राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवर खळबळजनक विधान केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच हा शपथविधी झाला होता, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राज्यातील नेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. फडणवीसांच्या या विधानावर विरोधी पक्षनेते अजित पवार काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान त्यांनी माध्यमांना यावर प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा >> “मविआ सरकारने औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव…”, राऊतांच्या टीकेला शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर
मी माझ्या मतावर ठाम राहणार आहे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर बोलण्यास अजित पवार यांनी नकार दिला आहे. “मला बाकीच्यांबद्दल काहीही बोलायचे नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीबद्दल मला काहीही बोलायचे नाही. विषय संपला. दुसरे काही विषय असतील तर बोला. मी याआधी यावर बोललेलो आहे. त्यामुळे मी माझ्या त्याच मतावर ठाम राहणार आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा विचारण्याचा प्रयत्न केला तरी माझ्याकडून हेच उत्तर मिळणार,” असे अजित पवार म्हणाले आहेत.
हेही वाचा >> सत्तासंघर्षावरील सुनावणीवर अनिल परब यांचे महत्त्वाचे भाष्य, म्हणाले “…तर भविष्यात अडचणी येणार
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
देवेंद्र फडणवीस यांनी एका माध्यमाला मुलाखत देताना अजित पवार यांच्यसोबत घेतलेल्या शपथविधीवर भाष्य केले होते. “उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. त्यानंतर शरद पवार यांच्याशी चर्चा होत, काही गोष्टी ठरल्या होत्या. पण, ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या, हे सर्वांनी पाहिलं आहे. अजित पवारांनी माझ्याबरोबर घेतलेली शपथ ही फसवणुकीच्या भावनेतून घेतली नव्हती. प्रामाणिक भावनेतून हा शपथविधी सोहळा झाला होता. पण, ठरल्यानंतर कसं तोंडघशी पडले होते, हे कधीतरी अजित पवार सांगतील,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
हेही वाचा >> फडणवीसांचा ‘पहाटेच्या शपथविधी’वर मोठा गौप्यस्फोट, आता अजित पवारांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष; पण नेमकं काय म्हणाले?
फडणवीस आपल्या विधानावर ठाम
दरम्यान, पहाटेच्या शपथविधीविषयी केलेल्या विधानावर देवेंद्र फडणवीस अजूनही ठाम आहेत. “मी एवढंच सांगेन की, मी जे काही बोललो आहे, ते सत्य बोललो आहे. त्याचे वेगवेगळे अर्थ तुम्ही लोकांनी काढले. पण मी काय-काय बोललो? ते तुम्ही शांतपणे बसून ऐका… म्हणजे तुम्हाला त्याची प्रत्येक कडी जोडता येईल. त्यावेळच्या माझ्या पत्रकार परिषदा बघा, त्यावेळी मी काय-काय बोललो आहे, तेही बघा. त्या सर्व गोष्टी तुम्ही बघितल्या तर तुम्हाला दुसर्या पुराव्याचीदेखील गरज पडणार नाही,” असे फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे येत्या काळात फडणवीस आणखी कोणते खुलासे करणार आणि त्याचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.