बोलण्यात किती आणि कसा वेळ गेला, याचं भानच कुणाला उरलं नव्हतं. हृदयेंद्रचं घडय़ाळाकडे लक्ष गेलं आणि त्याच्यातला ‘यजमान’ ओशाळलाच. जेवणाची वेळ टळून गेली होती. तरी बरं प्रज्ञा, सिद्धी आणि ख्यातिनं बरेच खाद्यपदार्थ बनवून पाठविले होते.. घरात फळफळावळही होतीच.. सर्वानीच थोडा आहार घेतला. मग त्या लहानशा खोलीतच मोठी सतरंजी अंथरून वामकुक्षीही झाली. दुपारी चहा पिता पिता पुन्हा चर्चा सुरू झाली..

हृदयेंद्र – दादा, बुवा ती ओवी अजून मनात तरंग उमटवित आहे.. कां डोळां देखतिये क्षणीं। सुवर्ण सुवर्णी। नाटितां होय आटणी। अळंकाराचीही।। तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे सामान्य माणूस जसा दागिन्याच्या बाह्य़, दृश्य रूपालाच भुलतो, पण सोनार दागिना पाहात नाही, त्यातलं सोनं अस्सल आहे की नाही, हे क्षणार्धात जाणतो. मग असंही वाटतं की जगाच्या बाह्य़ रूपात साधकानं अडकू नये. सर्वत्र भरलेला परमेश्वरच पाहावा, असंही या ओवीतून माउलींना सांगायचं आहे का? आणि तसं करायला गेलो तर प्रत्येकात.. अगदी वाईट माणसातही परमेश्वर पाहण्याची धडपड पचनी पडत नाही, त्याचं काय करावं?
बुवा – तुमचा थोडा गोंधळ होतोय.. तुमचाच नाही, साधना करणाऱ्या प्रत्येक भावनाशील माणसाला हा प्रश्न पडतो.. चांगल्यात परमेश्वर पाहणं साधतं, पण वाईटात किंवा प्रतिकूल व्यक्तिंत तो पाहणं साधत नाही.. पण मी कोणत्या अनुषंगानं माउलींची ओवी सांगितली होती ते नीट लक्षात घ्या.. डोळ्याचा देखणा पाहिला डोळा। आपोआप तेथें झांकला डोळा।। या चोखामेळा महाराजांच्या चरणाचा अर्थ उलगडताना ही ओवी आली.. मी म्हणालो की, ज्याला या ‘डोळियाचा देखणा’ पाहणं साधतं त्याच्या मनातली जग पाहण्याची ओढच खुंटते.. जगाकडे लागलेले डोळे आपोआप मिटतात.. आत वळतात.. अंतर्दर्शनात मग्न होतात.. आणि मग जगाची ओढच विरून जाते.. जसं खोटा दागिना पाहून सोनाराला त्याचं मोलच वाटत नाही, तसं चिकाटीनं, नेमानं आणि निष्ठेनं अभ्यास करणाऱ्या सजग साधकाला जगाचं खोटं, भ्रामक रूप भुलवूच शकत नाही..
अचलदादा – या सृष्टीत, चराचरात परमेश्वर भरून आहे, यात शंका नाही.. पण तो कशा अर्थानं भरून आहे, हे लक्षात घ्या.. ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातल्या ओव्या पाहा.. योगेंद्रजी जरा ती ज्ञानेश्वरी द्या बरं.. (ज्ञानेश्वरीत थोडा धांडोळा घेत आहेत.. मग एका पानावर थबकून..) ऐका. भगवंत काय सांगतात? ‘‘तरि मी तंव सकळ देहीं। असे एथ विचारु नाहीं। आणि तैसेंचि माझ्या ठायीं। सकळ असे।।’’ म्हणजे मी सर्वाच्या देहात आहे, यात शंका नाही आणि माझ्या ठिकाणीही सर्व आहेत.. ‘‘हें ऐसेंचि संचलें। परस्परें मिसळलें। बुद्धि घेपें एतुलें। होआवें गा।।’’.. अशा रीतीने जग आणि ईश्वर एकमेकांत मिसळले आहेत, परंतु साधकानं बुद्धीचा निश्चय मात्र करावा .. ‘‘येऱ्हवीं तरी अर्जुना। जो एकवटलिया भावना। सर्वभूतीं अभिन्ना। मातें भजे।।’’ अर्जुना एरवी तरी जो एकत्व भावानं सर्व भूतांच्या ठिकाणी मी व्यापक आहे, असं मानून मला भजतो.. आता पुढची ओवी फार महत्त्वाची आहे.. ‘‘भूतांचेनि अनेकपणें। अनेक नोहे अंत:करणें। केवळ एकत्वचि माझें जाणें। सर्वत्र जो।।’’ म्हणजे व्यक्तिमत्त्वाच्या अनेकत्वानं ज्याच्या अंत:करणात अनेकत्व उत्पन्न होत नाही आणि जो केवळ सर्व ठिकाणी मीच व्यापक आहे, हे जाणतो.. ‘‘मग तो एक हा मियां। बोलतां दिसतसे वायां। येऱ्हवीं न बोलिजे तरि धनंजया। तो मीचि आहें।।’’ हे अर्जुना, तो आणि मी असा द्वैताचा उल्लेखदेखील वाया आहे.. तो आणि मी एकच आहोत.. जसा दिवा आणि त्याचा प्रकाश यांचं एकत्व आहे तसा तो माझ्या ठायी आणि मी त्याच्या ठिकाणी आहे.. नीट लक्षात घ्या.. भूतांचेनि अनेकपणें। अनेक नोहे अंत:करणें। ही स्थिती महत्त्वाची आहे.. जोवर चांगला आणि वाईट असा भेद लोकांमध्ये भासतो तोवर एकत्वाची भावना शक्यच नाही.. ती भावना केवळ जो परमेश्वराशी पूर्ण एकरूप झाला आहे, त्याचीच होणार..
हृदयेंद्र – पण तोवर जर द्वैताची जाणीव जागीच राहणार असेल, तर जगाचा प्रभाव ओसरणं तरी कसं शक्य आहे? आणि या द्वैतमय चराचरात परमेश्वरच आहे, हे वास्तव कसं उकलावं?
ल्ल चैतन्य प्रेम