09 December 2019

News Flash

२४२. अंतध्र्यान

अचलदादा - तुकाराम महाराजांनीही सांगितलंय ना

अध्यात्म ऐकायला, बोलायला, सांगायला, लिहायला, वाचायला सोपं वाटतं. प्रत्यक्ष आचरणात आणताना ते किती कठीण आहे, हे जाणवतं, हे विठ्ठल बुवांनीही सांगितलं. त्यावर अचलानंद दादा म्हणाले..

अचलदादा – तुकाराम महाराजांनीही सांगितलंय ना? ‘बोल बोलता वाटे सोपे। कारणी करिता टीर कांपे’..
कर्मेद्र – पण मग जे कठीणात कठीण आहे त्याची चर्चा तरी कशाला? (बुवांकडे पहात) अरे हो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते कठीण आहे, पण अशक्य नाही..
बुवा – प्रपंचातल्या कितीतरी गोष्टी कठीण असतानाही आपण त्या धडाडीनं करतोच ना? त्यावेळी त्यातल्या कठीणपणा आपण पहात नाही.. प्रयत्नांकडेच लक्ष देतो आणि सारी शक्ती पणाला लावतो.. मग अध्यात्म आचरणात आणताना तसं का करत नाही? अध्यात्म ऐकायला, वाचायला, बोलायला सोपं आहे, हे मी एवढय़ाचसाठी म्हटलं कारण आज अध्यात्माचं दर्शन केवळ ऐकण्या, बोलण्या, वाचण्या, लिहिण्यातच घडतं आहे! आपण ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा, सगळं लक्ष कृतीकडे आणि त्या कृतीच्या प्रयत्नांकडे द्यायला हवं, यासाठी बोललो मी ते..
कर्मेद्र – मला एक सांगा, अध्यात्म कृतीत हवं, कृतीत हवं म्हणजे नेमकं काय?
बुवा – यासाठी मुळात अध्यात्म म्हणजे काय, हे लक्षात घ्या.. अध्यात्म म्हणजे अधि+आत्म.. अर्थात आत्मप्रधानता हेच अध्यात्म आहे..
कर्मेद्र – आता पुन्हा प्रश्न आलाच.. जिथे आत्माच कुणाला माहीत नाही, तिथे त्याची प्रधानता कशी बिंबवता येईल? परमात्मा चराचरात आहे म्हणतात पण तो कुठेच दिसत नाही.. तोच आत्मरूपानं प्रत्येकात आहे म्हणतात तोही कुणालाच दिसत नाही.. जग दिसतं तर ते खोटं आणि जो दिसत नाही तो खरा?
बुवा – (कौतुकानं) जे दिसतं ते तसंच कायम रहात नाही, हेसुद्धा दिसतंच ना? आणि जे दिसत नाही ते नाहीच, असं तरी कसं म्हणता येईल? आपलं सगळं जगणं श्वासोच्छवासावर चालतं ते श्वास घेणं आणि सोडणं तरी कुठे लक्षात येत असतं? आपण बघतो, ऐकतो, बोलतो, हुंगतो या साऱ्या क्रिया अगदी सहजपणे घडतात, पण ती घडवणारी यंत्रणा तरी कुठे जाणवते? साध्या या हाडामांसाच्या शरीरातील अनंत क्रिया तरी कुठे दिसतात वा जाणवतात? ज्या चैतन्य शक्तीच्या जोरावर जीवनाचा अखंड प्रवाह सुरू आहे त्या चैतन्य शक्तीचं खरं पूर्ण आकलन तरी कुठे होतं? ती चैतन्य शक्तीच आत्मशक्ती आहे.. प्राणशक्ती आहे.. अत्यंत सूक्ष्मात सूक्ष्म असं जर आपल्यात काही असेल तर ती ही शक्ती आहे.. त्या सूक्ष्माची धारणा होईल तेव्हाच स्थूलाचं भान सहजतेनं विरेल.. स्थूलात अडकलेल्या मनाला त्या सूक्ष्माकडे वळवण्यासाठीच तर मूर्तीपासून ते परमतत्त्वाच्या जाणिवेपर्यंतचं ध्यान एकनाथांनी सांगितलंय.. त्या अंतध्र्यानाकडेच वळलं पाहिजे.. हे अंतध्र्यान हेच अध्यात्म आहे.. जगात वावरताना आणि जगातली सर्व कर्तव्यर्कम पार पाडतानाच जगाचा लेशमात्र प्रभाव नसणं, हेच अध्यात्म आहे.. जगाचं प्रेम माणसाला कमकुवत करणारं असतं तर परम तत्त्वाचं प्रेम माणसातली शक्ती जागवणारं असतं.. जगाच्या प्रेमापाठोपाठ मोह, भ्रम, आसक्तीत माणूस रूतत जातो आणि परतंत्र होतो तर भगवंताचं प्रेम लागलं तर माणूस निस्संग होतो.. निर्भय होतो.. निश्चल होतो.. स्वतंत्र होतो.. स्वस्थ होतो.. जगाचं ध्यान उतरून भगवंताचं ध्यान साधण्याचा मार्ग हृदयपरिवारीं कृष्ण मनोमंदिरीं। आमुच्या माजघरीं कृष्ण बिंबे।। या एका चरणात माउलींनी सांगितलाय..
अचलदादा – वा! बुवा या चरणाचा हा अर्थ जाणवला नव्हता.. आपली दशा कशी आहे? हृदयपरिवारीं जग मनोमंदिरीं। आमुच्या माजघरी जग बिंबे!!
हृदयेंद्र – वा! अंतर्बाह्य़ जगाचंच प्रेम, जगाचीच ओढ, जगाचाच ध्यास आणि त्यामुळे अंतरंगात जग आणि बाहेरही जगच..
कर्मेद्र – अरे! जणू काही तुम्ही या जगातले नाहीच आणि या जगाशी तुमचं काही देणंघेणंच नाही! एवढी जगाची नफरत वाटते तर जगाबाहेर पडून दाखवा की!
बुवा – जगाबाहेर पडायचं नाही, बाहेरच्या जगाला फक्त बाहेरच ठेवायचं मात्र आहे!! त्याला आत आणायचं थांबवायचं आहे! आणि कर्मेद्रजी ज्याला तुम्ही जग म्हणता ते तरी एकसमान कुठे आहे? ज्याचं त्याचं जग वेगवेगळंच तर आहे ना?
ल्ल चैतन्य प्रेम

First Published on December 11, 2015 6:53 am

Web Title: abhangdhara 32
Just Now!
X