भारतातील ७० कोटी लोकांना त्यांच्या भाषेतून, त्यांच्याच उच्चारांशी मिळतेजुळते घेत त्यांच्या आज्ञा ऐकून त्या पाळणारी मोबाइल सुविधा देण्याचे ध्येय बाळगणारे चेन्नईचे उमेश सचदेव यांचे वय अवघे ३०, पण त्यांच्या तंत्रज्ञान क्षमतेने त्यांना काळाच्या पलीकडे नेऊन ठेवले आहे. ‘टाइम’ या नियतकालिकाने जग बदलून टाकणाऱ्या दहा व्यक्तींची निवड या वर्षीसाठी केली आहे, त्यातील ते एकमेव भारतीय. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनीअर व उद्योजक. त्यांच्या युनिफोर कंपनीने लोकांना मोबाइल प्रादेशिक भाषांमध्ये वापरण्याची सुविधा दिली आहे. एवढेच नव्हे, तर ऑनलाइन बँकिंगही लोकांना प्रादेशिक भाषेत करण्याची सुविधा त्यांच्या सॉफ्टवेअरमुळे उपलब्ध झाली आहे. त्यातून आर्थिक सर्वसमावेशकतेला अप्रत्यक्ष पाठबळच मिळाले. एकूणच त्यांनी सामान्य लोकांना मोबाइल हा एक रोजच्या जीवनातील वाटाडय़ा कसा असू शकतो हे दाखवून दिले आहे.

सचदेव हे दिल्लीकर, पण त्यांचे उच्चशिक्षण आयआयटी मद्रास येथे झाले; आता ते युनिफोरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी मोबाइलमध्ये २५ जागतिक भाषा व १५० बोलीभाषा आणण्याचे मोठे काम केले आहे. भाषांनी  संस्कृतीचा विकास होतो त्यातही ते मोठे वाटेकरी ठरले आहेत. सामाजिक बदलात तंत्रज्ञानाचे स्थान महत्त्वाचे असते हे त्यांना ठाऊ क आहे, त्यामुळे त्यांचे प्रयोग सतत वेगळे होते. दिल्लीत  शिक्षण झाल्यानंतर त्यांनी संगणक अभियंत्याची पदवी घेतली. उद्योजक कुटुंबातील नसूनही त्यांनी हे यश मिळवले आहे.

नवउद्यमांची चर्चाही नव्हती तेव्हा २००५-०७ मध्ये त्यांनी व रवी सराओगी यांनी माहिती तंत्रज्ञान उद्योगात उडी घेतली. सुरुवातीला भारताचा ग्रामीण भागच डोळ्यापुढे होता, पण आता त्यांनी आग्नेय आशिया, मध्यपूर्व असा मोठा भाग व्यापला आहे. सध्या १ अब्ज लोक युनिफोरची उत्पादने वापरतात. या कंपनीने प्रथम बोलणे ओळखण्याचे (व्हॉइस रेकग्निशन) सॉफ्टवेअर तयार केले, त्यातच अकिरा हा तंत्र सहायक तयार केला.. त्याला ७० जागतिक भाषा येत होत्या! त्यानंतर ऑमिना हे उत्पादन तयार केले.

अ‍ॅमव्हॉइस हे बायोमेट्रिक उत्पादन याच कंपनीचे. आवाज ओळखणारी वा ग्राहकांचे कॉल घेऊन त्यांना उत्तरे देणारी यंत्रे असू शकतात यावर कुणाचा विश्वास नव्हता, पण त्यांनी ते करून दाखवले. भारतातील समस्या सोडवायच्या असतील तर तंत्रज्ञानावर भर दिला पाहिजे असे ते सांगतात. सचदेव यांनी फोनमध्ये सर्व भाषा वापरता येतील असे सॉफ्टवेअर तयार केले ही त्यांची महत्त्वाची कामगिरी. त्यामुळे इंटरनेट कुठल्याही भाषेत वापरता येते. त्यांच्या मोबाइल थेफ्ट सिक्युरिटी उत्पादनालाही मोठी मान्यता मिळाली आहे. २००९ मध्ये विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने त्यांचा नवउद्यमी म्हणून गौरव केला होता.