* मला ग्राऊंड क्लिअरन्स जास्त असलेली पूर्ण भारतीय बनावटीची गाडी घ्यायची आहे. ग्राऊंड क्लिअरन्स किमान १८० मिमीपेक्षा जास्त असावा. माझे बजेट पाच ते साडेपाच लाख रुपये आहे. टाटा नॅनो किंवा महिंद्रा केयूव्ही१०० यांपैकी कोणता पर्याय सुचवाल?

– योगेश वेदपाठक

* महिंद्रा केयूव्ही१०० ही तुम्हाला सहा ते सात लाखांपर्यंत मिळेल. मात्र, नॅनोपेक्षा ती नक्कीच स्टेबल आहे आणि तिचा ग्राऊंड क्लिअरन्स उत्तम आहे. तुम्ही या गाडीचाच पर्याय निवडावा. टाटा टियागोही चांगली असून तिचाही ग्राऊंड क्लिअरन्स छान आहे.

* माझे घर आणि ऑफिस यांच्यातील अंतर ७० किमी आहे. मी महिन्याचे किमान १५ दिवस कार वापरणार आहे आणि दोन महिन्यांतून एकदा पुणे आणि कोल्हापूर येथे लाँग ड्राइव्हला जाणार आहे. मी कोणती गाडी घ्यावी? पेट्रोल की डिझेल? माझ्यासाठी कोणती गाडी योग्य ठरेल?

– रविराज चौगुले

* तुम्ही तुमच्या प्रश्नात तुमचे बजेट किती आहे, याचा उल्लेख केलेला नाही. तरी तुमच्या एकंदर ड्रायव्हिंगनुसार मी तुम्हाला सिआझ ऑटोमॅटिक ही गाडी सुचवेन. तिचा मायलेज चांगला आहे आणि मेन्टेनन्सही कमी आहे. गिअर शिफ्टिंगचा त्रासही नाही.

* मी प्रथमच गाडी घेणार आहे. माझे बजेट सात लाखांपर्यंत आहे. माझे मासिक ड्रायव्हिंग ३०० ते ४०० किमी आहे. मी टाटा बोल्ट एक्सएमएस पेट्रोल ही गाडी घेण्याच्या विचारात आहे. मायलेज, सुरक्षा आणि मेन्टेनन्स यांच्या दृष्टिकोनातून ही गाडी घेणे योग्य ठरेल का?

– शशिकांत जाधव, सिंधुदुर्ग

*टाटा बोल्ट पेट्रोल ही सायलेंट आणि पॉवरफुल इंजिन असलेली कार आहे; परंतु तिचा मायलेज फारच कमी आहे. तुम्हाला सरासरी १२-१३ किमीचा मायलेज मिळेल. बाकी मेन्टेनन्सच्या बाबतीत अजून तरी काही तक्रार नाही बोल्टची. मात्र, तुम्ही बोल्टऐवजी स्विफ्ट घ्यावी, असा सल्ला मी तुम्हाला देईन.

* माझे बजेट चार-पाच लाख रुपये असून मला महिना २०० किमी चालवण्यासाठी कोणती गाडी घेणे योग्य ठरेल. क्विड, व्ॉगन आर, टाटा टियागो इत्यादींमधून पर्याय सुचवा.

– अतुल जोशी

* तुम्ही क्विड ८०० सीसी ही गाडी घ्यावी. तिचे डिझाईन उत्तम आहे आणि ही एक स्टर्डी कार आहे. प्रथमच गाडी घेणाऱ्यांसाठी ही गाडी उत्तम आहे. चालवायला सोपी आणि स्वस्त व देखणीही आहे. मेन्टेनन्सही कमी आहे.

* सर, मला जीप प्रकारातील गाडी घ्यायची आहे. माझे बजेट सहा ते दहा लाख एवढे आहे. महिंद्रा थार, जिप्सी, फोर्स, गोरखा अथवा दुसरे पर्याय सुचवा.

– शशिकांत पाटील

* महिंद्रा थार ही फोर बाय फोर जीप तुम्हाला सोयिस्कर ठरेल. ही गाडी अक्षरश कोणत्याही चिखलातून जाऊ शकते. पण तुमचे खरंच अशा रस्त्यावरून जाणे होत असेल तर ठीक. अथवा म्हणावा तेवढा कम्फर्ट त्या गाडीत नाही.