फियाट क्रायस्लर ऑटोमोबाइलचा अविभाज्य घटक असलेल्या जीप या दणकट ब्रॅण्डच्या दोन मॉडेल्स भारतात दाखल झाल्या आहेत. रँग्लर आणि ग्रॅण्ड चिरोकी, अशी या दोन्ही मॉडेल्सची नावे आहेत. ऑफ रोड ड्रायिव्हगची हौस असणाऱ्यांसाठी या दोन्ही एसयूव्ही अगदी आदर्श आहेत, परंतु त्याचा अर्थ असा नाही की, ऑन रोडसाठी या दोन्ही गाडय़ा चांगल्या नाहीत. दोन्ही प्रकारच्या रस्त्यांवर तितक्याच सहजतेने चालू शकणाऱ्या या दोन्ही गाडय़ांच्या ऑफ रोड ड्रायिव्हगचा थरार नुकताच अनुभवायला मिळाला..

जीपविषयीचे आकर्षण आपल्यातल्या अनेकांना असते. लहानपणी आपण ती िहदी चित्रपटात पाहिलेली असते. अनेकदा जीप म्हटले की, गाणे गात उघडी जीप चालवत असलेला िहदी चित्रपटातला एखादा नायक लगेच डोळ्यासमोर येतो किंवा मग चित्रपटाच्या अखेरीस नायक खलनायकाला बदडत असतो त्या वेळी पोलिसांची जीप येते आणि खलनायकाला जीपमध्ये कोंबून पोलीस ठाण्यात नेले जाते, असे दृश्य तरी आपल्या डोळ्यांसमोर उभ राहते. असो. तर सांगायचा मुद्दा असा की, जीप ही काही आपल्याला अगदीच अनोळखी नाही. त्यामुळे जीपबद्दल आपल्याला कायम आकर्षण वाटत राहाते. ओबडधोबड रस्त्यांवर सहजपणे चालू शकणारी, राकट, दणकट अशी ही जीप आपल्या मालकीची असावी, असे स्वप्नही आपल्यातल्या काही जणांनी उराशी बाळगलेले असते. हेही असो.

आताच हे जीप पुराण का.. तर जीपच्या दोन दणकट मॉडेल्स सध्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. रँग्लर आणि ग्रॅण्ड चिरोकी. या दोन्ही मॉडेल्सच्या ऑफ रोड ड्रायिव्हगचा थरार नुकताच अनुभवायला मिळाला.

गोरेगाव येथील चित्रनगरीत (फिल्म सिटी) जीपतर्फे कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्यात रँग्लर आणि ग्रॅण्ड चिरोकी यांच्या ऑफ रोड ड्रायिव्हगचा अनुभव घेता यावा यासाठी खास ट्रॅक तयार करण्यात आला होता. त्यात अगदी वाईटातल्या वाईट परिस्थितीतही या दोन्ही गाडय़ा तुम्हाला कसे सुरक्षित ठेवू शकतील, अशा प्रकारच्या रस्त्यांची निर्मितीही होती. म्हणजे तीव्र चढण, खोल खड्डा, पाण्याने भरलेले खड्डे, दगडाधोंडय़ांचे रस्ते, खाचखळगे, तीव्र वळणे, निसरडय़ा जागा या सर्वाचा या ऑफ रोडमध्ये समावेश होता.

गाडी चालवणाऱ्याला अगदी खराखुरा ऑफ रोड ड्रायिव्हगचा पुरेपूर अनुभव मिळावा, या सगळ्याची अगदी व्यवस्थित तयारी या जीप कॅम्पमध्ये होती. त्यातून अर्थातच गाडीच्या इंजिनाची ताकद, गाडीची मॅनोव्हरबिलिटी, ट्रॅक्शन, गाडीचा ग्राऊंड क्लिअरन्स या सर्व गोष्टी नीट तपासल्या जाव्यात, हा यामागचा उद्देश.

