आले आहे. जेव्हा एखादा ग्रह त्याच्या मातृताऱ्याभोवती अशा अंतरावर असतो जेथे त्यावरचे पाणी द्रव स्वरूपात राहील त्याला वसाहतयोग्य ग्रह असे मानले जाते. बाह्य़ग्रह अनेक सापडले असले तरी त्यात पृथ्वीसारख्या वसाहतयोग्य ग्रहांचा शोध घेण्यासाठी एक नवीन उपकरण नासा तयार करणार असून ती जबाबदारी भारतीय वंशाच्या एका उमद्या वैज्ञानिकावर टाकली आहे त्याचे नाव सुव्रत महादेवन. ते पेन स्टेट विद्यापीठात खगोलभौतिकशास्त्र, अवकाश विज्ञान व अणुभौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत. बाह्य़ग्रह शोधले जातात पण त्याची नंतर निश्चितीही करावी लागते, कारण सुरुवातीला ते अधिक्रमण तंत्राने शोधले जातात. याशिवाय केप्लर दुर्बिणीत यापूर्वी दोनदा बिघाड झाले आहेत. त्या दुर्बिणीस पर्याय तयार असावा म्हणून नासाने बाह्य़ग्रह शोधण्यासाठी पूरक उपकरण तयार करण्याचे ठरवले आहे. या प्रकल्पाचे नेतृत्व महादेवन करीत असून अर्पिता रॉय या भारतीय वंशाच्या महिला वैज्ञानिकासह इतर १५ संशोधक यात आहेत. २०१९ पर्यंत बाह्य़ग्रह शोधण्याचे हे उपकरण तयार केले जाणार असून अ‍ॅरिझोनातील ‘किट पीक नॅशनल ऑब्झर्वेटरी’ या वेधशाळेत ते बसवले जाणार आहे. डॉप्लर वर्णपंक्तिशास्त्राच्या मदतीने हे ग्रह शोधले जाणार आहेत. नासाने बाह्य़ग्रह शोधासाठी उपकरण तयार करण्यासाठी स्पर्धा घेतली होती त्यात महादेवन यांच्या डॉप्लर वर्णपंक्तिमापीला पसंती मिळाली. गुरुत्वीय बलामुळे कुठल्याही ताऱ्याची पुढे-मागे हालचाल होत असते ती एक प्रकारची थरथर असते. त्यावरून ताऱ्याभोवती ग्रह आहे की नाही हे समजते, त्याचे वस्तुमानही कळते. निर्वात पोकळीत हे उपकरण ठेवले जाणार असून तेथील तापमान एक हजारांश सेल्सिअस असेल. जर कक्ष तापमान एक टक्का बदलले तर उपकरणात एक हजारांश बदल नोंदला जाईल.

महादेवन यांचा जन्म अहमदाबादचा. आई-वडील मल्याळी. वडील एन. एस. महादेवन हे औद्योगिक अभियंता, तर आई विजया महादेवन इंग्रजीच्या शिक्षिका. आयआयटी मुंबईत जे शिक्षण घेतले ती शिदोरी अजून छान पुरते आहे, असे सुव्रत महादेवन सांगतात. आयआयटी मुंबईतून ते भौतिकशास्त्र व अभियांत्रिकीत पदवीधर झाले. महादेवन इ.स. २००० मध्ये अमेरिकेत आले, पेन स्टेट विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर फ्लोरिडा विद्यापीठात प्रगत शिक्षण व पुन्हा २००९ मध्ये पेन स्टेटमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांचे अहमदाबादच्या फिजिकल रीसर्च लॅबोरेटरीशी सहकार्य आहे. ग्रहशोधनाच्या उपकरणांमध्ये त्यांनी मदत केली आहे. बाह्य़ग्रहांच्या संशोधनात अनेकांना रस आहे. त्यात धर्म, वंश आड येत नाही, कारण या संशोधनाचा संबंध मानवतेच्या ज्ञानकक्षा रुंदावण्याशी आहे, हे त्यांचे सांगणे एका व्यापक चिंतनाचाच भाग आहे.