21 October 2019

News Flash

२४३. जग-ध्यान

हृदयेंद्र - निसर्गदत्त महाराजांची पाश्चात्य साधकांशी झालेली प्रश्नोत्तरं ग्रंथरूपानं उपलब्ध आहेत

ज्याला तुम्ही जग म्हणता ते तरी एकसमान कुठे आहे? ज्याचं त्याचं जग वेगवेगळंच तर आहे ना, असा प्रश्न विठ्ठल बुवांनी कर्मेद्रला केला. त्यावर हृदयेंद्र म्हणाला..

हृदयेंद्र – निसर्गदत्त महाराजांची पाश्चात्य साधकांशी झालेली प्रश्नोत्तरं ग्रंथरूपानं उपलब्ध आहेत.. त्यातही अशीच चर्चा होती. निसर्गदत्त महाराजांना त्या साधकानं विचारलं की जगात अमुक अमुक घडत आहे, आपल्याला काय वाटतं? त्यावर महाराजांनी विचारलं, ‘‘कोणत्या जगात हे घडत आहे?’’ थक्क होऊन तो साधक म्हणाला, ‘‘ज्या जगात तुम्ही आणि आम्ही जगत आहोत!’’ तेव्हा महाराज म्हणाले, ‘‘तुम्ही तुमच्या जगात कैद आहात, तुम्हाला माझ्या जगाची कल्पना नाही! उलट माझ्या वास्तवाला तुम्ही कल्पना मानता आणि तुमच्या मिथ्या गोष्टींना वास्तविक मानता..’’ या प्रश्नोत्तरांचा विचार केला तेव्हा पटलं की एकाच जगात आपण जगत असलो तरी त्या जगाचं प्रत्येकाच्या अंतर्मनातलं प्रतिबिंब वेगवेगळं आहे.. म्हणूनच त्या जगाबाबतची प्रतिक्रियाही वेगवेगळी आहे.. अगदी बारकाईनं पाहिलं तर जाणवतं ‘मी’ आहे म्हणूनच जगाला अर्थ आहे आणि म्हणूनच माझं जग ‘मी’केंद्रितच आहे.. या ‘मी’चा पोकळपणा उकलत जाईल तसतसा या जगाचा फोलपणाही समजू लागेल.. जग मिथ्या आहे, म्हणजे जगावर विसंबणं मिथ्या आहे, हे समजेल.. बुवा तुम्ही सांगता ते बरोबरच आहे.. जगातून बाहेर पडायचं नाही तर बाहेरच्या जगाला बाहेरच ठेवायचं आहे, त्याला आत आणणं, हृदयसिंहासनावर बसवणं थांबवायचं आहे..
अचलदादा – हे होत नाही, तोवर खरं अंतध्र्यान साधणार नाही.. जगाचंच ध्यान सुरू राहील.. हृदयपरिवारीं जग मनोमंदिरीं। आमुच्या माजघरी जग बिंबे!! हीच स्थिती राहील..
हृदयेंद्र – आता ‘‘हृदयपरिवारीं कृष्ण मनोमंदिरीं। आमुच्या माजघरीं कृष्ण बिंबे।।’’ या चरणाचा अर्थ जाणून घ्यायची उत्सुकता लागली आहे..
बुवा – (हसत) हो.. पण त्यासाठी आधीचा चरण लक्षात घ्या.. काय आहे हा चरण? मन गेलें ध्यानीं कृष्णचि नयनीं। नित्यता पर्वणी कृष्णसुख।। सर्व इंद्रियांना परमात्ममयतेचं अर्थात सद्गुरूमयतेचं वळण लागलं तर मन ध्यानात मावळतं आणि मग ‘‘नित्यता पर्वणी कृष्णसुख।।’’ कृष्णसुखाची नित्यपर्वणी लाभते! हे साधण्याचा मार्ग म्हणजे ‘‘हृदयपरिवारीं कृष्ण मनोमंदिरीं। आमुच्या माजघरीं कृष्ण बिंबे।।’’ हा आहे.. आणि अचलानंद दादा म्हणाले त्याप्रमाणे जगाच्या जागी सद्गुरूंना आणणं, हाच तो अभ्यास आहे..
हृदयेंद्र – कृष्ण मनोमंदिरी, या शब्दाचा अर्थ समजतो की मनाच्या मंदिरात कृष्ण अर्थात सद्गुरूच विराजमान असला पाहिजे.. पण हृदयपरिवार म्हणजे काय असावं?
बुवा -एक गोष्ट उघड आहे, वैद्यकीयदृष्टय़ा माहीत असलेलं हृदय आणि अध्यात्मात अभिप्रेत असलेलं हृदय या दोहोंत फरक आहे.. प्रत्यक्षातल्या हृदयाचा भावनेशी काही संबंध नाही.. रक्ताभिसरणात आणि शरीरभर शुद्ध रक्त आणि प्राणवायू पोहोचविण्यात अहोरात्र कार्यरत असलेल्या हृदयाचा भावनेशी संबंध नाही.. पण अध्यात्मात हृदय आणि भावनिकता यांचा अतूट संबंध आहे! त्यामुळे हृदयपरिवार म्हणजे काय ते थोडं लक्षात येऊ शकतं.. वैद्यकीय दृष्टय़ा ‘हृदयपरिवारा’त उजवी आणि डावी कर्णिका तसेच उजवी आणि डावी जवनिका यांना आणता येईल.. अध्यात्माच्या अंगानं मात्र अंत:करण हाच हृदयपरिवार म्हणता येईल..
हृदयेंद्र – अंत:करण म्हणजे आंतरिक उपकरणं.. मन, चित्त, बुद्धी, अहंकार.. पण ‘कृष्ण मनोमंदिरी’ म्हणताना मनाचा उल्लेख आहेच की..
बुवा – मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार या चार गोष्टी वेगळ्या वाटल्या तरी त्या एकाच ‘मी’च्या आहेत.. सर्वाचं स्फुरण अहंमधून आहे.. त्यानुसाच चिंतन सुरू होतं तेव्हा चित्ताची, मनन सुरू होतं तेव्हा मनाची आणि विचार सुरू होतो तेव्हा बुद्धीची जाणीव होते.. हा सारा सूक्ष्म असा हृदयपरिवारच आहे.. त्यातील मन मात्र ठळकपणे जाणवतं आणि नाचवतंही.. त्यामुळे हृदयपरिवारी आणि मनोमंदिरी सद्गुरूंनाच अढळ स्थान हवं, हे सांगितलं आहे!
ल्ल चैतन्य प्रेम

First Published on December 14, 2015 1:37 am

Web Title: abhangdhara 33