प्रेयसीला अडचणीत आणण्यासाठी तरुणाचे कृत्य

ठाणे : ‘टार्गेट दादर सिद्धिविनायक बूम..’, ‘इसिस इज कमिंग, स्लिपर सेल इन अ‍ॅक्टिव्हेट’ अशा स्वरूपाचा संदेश ठाण्यातील विवियाना मॉलच्या स्वच्छतागृहातील दोन फलकांवर लिहिल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली. परंतु पोलिसांनी चार तासांत हा मजकूर लिहिणाऱ्यास अटक केली. प्रेयसी सोडून गेल्याने तिला धडा शिकवण्यासाठी एका तरुणाने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये रविवारी दुपारी तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील स्वच्छतागृहातील फलकांवर दहशतवादी कृत्यासंबंधीचा मजकूर लिहिला असल्याचे आढळून आले होते. एका फलकावर ‘गजव्हा-ए-हिंद’, ‘दादर सिद्धिविनायक मंदिर बूम..’, ‘इसिस इज कमिंग, स्लिपर सेल इन अ‍ॅक्टिव्हेट’ तर दुसऱ्या फलकावर दोन मोबाइल क्रमांक लिहिले होते. याबाबत मॉलच्या व्यवस्थापकाने माहिती दिल्यानंतर वर्तकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान फलकावरील दोन मोबाइल क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधून चौकशी केली. त्यामध्ये एका तरुणीचा आणि तिच्या मित्राचा मोबाइल क्रमांक असल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर या दोघांना पोलीस ठाण्यात बोलावून पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. त्यातून केतन घोडके (२४) या तरुणाचे नाव पुढे आले. विक्रोळी येथील सूर्यानगर भागात राहणाऱ्या केतन घोडके याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

संबंधित तरुणीचे केतन घोडके याच्याशी सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र पाच महिन्यांपूर्वी त्यांच्यात बेबनाव झाला. त्यामुळे केतनने ही तरुणी आणि तिच्या मित्राला त्रास व्हावा, यासाठी त्यांचे मोबाइल क्रमांक टाकून तो वादग्रस्त मजकूर मॉलमध्ये लिहिला, असे पोलीस तपासात उघड झाले. त्याने हा मजकूर लिहिण्यापूर्वी हॉली-डे हा हिंदी चित्रपट पाहिला होता. त्यानंतर त्याने या चित्रपटातील संवादामधील शब्द मॉलच्या स्वच्छतागृहांमध्ये लिहिले, अशी माहिती पोलिसांनी दिली.