मोटारसायकल वा बाइकवरून राइड मारण्याची कल्पना डोक्यात आली की एक उत्साह, रोमांचाची लहर आपल्यात निर्माण होते. खरंच. कारण बाइकची मूळ संकल्पना ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे साधन असण्यापेक्षा वेगवान वाहन, स्पर्धा यांच्याशी अधिक जवळची आहे. इतिहास पाहिल्यास बाइकच्या संकल्पनेमागचे अनेक पलू आपल्यासमोर येतात. वेगवान, ताकदवान इंजिनासह मजबूत बाइक तयार करून स्पध्रेत उतरविणे आणि आपल्या कंपनीची वा प्रायोजित केलेली टीम त्यात कशी जिंकेल हा जागतिक पातळीवर सुरुवातीच्या काळात बाइक निर्माण व उत्पादित करण्याचा हेतू होता. अर्थात, यामागे भविष्यातील मोठी बाजारपेठही समोर असल्याने कंपन्यांनी सुरुवातीस मास मार्केट बाइकपेक्षा सुपर पॉवर बाइक उत्पादन करून स्वत:चे नाव, उत्पादनासाठी ठसा उमटविण्यासाठीच प्रयत्न केल्याचे दिसते.

भारताचा विचार केल्यास देशात सुरुवातीस मोजक्याच कंपन्या बाइक वा मोटरसायकलचे उत्पादन करीत होत्या. आर्थिक उदारीकरणानंतर आलेल्या औद्योगिक, माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच्या प्रगतीमुळे देशाची अर्थव्यवस्था वाढू लागली आणि अनेक परकी कंपन्यांना भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीने आणि येथील बाजारपेठेने खुणावले. त्यामुळे १९९९च्या आसपास सुरू झालेल्या बाइक बाजारपेठेने पुढील दोन दशके चांगलेच बाळसे धरले. मार्केटिंगच्या माध्यमातून कंपन्यांनी ग्राहकांना स्पोर्ट्स बाइक ही संकल्पना सादर केली. त्यामध्ये अगदी १५० सीसीच्या बाइकचेदेखील स्पोर्ट्स बाइक म्हणून मार्केटिंग झाले आहे. भारतातील बहुतेक १५० ते २५० सीसीच्या बाइक या कम्युटर सेगमेंट (म्हणजे बाइकवरून ये-जा करणे) प्रकारच्याच बाइक आहेत. अशा बाइकचा उपयोग जागतिक दर्जाच्या रेसिंगमध्ये सहभाग घेण्यासाठी होत नाही.

स्पोर्ट्स बाइकची तशी स्पष्ट व्याख्या नाही. मात्र यात नक्कीच अनेक प्रकार आहेत. प्रामुख्याने स्पोर्ट्स बाइक रेसिंगसाठी असल्याने पिकअप, स्पीड, उत्तम ब्रेकिंग (डिस्क ब्रेकविथ एबीएस), उच्च दर्जाच्या धातूने बनविलेली मजबूत पण लाइटवेट फ्रेम (चासी) आणि बाइक हाताळणे (एरो डायनामिक शेप, हाय फूट रेस्ट, क्लिप ऑन हॅण्डलबार यामुळे रायडरचे शरीर पुढील म्हणजे टँकच्या दिशेने जाते आणि ओघाने त्याच्या वजनाचा भार) सोपे जाण्याच्या हेतूने केलेली असते. स्पोर्ट्स बाइक कम्युटिंगसाठी वापरण्याचा हेतू नसल्याने मागे बसणाऱ्या व्यक्तीचा फारसा विचार यात केला जात नाही. तशी बसण्याची व्यवस्था असते. मात्र ती कितपत आरामदायी असेल हा अनुभव घेण्याचा विषय आहे. स्पोर्ट्स बाइकमध्ये नेकेड, सेमी नेकेड आणि फुल फेअिरग बाइकचे पर्याय उपलब्ध असतात. नेकेड बाइकला कोणतेही फेअिरग म्हणजे हेड लॅम्प, इंजिन कव्हरणारे फेअिरग नसते. सेमी नेकेड बाइकमध्ये हेड लॅम्प आणि इंजिनचा काहीच भाग फेअिरगने झाकलेला असतो. याउलट फुल फेअिरग बाइकमध्ये हेड लॅम्प, संपूर्ण इंजिन कव्हर केलेले असते. हवेचा अवरोध कमी होण्यासाठी आणि बाइक चालविताना रस्त्यावर पकड चांगली राहील, अशा पद्धतीने फेअिरगची रचना असते. काही बाइकमध्ये एक्झॉक्टदेखील दोन चाकांच्या मध्ये खालील बाजूस असतो, तर काहींना सीटच्या खाली मागील बाजूस असतो. रेसिंगमध्ये वापरण्यात येणाऱ्या बाइकना सुपर बाइक म्हणतात. या बाइकचे इंजिन सर्वसाधारणपणे तब्बल एक हजार सीसीचे असते. होंडाने १९७०च्या आसपास सीबी ७५० लाँच केली होती. यास साडेसातशे सीसीचे इंजिन होते. त्याकाळी ही सुपर बाइक समजण्यात येत होती. आता याच क्षमतेची इंजिन असणारी बाइक मिड सुपर बाईक म्हणून गणली जाते. भारतातही या कंपन्यांची सुपर स्पोर्ट्स बाइक उपलब्ध आहेत.

obhide@gmail.com