विश्वचषकात सुरूवातीपासून अपयशी ठरलेल्या पाकिस्ताने आज झिंबाब्वेचा २० धावांनी पराभव केला.  पाकिस्तानने विजयासाठी ठेवलेल्या २३६ धावांचे लक्ष्य गाठताना झिम्बाब्वेचा सर्व संघ ४९.४ षटकांत सर्व बाद २१५ धावांत आटोपला.
पाकिस्तानचा डाव अडचणीत असताना, मिसबा उल हकची (७३) धावांची कर्णधारपदाला साजेशी खेळी आणि खाली आलेल्या वहाब रियाझच्या नाबाद (५४) धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी २३६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मिस्बाने हॅरिस सोहेल, उमर अकमल आणि वाहाब रियाझ या तिघांबरोबर केलेल्या महत्वपूर्ण भागीदा-यांमुळे पाकिस्तानला पन्नास षटकात सात बाद २३५ धावा करता आल्या. पाकिस्तानच्या २३६ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिंबाब्वेचा २१५ धावांतच धुव्वा उडाला. टेलर (५०), विल्यम्स (३३) आणि मसाकादजा (२९) यांची विजयासाठी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद इरफान याने ४, तर बहाव रियाज याने ३ गडी बाद करून पाकिस्तानचा विजय सुकर केला. या विजयासह पाकिस्तानची उपांत्यफेरीत जाण्याची शक्यता कायम असल्याचे सिद्ध झाले आहे.