पारंपरिक गणपतीचा रंग हा प्रामुख्याने लाल आहे. लालव्यतिरिक्त गणपती सोनेरी, पिवळे, निळे, पांढरे व सावळे अशा रंगांतही आढळतात. त्यांचे रूप स्थलकालनिरपेक्ष नसून स्थलकालसापेक्ष असते आणि हेच रंगरूप त्यांची विशिष्ट ओळख बनते..

गणेशचतुर्थी जवळ आली आहे हे पाहता, माझ्या काही मित्रांनी माझ्या गणपतीच्या दृश्य-विशेषणावरच्या संशोधनावर लेख लिहिण्याचा आग्रह केला. शैक्षणिक आवारात अशा विषयांवर कुठलीही भावनिक  अभिनती न बाळगता, तटस्थपणे व वस्तुनिष्ठपणे चर्चा करता येते. प्रसारमाध्यमांमध्ये, मर्यादित जागेत अशी चर्चा अवघड आहे याचे मला भान आहे, तरीही वाचकांनी मोकळ्या मनाने लेख वाचावा.

Who holds the keys to the ancient treasures of Tuljabhavani Devi temple
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पुरातन खजिन्याच्या चाव्या कोणाकडे?
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन
dharashiv, tulja bhavani
तुळजाभवानी देवीचे दागिने चोरणारे फरारच! प्रमुख तीन संशयितांची नार्को टेस्ट करा : गंगणे

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पर्यावरणाकरिता अत्यंत हानिकारक असतात हे आपल्याला माहीतच असेल. अशा मूर्ती विसर्जनानंतर पाण्यात सहजरीत्या विरघळत नाहीत. त्यामुळे पाण्याची ऑक्सिजन-पातळी कमी होते. त्यायोगे मासे आणि इतर जलीय जीव मरतात. मूर्ती सजवण्यासाठी वापरलेल्या रंगांमध्ये पारा, शिसे व क्रोमियमसारखे जड धातू असतात. विसर्जनानंतर ही रसायने पिण्याच्या पाण्यात शिरून माणसांनाही हानी पोहोचवू शकतात. या समस्येमुळे, आम्ही दरवर्षी आमच्या विद्यालयातल्या शिल्पशाळेत, लोकांना पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) मातीचे गणपती बनवायला आमंत्रित करत असतो. लोक येतात, आपआपल्या देवांच्या मूर्ती बनवतात आणि त्यांनाच आपल्या घरी बसवतात. बाजारातून देवांच्या मूर्ती विकत घेणे सोपे असते, पण स्वत: मूर्ती बनविणे लोकांना अवघड जाते.

गणपतीची मूर्ती बनवताना, विशेषत: वास्तववादी शैलीतील मूर्ती बनवताना नवशिक्यांना खूप अडचणी येतात. पहिली अडचण प्रमाणाची असते. हत्तीचे डोके हे मनुष्याच्या डोक्यापेक्षा अनेक पटीने मोठे असते, ते इष्ट प्रमाणात लहान करावे लागते. दुसरी अडचण हत्तीच्या चेहऱ्याची रचना; हत्तीला पाश्र्व (दोन वेगळ्या बाजूंकडे बघणारे) डोळे असतात, मनुष्याला ललाट (दोन्ही समोर बघणारे) डोळे असतात. देवांच्या प्रतिरूपणात डोळ्यांना खूप महत्त्व आहे. लोक देवाच्या मूर्तीकडे जेव्हा बघतात तेव्हा देवही आपल्याकडे बघत आहे, आपले ऐकत आहे असे वाटावे म्हणून मूर्तीमध्ये डोळे समोर आणावे लागतात. याच कारणांमुळे बहुतांश देवांच्या पारंपरिक मूर्तीमध्ये प्रखर, तीव्र वैधम्र्याचे व सामान्य प्रमाणापेक्षा मोठे डोळे आढळतात. गणपतीच्या मूर्तीमध्ये डोळे मनुष्यासारखे समोर आणले की गणपतीचे हत्तीपण कमी होते. याउलट डोळे वास्तविक हत्तीसारखे बाजूला ठेवले, तर देवमूर्तीना आवश्यक उपरोक्त परिणाम साधत नाही. म्हणूनच डोळ्यांचा आकार व स्थान विचारपूर्वक ठरवावे लागते, अनेकदा डोक्याचा आकारसुद्धा बदलावा लागतो. तिसरी अडचण, वेशभूषा; गणपतीला कुठले कपडे व दागिने घालावे? बाजारातील मूर्तीमध्ये गणपतीला धोतर नेसवतात, आजकालच्या लोकांना ही पारंपरिक वस्त्रभूषा परिचित नसते. मग हे लोक, असे वस्त्र देवाला कसे नेसवणार?

