नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार जगभरात ३० कोटींपेक्षा अधिक लोक नैराश्यासारख्या समस्येने ग्रस्त आहेत. तर, मानसिक आरोग्यासंबंधी भारतासह नऊ देशांत करण्यात आलेल्या संशोधनानुसार अल्पशिक्षितांना नैराश्य, चिंता, एकटेपणा अशा समस्यांनी अधिक प्रमाणात विळखा घातला आहे. हे संशोधन नुकतेच ‘मेंटल हेल्थ अ‍ॅण्ड सोशल एंक्युजन’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाले.

‘ब्रिटन युनिव्‍‌र्हसिटी ऑफ इस्ट एंग्लिमा’च्या संशोधनानुसार अशिक्षित किंवा अल्पशिक्षित महिलांमध्ये अशा व्याधींचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या ५० वर्षांत साक्षरतेचे प्रमाण वाढले असले तरी जगभरात ७० कोटी ७३ लाख लोक अद्यापही अशिक्षित आहेत. विकसनशील आणि संघर्षांचा इतिहास असलेल्या देशांत साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. 

संशोधकांनी सांगितले की, सुशिक्षित व्यक्तीची कमाई अधिक असते. ते चांगला आहार घेतात. त्यांचे राहणीमानही चांगले असते. अशा व्यक्तींची सामाजिक स्थिती सुधारते. परंतु शिक्षणापासून दूर असलेल्या व्यक्ती मागे पडतात. त्या गरिबीमध्ये अडकतात. त्या गुन्हेगारीतही अडकण्याची शक्यता वाढते. संशोधकांनी शिक्षण आणि मानसिक आरोग्य यांच्यातील संबंधांची माहिती घेण्यासाठीच्या प्रयोगात सुमारे २० लाख लोकांना सहभागी केले होते. त्यावेळी अल्पशिक्षित किंवा अशिक्षित लोकांमध्ये चिंता आणि नैराश्याचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले.