कधी ना कधी कष्ट फळाला येतात तसे यावेळी व्ही. नारायणसामी यांचे झाले, तीन दशकांच्या राजकीय कारकिर्दीनंतर ते पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री होत आहेत. मुख्यमंत्रिपदाचे त्यांचे स्वप्न अखेर साकार झाले. वयाच्या ६९ व्या वर्षीही त्यांचा उत्साह कायम आहे. यूपीए-२ सरकारमध्ये ते पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री होते, तर यूपीए १ त्या काळात संसदीय कामकाज राज्यमंत्री होते. लोकसभा निवडणुकीत त्यांचा एनडीएचे आर. राधाकृष्णन यांनी पराभव केला होता. आताच्या विधानसभा निवडणुकीस ते उभेच राहिले नव्हते, त्यामुळे त्यांना पुद्दुचेरीतील पोटनिवडणुकीत निवडून यावे लागेल. त्यांची निवडही एकमताने म्हणण्याऐवजी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार झाली आहे. प्रदेशाध्यक्ष ए. नामसिवायम व नारायणसामी यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी चुरस होती, पण आता नारायणसामी यांची निवड झाल्याने हा प्रश्न मिटला आहे. राहुल गांधी यांनी नारायणसामींच्या पारडय़ात वजन टाकल्याने ते मुख्यमंत्री होऊ शकले हे उघड आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ३० पैकी १५ जागा मिळाल्या आहेत. नारायणसामी हे दिवंगत पी. षण्मुगम यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यांनीच राजकारणाचे धडे नारायणसामी यांना दिले व प्रतिकूल परिस्थितीतही टिकायला शिकवले. नारायणसामी हे तीनदा राज्यसभेचे खासदार होते. त्यांचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चांगले संबंध आहेत. कारण यूपीए २ च्या काळात ते पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री होते. लोकसभेतील पराभवाने खचून न जाता त्यांनी राज्यात काँग्रेसला वर काढले. नारायणसामी यांचा जन्म पुद्दुचेरीचा. त्यांनी चेन्नईच्या आंबेडकर लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतल्यानंतर १९७३ पासून दहा वर्षे वकिली केली. दरम्यान १९७५ मध्ये ते युवक काँग्रेसमध्ये आले. १९७९ ते १९८५ दरम्यान ते इंटकचे सरचिटणीस होते. १९८५ मध्ये ते सक्रिय राजकारणात आले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अटकेविरोधात आंदोलन केल्याने त्यांना १९७८ मध्ये तुरुंगवास झाला. इ. स. २००० मध्ये ते प्रदेशाध्यक्ष झाले व २००१ मध्ये काँग्रेसची सत्ता आणण्यात ते यशस्वी झाले होते. नंतर ते राज्यसभेवर निवडून गेले. १९९१ मध्ये त्यांनी राज्यसभेची जागा राखली. १९९७ मध्ये द्रमुकने त्यांचा राज्यसभा जागेसाठी पराभव केला, पण नारायणसामी पुन्हा २००३ मध्ये निवडून आले. २००७ मध्ये ते प्रदेशाध्यक्ष होते व त्यांनी त्याचवेळी संघटनात्मक पकड मजबूत केली होती. नारायणसामी यांना मुख्यमंत्रिपदासाठी द्रमुकचा पाठिंबा आहे. अर्थात नारायणसामी यांना मुख्यमंत्रिपद मिळाले असले तरी यूपीए सरकारमध्ये काम करताना कोळसा घोटाळ्याशी त्यांचे नाव निगडित होते, हे विसरता येत नाही. तत्कालीन सीबीआय संचालक रणजित सिन्हा यांनी नारायणसामी मंत्री असताना त्यांची भेट घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपला कोळसा घोटाळा प्रकरणात खोटे पाडू अशी प्रतिज्ञाही नारायणसामी यांनी केली होती, पण तसे काही घडताना दिसले नाही.