चौथी आणि सगळ्यात गमतीदार अडचण म्हणजे गणपतीचा रंग. एका कार्यशाळेत, गणपतीची मूर्ती तयार झाल्यावर एका लहान मुलीने मला विचारले, ‘‘सर, तुमच्याकडे गुलाबी रंग आहे का?’’ मी म्हणालो, ‘‘का गं? गणपती गुलाबी असतात का? तू सावळी, तुझ्या अवतीभवतीचे बहुतांश लोक सावळे, वास्तवातील हत्ती मेघवर्ण, जुन्या मंदिरातील गणपती शेंदरी; मग तुला गणपती गोरा का करायचा आहे? मातीच्या रंगाचा राहू दे.’’ ‘‘अहो सर, टीव्हीवरील मालिकेत आणि बाजारातील सगळे ‘देखणे’ गणपती गोरे असतात! म्हणून मला हलक्या गुलाबी रंगाचा गणपती बनवायचा आहे.’’ हे ऐकून मी थक्क झालो, त्या क्षणी एका विशिष्ट सामाजिक मन:स्थितीची झलक मला पाहायला मिळाली. त्या चिमुकलीला ‘देखण्या’ देवांची आराधना करायची इच्छा आहे, ही कल्पना खूप विचित्र वाटली. त्याहून वर गोरे किंवा हलके गुलाबी देव हे ‘देखणे’ असतात, हा विचार तर अत्यंत हानिकारक वाटला.

काही वर्षांपूर्वी ‘देव माझा विठू सावळा’, ‘सावळा गं रामचंद्र माझ्या मांडीवर न्हातो’ अशी गाणी रचली गेली व खूप लोकप्रियही झाली. मग सावळ्या रंगावरचे हे सामाजिक विचारपरिवर्तन कधी झाले? फेअरनेस क्रीमच्या दुष्ट जाहिरातींचा हा प्रभाव आहे का? फोटो काढताना, विशेषत: लग्नासाठी, फोटोग्राफर न विचारताच लोकांना गोरं करतात आणि लोक आनंदाने असे फोटो स्वीकारतात. किती लोक, ‘‘अहो, मी असा/अशी दिसत नाही!’’ असं म्हणतात? किती पालक आपल्या मुलामुलींना, ‘‘तुझा आहे तो रंग चांगला आहे, तो बदलण्यासाठी उगाच धडपड करू नकोस,’’ असे समजावतात? असे प्रश्न चिंताजनक जरी असले तरी ते विचारावे लागतात आणि असेच प्रश्न कला संशोधकांचे वैचारिक खाद्य असतात. संशोधक फक्त ऐतिहासिक वस्तूंचे प्रलेखनच करत नाहीत. ते त्यांची तुलना समकालीन वस्तूंशी आणि अप्रत्यक्ष रूपात समाजाशीही करत असतात.

पशुशीर्षी, म्हणजे प्राण्यांचे डोके असणारे देव व मिथ्य-जीव (मिथके म्हणून मान्यता पावलेले जीव) जगातील अनेक संस्कृतींमध्ये सापडतात. पाश्चात्त्य कलासमीक्षेत हा एक अभ्यासाचा विषय आहे. देवांच्या व मिथ्यजीवांच्या अशा प्रतिरूपणाला थिरीओसेफली (ग्रीक व्युत्पत्ती: थिरीओ = पशू, केफाली = डोके) किंवा थिरीअँथ्रोपिक (अँथ्रोपो = मनुष्य) असे म्हणतात. हिंदू धर्मात गणपतीव्यतिरिक्त, विष्णूची पशू-अवतारांची प्रतिरूपणे, विशेषत: सिंहवदन नरसिंह; अश्वमुखी हयग्रीव आणि दक्षिणेत प्रचलित सिंहमुखी प्रत्यङ्गिरा हे देव आहेत. या देवांबरोबर अजमुखी दक्ष यांसारख्या उपदेवता व काही देववाहनांची मनुष्यत्वारोपित रूपे उदा. गरुड, नंदी इ.मध्ये हे लक्षण दिसून येते. गणपतीची आराधना हिंदू धर्माव्यतिरिक्त तिबेटीय बौद्ध धर्म, जैन धर्म व इतर काही धर्मामध्ये केली जाते. प्राचीन भारतातील गणपतीच्या मूर्तीमध्ये विलक्षण विविधता आढळते. गणपतीचे एक लुप्त झालेले लक्षण म्हणजे हातातला मुळा. आधीच्या काही मूर्तीमध्ये गणपतीच्या हातात मुळा असायचा, बौद्ध (महारक्त) व जपानी गणपतींमध्ये (कांगीटेन) हे लक्षण आजही टिकून आहे.