ग्रॅण्ड चिरोकी

या गाडीत प्रवेश केल्या केल्याच तुम्हाला तिच्या भव्यतेचा अंदाज येतो. तुमच्यात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम चेरुकी करते. ऑफ रोडवर ड्रायिव्हग करताना गाडीवरील तुमचे नियंत्रण सुटले तरी चेरुकी एसयूव्ही तुम्हाला सांभाळून घेते. रस्त्याच्या परिस्थितीनुसार चिरोकी स्वत:च अ‍ॅक्सिलरेशन आणि ब्रेक यांचा यथायोग्य वापर करते. त्यामुळे ड्रायिव्हग करताना तुम्हाला ताण जाणवत नाही. वस्तुत ऑफ रोड ड्रायिव्हगचा अनुभव आरामदायी, लक्झरियस, नसतो. मात्र,चिरोकी तुम्हाला तसा फील आणून देते. चिखल असो, वाळू असो, दगडाधोंडय़ांनी भरलेला रस्ता असो, खड्डेखुड्डे असोत वा उंच टेकडय़ा. प्रत्येक ड्रायिव्हग कंडिशनमध्ये चिरोकी उत्तम समतोल साधत तुम्हाला सुरक्षित ठेवते. थ्रॉटल कंट्रोल, ट्रान्समिशन शििफ्टग, गीअर ट्रन्स्फिरग, ग्रिप कंट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आदी चेरुकीतील सुविधा गाडीला सर्वोत्तम बनवते. त्यामुळे चिरोकी घेऊन तुम्ही कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर सहजपणे ड्राइव्ह करू शकता. तुम्ही ऑफ रोड ड्रायिव्हगला घेऊन गेलात तरी तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही ऑफ रोड ड्रायिव्हग करत आहात म्हणून.. चिरोकीची ही कमाल आहे.

निकाल

एकूण काय, तुम्हाला अधूनमधून ऑफ रोड ड्रायिव्हग करण्याची हुक्की येत असेल आणि तुम्हाला जास्त त्रासही करून घ्यायचा नसेल तसेच तुमच्या रोजच्या वापरासाठीही तुम्ही गाडी शोधत असाल तर ग्रॅण्ड चिरोकी तुमची वाट पाहात आहे. हा, मात्र तुमच्या खिशाला ती कितपत परवडेल याचा हिशेब ज्याचा त्याने करावा. बाकी इतरही पर्याय आहेतच मार्केटात लक्झरी एसयूव्हीचे.

आणि जर का तुम्ही हार्डकोअर ऑफ रोडर असाल तर रँग्लरची निर्मिती तुमच्यासाठीच झालीय, असे समजा. तुम्ही रँग्लर एकदा का चालवून पाहिली की मग तुम्हाला ऑफ रोडसाठी दुसरी कुठली एसयूव्ही घ्यावी, असे चुकूनही वाटणार नाही. पाहताक्षणीच प्रेमात पडाल तुम्ही रँग्लरच्या. परंतु एकच अडचण आहे रँग्लर घरी न्याविशी वाटत असेल तर खिशात किमान ७७ लाख रुपये असावेत. मुंबईतली या गाडीची एक्स-शोरूम किंमत नेमकी एवढीच आहे.

रँग्लर

ग्रॅण्ड चिरोकी तुमचे नियंत्रण करते तर रँग्लर अगदी तिच्याविरुद्ध आहे. ही एसयूव्ही संपूर्णपणे ड्रायव्हरच्या नियंत्रणाखालीच काम करते. रँग्लर तुमच्या शब्दाबाहेर जात नाही. मग रस्ता कसाही असो. त्यामुळे ऑफ रोडला रँग्लर ड्राइव्ह करताना तुमच्या ड्रायिव्हग क्षमतेची खरी कसोटी लागते. मात्र, एक आहे या एसयूव्ही इंजिन एवढे ताकदवान आहे की कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावरून तुम्हाला ती सहिसलामत नेते. नदी असो, एखादा डोगर असो वा खडकाळ जमीन असो, रँग्लर तुम्हाला या सगळ्या परिस्थितीतून तारून नेणारच. मात्र, तुमचा निर्धार पक्का पाहिजे. थोडक्यात गाडी चालवताना तुम्ही िहमत दाखवली पाहिजे. आम्ही प्रत्येक प्रकारच्या ऑफ रोड ट्रॅकवर रँग्लर चालवून पाहिली. त्यातून गाडीची रस्त्यावरील पकड, पाण्यातून जाण्याची क्षमता, ग्राऊंड क्लिअरन्स या सगळ्याची काटेकोर तपासणी करता आली. आणि या सगळ्या परीक्षांत रँग्लर सर्वोत्तम गुणांनी पास झाली, हे सांगायला नकोच.

jaideep.bhopale@expressindia.com