हॅरी पॉटर आणि रॉन एका उडत्या गाडीत बसून हॉगवर्ट्सला कसे पोहोचतात, हे दृश्य अनेकांनी पाहिलं असेल. त्या प्रवासात रॉनच्या चेहऱ्यावरील भाव बरंच काही सांगून जातात. म्हणजे आपण एका चारचाकीत बसलोय आणि ती चक्क उडतेय! उडत्या कारची संकल्पना प्रत्यक्षात आली तर आपल्यातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरही असेच भाव असतील, नाही?

सॅन फ्रान्सिस्को हे अमेरिकेतलं तसं रम्य शहर. प्रशांत महासागर आणि सॅन फ्रान्सिस्को उपसागराने वेढलेल्या एका टापूवर वसलेलं. लोकसंख्या तुरळक. अशा या नितांत सुंदर शहराच्या उत्तरेला एक तळं आहे. निळंशार पाणी आणि आजूबाजूला छोटय़ा छोटय़ा टेकडय़ा. एप्रिल महिन्यात या तळ्यावर एक प्रयोग करण्यात आला. पाण्यापासून काही फूट उंचावर एक छोटेखानी यंत्राने तळ्याला फेरफटका मारला. या यंत्रावर बसला होता, कॅमेरॉन रॉबर्ट्सन, सिलिकॉन खोऱ्यातील एका कंपनीचा एअरस्पेस अभियंता. हा काही साधासुधा प्रयोग नव्हता. भविष्यात.. खरं तर या वर्षांच्या अखेरीसच.. उडती कार प्रत्यक्षात आणण्यासाठी केलेला तो प्रयोग होता, किट्टी हॉक नावाच्या कंपनीने केलेला..

स्वयंचलित कारचे प्रयोग अलीकडे यशस्वी ठरायला लागले आहेत. उबर आणि गुगलने तर अशा गाडय़ांच्या यशस्वी चाचण्या घेऊन त्या प्रत्यक्षात रस्त्यावरदेखील आणल्या आहेत. आता तंत्रविश्वाला आणि अर्थातच वाहनविश्वालाही उडत्या कारची स्वप्नं पडू लागली आहेत. उडती कार खरंच शक्य आहे का. त्याचाच पाठपुरावा म्हणून किट्टी हॉक या कंपनीने एक छोटेखानी यंत्र विकसित केलं. आणि त्याची चाचणी घेतली सॅन फ्रान्सिस्कोतील त्या तळ्यावर. आणि या प्रयोगाला हातभार लावला तो गुगलचा सहसंस्थापक असलेल्या लॅरी पेज याने. त्यामुळे गुगलने तयार केलेली छोटेखानी उडती कार दिसली तर आश्चर्य वाटायला नको.

कोणत्याही प्रकारचे छप्पर नाही, केवळ एकाच व्यक्तीसाठी आसन, २२० पौंडांपेक्षा कमी वजन आणि आठ बॅटऱ्या जोडलेले प्रॉपेलर असं स्वरूप या छोटेखानी कारचं होतं. तळ्याला एक फेरफटका मारून छोटेखानी कारवजा यंत्र तळावर परतल्यानंतर तिच्या निर्मात्यांनी एकच जल्लोष केला. त्यांचा प्रयोग तरी यशस्वी झाला होता. आता उडती कार प्रत्यक्षात कशी येईल, याचीच प्रतीक्षा आहे. खरंच होईल का हे शक्य.

उडती कार की फक्तजॉय राइड

सद्य:स्थितीत तरी किट्टी हॉक या वाहनप्रयोगाला जॉय राइड संबोधते. मात्र, लॅरी पेज आणि किट्टी हॉकचे प्रमुख सॅबास्टियन थ्रन यांचा या प्रयोगातील सहभाग बरंच काही अधोरेखित करतो. कारण कंपनीला हे वाहन केवळ जॉय राइडसाठी विकसित करायचे नसून व्यावसायिक स्तरावर त्यांना उडती कार तयार करायची आहे. मात्र, त्यासाठी अमेरिकी प्रशासनाकडून त्यांना परवानगी मिळवावी लागणार आहे.

