दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझींनी ताब्यात घेतलेल्या व्हिएन्नातून त्यांनी किशोरवयात ब्रिटनला पलायन केले. नंतर अमेरिका असा त्यांचा प्रवास झाला. त्यानंतर संशोधन क्षेत्रात मोठे काम करताना त्यांना रसायनशास्त्राचे नोबेलही मिळाले, त्यांचे नाव वॉल्टर कोहन. जन्माने ऑस्ट्रियन असलेल्या या अमेरिकी वैज्ञानिकाचे नुकतेच निधन झाले.
कोहन यांना १९९८ मध्ये रसायनशास्त्राचे नोबेल जन्माने ब्रिटिश असलेले जॉन ए पोपल यांच्यासमवेत विभागून मिळाले होते. रसायनशास्त्रातील गुंतागुंतीच्या अभिक्रियांचा उलगडा कोहन यांनी केला. कुठल्याही रासायनिक अभिक्रियेत विभक्त इलेक्ट्रॉनच्या गतीला फार महत्त्व नसते, तर एका वेळी संबंधित अवकाश पोकळीत सरासरी किती इलेक्ट्रॉन आहेत हे समजणे फार महत्त्वाचे असते असे त्यांनी प्रथम सांगितले. रासायनिक बंध व अणूचे आचरण यावर त्यांनी केलेल्या संशोधनामुळे पुढे अनेक रेणू विकसित करता आले. त्यातून आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सला मोठा हातभार लागला. त्यांच्या संशोधनातून तयार झालेल्या नव्या रेणूंमुळे औषधनिर्माणशास्त्रात अनेक बदल झाले. रसायनशास्त्रातील रेणूंच्या भौमितिक रचनांचा अभ्यास त्यांच्या ‘डेन्सिटी- फंक्शनल थिअरी’मुळे शक्य झाला. सादृश्यीकरणाच्या माध्यमातून रेणूंचे स्थान निश्चित करतानाच अभिक्रियांचे भाकीत करता येऊ लागले. कोहन यांचा जन्म व्हिएन्नातला. हिटलर सत्तेवर आला तेव्हा कोहन यांचे मध्यमवर्गीय ज्यू कुटुंब बुद्धिमान लोकांच्या वर्तुळात वावरत होते. नंतर ऑस्ट्रियाला जर्मनीने गिळंकृत केले, त्या अस्थिरतेत कोहन ब्रिटनला आले. गणित व भौतिकशास्त्र यात त्यांना चांगली गती होती. त्यांच्या आईवडिलांचा नाझींनी खून केला. डॉ. कोहन यांना शेतकरी व्हायचे होते जे आता कुणाला स्वप्नातही वाटत नाही, पण त्या वेळेस बेरोजगारीमुळे त्यांचा विचार अगदीच अयोग्य नव्हता. चर्चिल यांनी नंतर जर्मन पासपोर्ट असलेल्यांना कॅनडातील छावण्यात पाठवले, त्यात डॉ. कोहन होते. तेथे त्यांनी कॅनडातील लष्करात काम करताना टोरांटो विद्यापीठातून शिक्षण घेतले. हार्वर्ड विद्यापीठातून ते डॉक्टरेट झाले. ते कार्नेगी तंत्रज्ञान संस्था व कॅलिफोर्निया विद्यापीठात भौतिकशास्त्र शिकवत असत. आता जी कावली इन्स्टिटय़ूट आहे तिचे ते संस्थापक संचालक होते. खरे तर त्यांचे प्रेम भौतिकशास्त्रावर होते, पण नोबेल मात्र रसायनशास्त्राचे मिळाले हा वेगळा योग. अमेरिकेने रशियाशी अण्वस्त्र स्पर्धा केली त्याला त्यांचा विरोध होता. कॅलिफोर्निया विद्यापीठाचा वापर अण्वस्त्र प्रयोगशाळा चालवण्यासाठी होऊ नये यात त्यांचा पुढाकार होता. विज्ञान विस्मयकारक असते, पण ते काही वेळा भयानकही ठरते असे त्यांचे मत होते. प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी विज्ञानावर अतिरेकी अवलंबित्वही त्यांना रुचत नव्हते. विज्ञानाचा वापर दैनंदिन जीवनातील काही समस्या सोडवण्यासाठी झाला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यांना इतिहास, साहित्य, अभिजात संगीतातही रस होता.