गणपतीला समर्पित मुख्य धर्मग्रंथ, गणेश पुराण, मुद्गल पुराण आणि गणपत्यर्थवशीर्ष आहेत. या ग्रंथांमध्ये गणपतीच्या बहुतांश अवतारांच्या रंगाचे वर्णन रक्तवर्ण, अरुणवर्ण असे केले आहे. काही अवतारांचे वर्णन कनकवर्ण, श्यामवर्ण, श्वेतवर्ण, गौरवर्ण इ. असेही केले आहे. म्हणूनच आदिकालीन व मध्यकालीन चित्रांमध्ये गणपती हा लाल रंगात दर्शविला आहे. धर्मग्रंथांव्यतिरिक्त माझे आवडते वर्णन एका प्राचीन गणिताच्या पुस्तकात आढळते. गणितज्ञ भास्कराचार्याच्या लीलावतीत, आचार्य; ‘लीलागललूलल्लोलकालव्यालविलासीने। गणेशाय नमो नीलकमलामलकान्तये” या शब्दात एका निळ्या कमळासारख्या निखळ गणपतीचे वंदन करतात. आपल्याला संस्कृत कळत नसले तरीही वाक्यातील अनुप्रासाचा आस्वाद नक्कीच घेता येईल. या उदाहरणांवरून आपल्याला जाणवेल की पारंपरिक गणपतीचा रंग हा प्रामुख्याने लाल आहे. लालव्यतिरिक्त गणपती सोनेरी, पिवळे, निळे, पांढरे व सावळे अशा रंगांतही आढळतात. त्यांचे रूप स्थलकालनिरपेक्ष नसून स्थलकालसापेक्ष असते आणि हेच रंगरूप त्यांची विशिष्ट ओळख बनते. रंगरूपाची समृद्ध परंपरा असताना आज बाजारात एकाच साच्यातले, एकाच रंगाचे गणपती का दिसतात? परंपरेत बहुतांश गणपती शेंदरी आहेत तरीही आज बाजारातील बहुतांश गणपती गोरे आहेत आणि निळे, तपकिरी, पिवळे, सावळे, गहूवर्ण गणपती तर मिळतच नाही.

‘जुना करार’ या ख्रिस्ती धर्मग्रंथाच्या उत्पत्ती अध्यायात पुढीलप्रमाणे लिहिलेले आढळते, ‘‘मग देव म्हणाला, ‘आपण आपल्या प्रतिछायेप्रमाणे आपल्या प्रतिमेसारखा माणूस उत्पन्न करू.’ तसे देवाने आपल्या प्रतिछायेप्रमाणे माणूस उत्पन्न केला; देवाचे प्रतिरूप असा माणूस निर्माण झाला.’’ या वाक्यामुळे ख्रिस्त धर्म पाळणारे लोक माणसाला देवाचे प्रतिरूप मानतात. या दृष्टिकोनाच्या अगदी उलट दृष्टिकोन संशोधकांचा असतो. मनुष्य आपल्या रूपात, स्थळ, काळ, संदर्भाप्रमाणे देवाची प्रतिमा बनवतात व आपल्या इच्छा, आकांक्षा, भीती, चिंता इ. त्या रूपांवर प्रक्षेपित करतात. ते देवाच्या रूपाला समाजाचे प्रतिबिंब मानतात. लोक देवाच्या कुठल्या मूर्ती, चित्रे निवडतात? त्याच मूर्ती, चित्रे का निवडतात? काळासोबत देवांचे रंगरूप कसे बदलले आहे? देवांच्या रूपांबाबतच्या लोकांच्या आवडीनिवडी कशा बदलल्या आहेत? असे प्रश्न ते विचारत असतात. देवांच्या चित्रांची व मूर्तीची रूपमीमांसा केल्याने आपल्याला समाजातील सामूहिक आकांक्षा व विविध सामाजिक अंत:प्रवाहांची झलक मिळते असा त्यांचा दृष्टिकोन असतो. या वर्षी गणपती घरी आणताना या प्रश्नांवर नक्की विचार करा आणि जमल्यास स्वत:च्या हाताने बनवलेला, कुठलेही कृत्रिम रंग नसलेला, मातीचा गणपती बसवावा.

लेखक आयआयटी मुंबई येथील ‘औद्योगिक अभिकल्प केंद्र’ (आयडीसी- इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर) येथे  प्राध्यापक आहेत.

 

गिरीश दळवी

girish.dalvi@iitb.ac.in