परम शक्तीचाच अंश असलेल्या माणसाच्या जगण्यातही उदात्ततेचं, मांगल्याचं प्रत्यंतर आलं पाहिजे. ते यावं असं जीवन घडविण्याचा अभ्यास साधकानं केला पाहिजे आणि असा अभ्यास करणाऱ्यांचाच संग घडो, अशी इच्छा ठेवली पाहिजे, असं बुवा म्हणाले..
अचलदादा – पण बुवा, अशा संगालाही मर्यादा असतेच, नाही का? माणसाचाच सोडा, सत्पुरुषाचा संगही कायमचा लाभणं आणि त्या संगात राहाता येणं फार कठीण.. त्यामुळे आमच्या महाराजांनी जो सदोदित टिकणारा सत्संग सांगितला आहे, तोच महत्त्वाचा आहे..
हृदयेंद्र – हो.. महाराजांनी सत्संगाचे चार प्रकार एकदा दूरध्वनीवरून बोलताना सांगितले.. पहिला सत्संग म्हणजे प्रत्यक्ष त्यांचा सहवास, पण तो मिळणं आणि टिकणं कठीण. त्यात काळ-वेळ-परिस्थितीची साथही लागतेच. दुसरा सत्संग म्हणजे जसं त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणं.. पण त्यालाही मर्यादा आहे.. तिसरा सत्संग म्हणजे त्यांच्या ग्रंथांचं वाचन, मनन, चिंतन.. पण त्यालाही मर्यादा आहे.. डोळे साथ देत आहेत तितपत वाचता येतं.. चौथा सत्संग म्हणाले खरा सत्संग.. तो आहे नामाचा.. (ज्ञानेंद्र आणि योगेंद्रकडे पाहात) आपली यावर चर्चा झाली होतीच.. इथे तुम्ही नाम म्हणजे उपासना असा अर्थ घ्या..
बुवा – या नामाचं महत्त्व सांगणारा चोखामेळा महाराजांचाही एक अभंग आहे बरं का..
अचलदादा – सांगा की..
बुवा – अभंग असा आहे, ‘‘भेदाभेद कर्म न कळे त्याचें वर्म। वाउगाचि श्रम वाहतां जगीं।। नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनी। पाप ताप नयनीं न पडेचि।। वेदाचा अनुभव शास्त्राचा अनुवाद। नामचि गोविंद एक पुरे।। चोखा म्हणे मज कांहींच न कळे। विठ्ठलाचे बळें नाम घेतो।।’’ सोपा आहे ना?
कर्मेद्र – तुम्ही असं विचारताय म्हणजे तो सोपा नाहीच!
अचलदादा – (हसतात) नाही.. सरळसाधा अर्थ हाच की नामच सारं काही आहे, बळे का होईना, पण नाम घ्या! पण बुवा मला प्रथमपासून ही खोडच आहे की प्रत्येक शब्दाची उलटतपासणी घ्यायची! त्यातून वेगळाच अर्थ बाहेर येतो मग!!
हृदयेंद्र – हो, त्यामुळे दादांनी कितीतरी वेगवेगळे अर्थ सांगितले आहेत.. पण बुवा, खरंच या अभंगाचा अर्थ काय आहे?
बुवा – बरेचदा काय होतं, आपण अभंग पटापट वाचून टाकतो किंवा ऐकतो.. त्यातला एखादाच भाव मनाला भिडतो आणि त्यावर मानही डोलते.. त्याचाही उपयोग होतो बरं का! समजा मूठभर खाद्यपदार्थ आपण तसाच बकाबका खाऊन टाकला तरी तो काम करतोच आणि अलीकडे किती छाननी करतात ना, त्याप्रमाणे त्यात किती कॅलरी आहेत, कोणतं जीवनसत्त्व आहे, वगैरे जाणून खाल्लं तरीही उपयोग तेवढाच होतो, त्याचबरोबर माहितीच्या चवीचंही समाधान मिळतं.. तर चोखामेळा महाराज काय सांगतात? भेदाभेद कर्म न कळे त्याचे वर्म! भेद आणि अभेद कर्म.. म्हणजेच सकाम कर्म आणि निष्काम कर्म.. त्याचं वर्म कळतं का हो आपल्याला?
हृदयेंद्र – (खोल विचारात बुडून) नाही..
बुवा – बघा! किती पटकन उत्तर दिलंत!! हीच गंमत आहे, सकाम कर्माचं कसलं आलंय वर्म? सारी कर्म सकामच तर होताहेत..
हृदयेंद्र – (आश्चर्यानं) मग? मग हे वर्म कोणतं?
बुवा – (हसत) अभेद कर्मातच जो भेद आहे ना, त्याचं वर्म कळत नाही!! अभेद कर्म म्हणजे निष्काम कर्म.. आता त्यातला भेद म्हणजे काय? विचार करा.. आपण निष्काम कर्म खरंच करतो का? उपासतापास, दानधर्म, जपजाप्य यांना आपण निष्काम कर्म मानतो, पण त्यात किती सकामता भरून असते! उपासाचं अवडंबर, जपाचं अवडंबर, दानाचं अवडंबर.. प्रत्येक गोष्टीतून ‘मी’पणाच वाढविण्याचा प्रयत्न.. तेव्हा निष्काम कर्माचं खरं वर्म न जाणता जी जी कर्म आपण निष्काम म्हणून करतो ती वाहाताना म्हणजे करताना, वाउगाचि श्रम वाहतां जगीं।। निव्वळ श्रमच वाटय़ाला येतो! तेव्हा या निष्काम कर्माचं खरं वर्म जाणलं पाहिजे.. शास्त्रांतही निष्काम कर्माचं महत्त्व सांगितलं आहे, पण निष्काम कर्म म्हणजे नेमकी कोणती हे सांगितलेलं नाही.. कारण हे वर्म केवळ एकच जण जाणतो!!
चैतन्य प्रेम