‘स्लेजिंग’ अर्थात डिवचणे हा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा स्थायिभाव. आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांची ही मानसिकता स्थानिक क्रिकेटमध्येही ओघानंच दिसून येते.
साधारण दहा वर्षांपूर्वीची ही गोष्ट. प्रथमश्रेणी क्रिकेट सामन्यात एक षोडषवर्षीय गोंडस मुलगा आत्मविश्वासानं फलंदाजी करीत होता. परंतु नजीकच्या क्षेत्ररक्षकांपैकी एक अनुभवी क्रिकेटपटू त्याला वारंवार डिवचत होता. परंतु तो मुलगा मनानं खंबीर होता. त्यानं आपलं चित्त ढळू दिलं नाही. शांतपणे तो logo12गोलंदाजाला सामोरा जात आपल्या धावांचा आकडा वाढवत होता. मग अचानक धैर्यानं तो त्या क्षेत्ररक्षकाकडे वळला आणि चेहऱ्यावर स्मित राखतच त्यानं त्याला विचारलं, ‘‘तुम्ही किती वर्षांचे आहात?’’ त्यावर तो क्षेत्ररक्षक उत्तरला, ‘‘मी ३० वर्षांचा!’’ मग त्या मुलांनं हसतच त्याच्यावर भाष्य केले, ‘‘अरे, तुम्ही अजून याच दर्जाचं क्रिकेट खेळताय?’’ हे ऐकताच सर्वानाच हसू फुटले. त्या मुलाची खोडी काढणारा तो स्थानिक क्रिकेटपटू खजील झाला होता. मग सामन्यानंतर त्या क्रिकेटपटूनं स्वत: ड्रेसिंग रूममध्ये जाऊन त्या मुलाच्या खेळीचं कौतुक केलं होतं. तोच हा स्टीव्हन स्मिथ!
प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा स्टीव्हन हा त्या वेळी दुसरा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला होता. वयाच्या १७व्या वर्षी स्टीव्हनला क्रिकेटसाठी शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. १६ आणि २१ वर्षांखालील वयोगटासाठीचे ऑस्ट्रेलियातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचे पुरस्कार त्यानं पटकावले होते. त्यामुळे स्टीव्हनमधील गुणवत्ता सर्वाचं लक्ष वेधून घेत होती. २०१०मध्ये इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाची निवड समिती एका लेग-स्पिनर गोलंदाजाच्या शोधात होती. खरेतर शेन वॉर्नचा वारसदारच ही मंडळी शोधत होती. त्या वेळी २१ वर्षीय स्टीव्हनला पदार्पणाची संधी मिळाली. परंतु पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याच्या वाटय़ाला गोलंदाजीच आली नाही, तर फलंदाजीला आठव्या क्रमांकावर स्थान मिळाले. दुसऱ्या डावात मात्र त्यानं ३ बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या विजयात हातभार लावला. दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ८८ धावांवर कोसळला. मात्र त्यांना दुसऱ्या डावात आव्हानात्मक लक्ष्य उभारून देण्यात स्मिथच्या ७७ धावांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे नंतर अ‍ॅशेस मालिकेत त्याला सहाव्या क्रमांकावर बढती मिळाली. या मालिकेत त्यानं दोन अर्धशतकं झळकावली. पण दोन वष्रे त्याला एकाही कसोटी सामन्यात खेळायला मिळाले नाही. त्यानंतर २०१३मध्ये भारत दौऱ्यासाठी त्याची निवड झाली. मोहालीच्या पहिल्याच कसोटीत स्टीव्हन चमकला. मग मात्र तो ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात फलंदाज म्हणून कायम स्थिरावला. गेल्या वर्षी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला असताना स्टीव्हनकडे उपकर्णधारपद देण्यात आले. परंतु कर्णधार मायकेल क्लार्क दुखापतींशी सामना करीत असल्यामुळे स्टीव्हनकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आणि ती त्यानं यशस्वीपणे पेललीसुद्धा. त्यानं चार कसोटी सामन्यांत चार शतके झळकावून मालिकावीर पुरस्कार पटकावला. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटधुरीण ‘प्रतिवॉर्न’ शोधत होते. परंतु त्यांना जे गवसले होते, ते यापलीकडचं होतं. त्यांना एक जबाबदार फलंदाज आणि भावी संघनायक स्टीव्हनच्या रूपात सापडला होता. आता क्लार्कची कारकीर्द दुखापतींच्या ससेमिऱ्यामुळे अस्ताकडे वाटचाल करीत असताना ती स्टीव्हनच्या समर्थ खांद्यांवर सोपवली जाणार आहे.
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असं म्हटलं जातं. स्टीव्हनच्या यशामागे त्याची प्रेयसी डॅनी विलिसचा मोठा वाटा. मॅक्वेरी विद्यापीठात ती कायदा आणि व्यापारविषयक शिक्षण घेत आहे. तीसुद्धा स्पर्धात्मक जलतरण आणि वॉटरपोलो खेळली आहे. त्यामुळे खेळातील चढ-उतार तिला चांगले ठाऊक आहेत. डॅनी स्टीव्हनचे सामने, त्याच्या पत्रकार परिषदा सारं काही आत्मीयतेनं पाहते. त्याच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करते, तर चुकल्यास त्याचे कानही पकडते. याशिवाय ती स्टीव्हनच्या सरावात महत्त्वाची भूमिका बजावते. बोलिंग मशीनच्या मागे उभी राहून ती त्याला तासन्तास नेटमधील सराव घडवते. या वेळी स्टीव्हनचे फटके आणि त्याच्या चुकांवर ती हमखास टिप्पणी करते.
सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या घरच्या मैदानावर गुरुवारी स्टीव्हननं शतकी खेळी साकारून ऑस्ट्रेलियाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत नेले. आता मेलबर्नला क्लार्कच्या नेतृत्वाखाली एक सुवर्णाध्याय लिहिला जाऊ शकतो. त्यानंतर २०१९मध्ये होणाऱ्या पुढील विश्वचषकात स्टीव्हन स्मिथच ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक अभियानाचे नेतृत्व करण्याची दाट शक्यता आहे. अ‍ॅलन बोर्डर, स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग आणि क्लार्क यांचा समर्थ वारसा चालवू शकेल असा स्टीव्हन ऑस्ट्रेलियाकडे असल्यामुळे त्यांचं भविष्य ‘स्मिथ’मय आहे, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.