तुमचा प्रवास अधिक सुखाचा व्हावा यासाठी कारनिर्माते गाडय़ांमध्ये अनेकानेक सुरक्षिततेचे उपाय योजत असतात. सीटबेल्टपासून ते एअरबॅग्जपर्यंत सर्वच सुरक्षा उपाय त्यासाठीच तयार केलेले असतात. येत्या १ ऑक्टोबरपासून कारसाठीचे नवे सुरक्षाविषयक नियम लागू होत आहेत. या पाश्र्वभूमीवर मारुती सुझुकीच्या संशोधन व विकास विभागाचे प्रमुख सी. व्ही. रामन यांच्याशी केलेली चर्चा..

नव्या सुरक्षाविषयक नियमांच्या पाश्र्वभूमीवर आपण कोणत्या बदलांची अपेक्षा करू शकतो?

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन सुरक्षेसाठी जगात सर्वोत्तम मानले जाणारे नवे नियम भारतामध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपमध्ये ते आहेत. अनवधानाने एखाद्या गाडीला अपघात झाल्यास त्या गाडीमधील प्रवाशांना आणि पादचाऱ्यांना कमीत कमी दुखापत व्हावी आणि होणारे अपघात टळावेत, अशा गाडय़ांची निर्मिती यापुढे करण्यात येणार आहे. येत्या ऑक्टोबरपासून बाजारात दाखल होणाऱ्या सर्व गाडय़ांना या नव्या निकषाची पूर्तता करणे आवश्यक आहे. सध्याच्या कारसाठी ऑक्टोबर २०१९ पर्यंत सुरक्षेचे नवे निकष पूर्ण करावे लागणार आहेत. मात्र आम्ही याहीपुढे गेलो असून, आमच्या सहा मॉडेल्समध्ये या भविष्यातील नियमांची आत्ताच पूर्तता केली गेली आहे. नवे नियम लागू होण्यापूर्वी मारुती सुझुकीच्या जवळपास ८० टक्के मॉडेल्समध्ये अधिक सुरक्षा निकषांची पूर्तता व्हावी या ध्येयाने आम्ही प्रयत्न करीत आहोत.

नव्या निकषांचे पालन करणे उद्योग क्षेत्र कसे सुनिश्चित करते?

ग्राहकासाठी आवश्यक असणारी गाडीची कार्यक्षमता, इंधन कार्यक्षमता आणि आरामदायी प्रवास याच्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता प्रगत सुरक्षा मानदंड पूर्ण करणे हे या उद्योगासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. एखाद्या वाहनामध्ये सुरक्षिततेसाठी एअर बॅग्ज आणि अँटी लॉक ब्रेकिंगप्रणाली बसवणे अतिशय सोपे होते. मात्र यामुळे वाहनाच्या वजनामध्ये लक्षणीयरीत्या वाढ होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे यामध्ये नवे संशोधन होणे आवश्यक आहे. या नवीन संशोधनासाठी आणि नव्या निकषांची पूर्तता करण्यासाठी संशोधन आणि विकास विभागामध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणुकीची आवश्यकता आहे. आम्ही रोहतक येथील संशोधन आणि विकास विभागात प्रत्येक कारच्या मॉडेलमध्ये सुरक्षेची मानके पूर्ण आहेत का हे तपासण्यासाठी ३५ ते ४० कारचे अपघात (क्रॅश) करतो. त्या वेळी डमी प्रवासी बसवून आवश्यक ते सेन्सर वापरून प्रवाशांना होणाऱ्या इजा तसेच अन्य बाबी अभ्यासतो.

नवे निकष पूर्ण करताना कारच्या किमती वाढण्याची कितपत शक्यता..

प्रगत सुरक्षा मिळविण्यासाठी ग्राहक जास्त पैसे मोजण्यास तयार असतील याबाबत आम्हाला विश्वास आहे. सध्या आमच्याकडे भारतीय परिस्थितीवर आधारित राष्ट्रीय सुरक्षेचे नियम आहेत. मात्र सध्याच्या सरकारचा भारतीय ऑटोमोबाइल उद्योगामध्ये जागतिक दर्जाची सुरक्षा उपलब्ध करण्याचा दृष्टिकोन आहे. सरकारच्या या निर्णयास सियाम, वाहन उद्योग आणि गाडय़ांचे विविध सुटे भाग तयार करणारे यांचे समर्थन आहे. ग्राहक सुरक्षेच्या या नियमांना नक्कीच पाठिंबा देतील याची मला खात्री आहे.

त्यामुळे रस्त्यावर होणाऱ्या अपघातांना आळा बसेल?

रस्ते अपघात ही आपल्या सर्वासाठी मोठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे वाहनांमध्ये प्रगत तंत्रज्ञान वापरून प्रवासी आणि पादचाऱ्यांना होणारे अपघातांचे प्रमाण कमी करणे अपेक्षित आहे. मात्र याचसोबत रस्ते सुरक्षेसाठी अनेक क्षेत्रांमध्ये प्रयत्न करणे आवश्यक आहे, हे आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कायद्याची कठोर अंमलबजावणी, नागरिकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये जागरूकता, परवाना, गुणवत्तापूर्ण चालक प्रशिक्षण, रस्त्यांची योग्य बांधणी आणि अपघातानंतर रुग्णाला मिळणारी आरोग्य सेवा याकडे बारकाइने लक्ष द्यावे लागेल. या सर्व गोष्टी भक्कम स्वरूपात दिसतील तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण अपघाताचे प्रमाण कमी करू शकतो.

सध्याच्या गाडय़ांमध्ये सुरक्षेच्या काय सुविधा आहेत?

मी आधी म्हटल्याप्रमाणे भारतामध्ये अनेक वर्षांपासून राष्ट्रीय सुरक्षेचे नियम आहेत. सध्याच्या सर्व कार या नियमांचे पालन करतात. मारुती सुझुकीमध्ये आम्ही आमच्या बहुतेक सर्व मॉडेलमध्ये एअरबॅग देत आहोत. ग्राहकांना सुरक्षित पर्याय निवडण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत. ग्राहकांचा प्रतिसाद आतापर्यंत संमिo्र आहे. मात्र प्रगत सुरक्षा नियम अनिवार्य करण्यात आल्याने ही समस्या सोडवली जाईल. त्यामुळे आपण सुरक्षित आणि उत्कृष्ट गाडय़ांमध्ये प्रवास करू शकू.