मायलेजचा विचार करणारे लोक म्हणून दुनियेत भारतीयांकडे बघितलं जातं. एक लिटर पेट्रोल किंवा डिझेलमध्ये जास्तीत जास्त किती किलोमीटर गाडी धावेल, याकडे आपलं लक्ष असतं. हे मायलेज वाढवण्याबरोबरच गाडीची इंधन क्षमता वाढवण्याआड मात्र काही सवयी आड येत असतात. या काही सवयींविषयी..

काही महिन्यांपूर्वी टीव्हीवरच्या एका जाहिरातीने सर्वाचंच लक्ष वेधून घेतलं होतं आणि वाहवा मिळवली होती. एका अंतराळ यानाची माहिती देणारा गाईड सगळी माहिती सांगतो आणि ती ऐकणाऱ्या गर्दीतील भारतीय माणूस हात वर करून ये कितना देती हैं, असा प्रश्न विचारतो. वास्तविक ही जाहिरात पाहून सगळ्या भारतीयांच्या मनातला प्रश्न उघडपणे विचारल्यामुळे आपल्याही चेहऱ्यावर हसू फुटलेलं असतं. पण या जाहिरातीमधून भारतीयांची कमीत कमी इंधनात जास्तीत जास्त अंतर कापण्याची मानसिकता अधोरेखित होते. बहुतांश भारतीय लोक गाडी विकत घेताना त्या गाडीची फ्युएल एफिशियन्सी किंवा इंधनक्षमता विचारात घेतात. म्हणजेच एक लीटर पेट्रोल वा डिझेलमध्ये आपली गाडी किती किलोमीटर अंतर धावेल, याची काळजी आपल्याला असते. त्यामुळे अशा फ्युएल एफिशियण्ट गाडय़ा भारतात जास्त लोकप्रिय ठरतात. भारतीय ग्राहकांचा हा दृष्टिकोन त्यांच्याच खिशाला नाही, तर देशाच्याही खिशासाठी हिताचा आहे. कारण आपल्या देशाच्या इंधनाच्या गरजेपकी ८० टक्क्यांहून अधिक गरज आपण इंधन आयात करून भागवतो. अशा वेळी कमीत कमी इंधन वापरणे, सर्वाच्या दृष्टीने सोयीस्कर आहे. जास्त इंधनक्षमतेचा हव्यास असलेले आपण काही छोटय़ा छोटय़ा सवयींमुळे इंधन वाया घालवत असतो. आपण या सवयींना मुरड घातली, तर ही इंधन बचत अधिक परिणामकारक पद्धतीने करता येईल. अशा कोणत्या सवयी आहेत ज्यांना मुरड घालायला हवी..

Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
article about elon musk india visit elon musk investment in india
अन्यथा : जगी ज्यास कोणी नाही, त्यास..
Before Going For Evening Gym Beetroot juice or coffee Which Drink is better For Your Health Read What Experts Said
जिमला जाण्यापूर्वी ‘या’ वेळेत करा बीटाच्या रसाचे सेवन; स्नायू राहतील मजबूत, वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील

देखभाल दुरुस्तीतील हयगय

गाडी विकत घेणं म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखं आहे, असं आपल्याकडे म्हटलं जातं. कारण तुम्ही ती रस्त्यावर चालवायला काढा अगर नका काढू, तिची देखभाल करावीच लागते. अनेक जण सहा-आठ महिने गाडी देखभाल दुरुस्तीविनाच उभी ठेवतात. किंबहुना गाडी चालत असेल, तरीही दर सहा महिन्यांतून एकदा गाडी मेकॅनिककडे देखभाल-दुरुस्तीसाठी घेऊन जायलाच हवी. गाडीत आपल्या कल्पनेपल्याड भाग गाडी चालवण्यासाठी सतत हलत असतात आणि वापरले जातात. त्यामुळे त्यांचं आयुर्मान संपलेलं कळत नाही. हे भाग खराब झाले आणि बदलले गेले नाहीत, तर ते भाग ज्या भागांना जोडले आहेत, ते भागही खराब होत जातात. त्याचा थेट परिणाम गाडीच्या इंधन क्षमतेवर होतो. त्यामुळे गाडीतील तेल वेळेवर बदलणं, गाडीच्या सर्व भागांची तपासणी करून घेणं, ते भाग बदलणं, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.ह्ण सारखी सारखी लेन बदलणे