कितपत सुरक्षित

उडती कार तयार करणं अर्थातच जिकिरीचं आणि खर्चीक काम आहे. त्यात लोकांच्या सुरक्षेचा प्रश्नही आहे. सर्वात सुरक्षित आणि जलदगतीची वाहनसेवा तयार करणे हेच उडत्या कारच्या निर्मितीमागील उद्दिष्ट आहे. म्हणजे विचार करा तुम्हाला मुंबईहून पुण्याला जायचंय आणि तुमच्याकडे उडती कार आहे. तुम्ही लाँचिंग पॅडवरून गाडीचं उड्डाण कराल आणि पुण्याच्या दिशेने झेपावाल. गाडीच्या वेगानुसार तुम्ही तुमच्या इच्छित स्थळी पोहोचाल, असं हे सारं असेल. परंतु हे प्रत्यक्षात येण्यासाठी अनेक गोष्टी स्पष्ट व्हाव्या लागणार आहेत. गाडीचा वेग किती असेल, हवेत किती फूट उंचापर्यंत ती उडेल, इंधन कोणत्या प्रकारचं असेल, सुरक्षिततेचं काय इत्यादी प्रश्न निर्माण होतील. आणि अर्थातच या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम प्रगतिपथावर आहे, मात्र तिकडे अमेरिकेत. लॅरी पेज आणि कंपनी उडत्या कारना परवाने मिळावेत यासाठी तिथल्या प्रशासनाशी चर्चा करताहेत. किट्टी हॉकने तयार केलेले जे यंत्र आहे, त्यासाठी तिथल्या केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाचा परवाना त्यांच्याकडे आहे. मात्र, त्यातही अट अशी आहे की अशा प्रकारचं यंत्र केवळ पाण्याच्या पृष्ठभागापासून काही फूट उंचीवरूनच चालवण्यात यावं आणि ज्या ठिकाणी जास्त रहदारी नाही, त्या ठिकाणीच अशा वाहनाचा उपयोग केला जावा. हे असं आपल्याकडे येणंही शक्य आहे. परंतु त्याला बराच कालावधी जाऊ द्यावा लागणार आहे.

अडचणी काय?

अशा प्रकारच्या उडत्या कार प्रत्यक्षात येण्यास अनंत अडचणींचा सामना निर्मात्यांना करावा लागणार आहे. कारण मानवरहित ड्रोन्सना किती विरोध होतो, हे सगळ्यांना माहीत आहे. उडत्या कारना वेगळे परवाने द्यावे लागतील, त्यामुळे त्या आघाडीवरही बराच गोंधळ निर्माण होईल. हवाई वाहतूक क्षेत्राच्या नियमांमध्येही बदल करावे लागतील. त्यातच उडत्या कार इलेक्ट्रिक पॉवर सप्लायवर चालतील की बॅटरीवर याचाही विचार करावा लागेल. या अडचणींवर मात करून मगच उडत्या कार प्रत्यक्षात येतील. आणि अर्थातच त्यांची किंमतही अवाच्या सवा असेल, यात शंका नको. पण त्यांना मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व असेल यातही शंका नको. तूर्तास आपण उडत्या कारचं दिवा स्वप्न तरी पाहू शकतो..

अशी उडाली कार

प्रॉपेलरच्या साह्यने चालणारी ही छोटेखानी कार स्पीडबोटीसारखी भासते. आठ बॅटऱ्या जोडलेल्या या वाहनावर दोन जॉयस्टिक्ससारख्या दोन कंट्रोल पॅनेल जोडण्यात आले होते. त्यांच्या साह्यने वाहन हवेतल्या हवेत मागे-पुढे अथवा वळवता येऊ शकत होते. तळ्याच्या पृष्ठभागापासून १५ फूट उंचीपर्यंत हे वाहन सुमारे पाच मिनिटे हवेत होते. त्यानंतर ते लाँचिंग पॅडकडे परतले.

उडती कार तयार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कंपन्या..

  • एअरोमोबिल
  • टेराफ्युगिया
  • ईहँग
  • एअरबस
  • ईव्होलो
  • टोयोटा
  • किट्टी हॉक