प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना भारतीयांच्या पाचवीला पुजलेला आहे. देशातील सर्वच महत्त्वाच्या शहरांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळीच नाही, तर इतर वेळीही वाहतूक कोंडी असते. या वाहतूक कोंडीत अडकल्याचा अनुभव जवळपास प्रत्येक कारचालकाने घेतला असेल. अशा वेळी आपण ज्या लेनमध्ये आहोत, त्या लेनऐवजी दुसऱ्या लेनमध्ये गाडी टाकण्याची सर्वाचीच धडपड असते. मात्र ही सवय इंधनाच्या दृष्टीने प्रचंड हानिकारक आहे. कोणत्याही मोठय़ा शहरातील वाहतुकीमागे काही नियम आणि काही तर्कटं असतात. वाहतूक कोंडी सुटताना ती एक एक लेनप्रमाणे सुटते. त्यामुळे बाजूच्या लेनमधील गाडय़ा पुढे जाताहेत, या समजुतीने महत्प्रयासाने त्या लेनमध्ये आपली गाडी टाकल्यावर ती लेन पुढे सरकणे बंद होते. विशेष म्हणजे आपण आधी ज्या लेनमध्ये होतो, त्या लेनची वाहतूक सुरू होते. परिणामी क्लच-ब्रेक-एक्सलरेटरच्या चक्रात अडकणे येते आणि त्यामुळे गाडीतील इंधन जास्त जळते.

गाडी नुसती उभी असताना चालू ठेवणे

हीदेखील जगभरातील सर्वच कार चालकांची एक सवय आहे. लांब लाल सिग्नल दिसत असतो किंवा वाहतूक कोंडीमुळे गाड्या खोळंबलेल्या असतात. अशा वेळी गाडी एकाच जागी उभी असते, पण गाडीचं इंजिन चालूच असतं. गाडी धावती नसल्याने इंधन खूपच कमी जळत असणार, अशी अनेकांची समजूत असते. मात्र ही समजूत चुकीची आहे. गाडी उभी असताना ती चालू ठेवल्यास गाडीचं इंधन जळत असतं. महिन्याभराच्या वाहतूक कोंडीचा आणि अशा इंधन जळण्याचा हिशेब केल्यास काही लिटर इंधन गाडी एका जागी उभी असताना चालू ठेवण्यासाठीच जळतं. हे टाळण्यासाठी प्रचंड वाहतूक कोंडीत तुमच्या लेनची वाहतूक सुरू नसेल, त्या वेळी गाडी बंद ठेवणं श्रेयस्कर आहे. त्यामुळे गाडीची इंधनक्षमता सुधारते.

टायरमधील हवेचा दाब

गाडीच्या टायरमध्ये एकदा हवा भरली की, पुढल्या वेळी गाडी रस्ता सोडेपर्यंत अनेक जण टायरकडे ढुंकून पाहत नाहीत. वास्तविक भारतातील बहुतांश ठिकाणी असलेल्या खडबडीत रस्त्यांचा विचार करता टायरकडे जास्त लक्ष देण्याची गरज असते. घर्षणामुळे टायरमधील हवेचा दाब कमी होतो. त्याचा थेट परिणाम गाडीच्या इंधन क्षमतेवर होतो. हे टाळण्यासाठी दर आठवडय़ाला गाडीच्या टायरमधील हवेचा दाब तपासायला हवा. त्यासाठी कोणत्याही पेट्रोल पंपावर दाब तपासण्याची व्यवस्था असते. ही व्यवस्था नि:शुल्क असते. त्याशिवाय प्रत्येक ऑटोमोबाइल कंपनीने त्यांच्या गाडय़ांसाठी हवेच्या दाबाचे प्रमाणही ठरवून दिलेले आहे. त्या प्रमाणातच हवा टायरमध्ये भरणं गरजेचं असतं.

– रोहन टिल्लू

rohan.tillu@expressindia.com